चिपळूण-पक्ष सोडण्याचा, नाराज असण्याचा प्रश्नच नाही

चिपळूण-पक्ष सोडण्याचा, नाराज असण्याचा प्रश्नच नाही

Published on

पक्ष सोडण्याचा, नाराज असण्याचा प्रश्नच नाही
आमदार भास्कर जाधव; क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी न मिळाल्याची खंत
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १६ः पक्ष सोडण्याचा किंवा नाराज असण्याचा प्रश्न नाही. मी जे वक्तव्य केलेले नाही किंवा जी गोष्ट माझ्या मनामध्ये सुद्धा नाही, तेच दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे सांगत सध्या सुरु असलेल्या नाराजीनाट्यावर शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांनी खुलासा केला. तसेच बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार हे उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच आहेत, हे सिद्ध करण्याकरिता आम्ही लढत राहू असा विश्वासही दिला.
चिपळूण येथे संपर्क कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेतली.
आमदार जाधव म्हणाले, गेले चार दिवस मी जे वक्तव्य केले नाही किंवा जी गोष्ट माझ्या मनामध्ये सुद्धा नाही, त्याला प्रसारमाध्यमांमध्ये खूप मोठी प्रसिद्धी दिली गेली. माझ्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक संभ्रम निर्माण केला आहे. मी त्यावेळी असे म्हणालो होतो की माझ्या ४३ वर्षाच्या राजकीय जीवनात मला माझ्या क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळाली नाही, हे माझे दुर्दैव आहे. ही संधी मला कोणत्या पक्षाने दिली नाही, कोणत्या नेत्याने दिली नाही असे कुठेच म्हणालो नव्हतो. मला शिवसेना पक्षाने संधी दिली नाही असे मी बोललो नव्हतो, तेच सातत्याने हायलाईट केले जात आहे. तसेच अशी संधी केवळ मलाच मिळाली नाही असे नाही, तर ती अनेकांना मिळत नसते. ही वाक्यरचना मी केली होती. तरीही प्रत्यक्षात वेगळच दाखवले गेले. तसेच माजी आमदार राजन साळवी यांच्या प्रवेशाविषयी बोलताना मी इतिहासातील दोन दाखले दिले. त्यात सिंहगडावर तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे आणि उदयभान यांच्यात झालेल्या लढाईचा दाखला दिला. आपले राजकीय मरण पक्के असतानाही परतीचे दोर कापले आहेत, असे समजून लढू. प्रसंगी मरण पत्करू आणि जिंकू असे आवाहन स्वकियांना केले होते. तसेच राजन साळवी गेले म्हणून रत्नागिरी जिल्हा किंवा कोकण तिकडे गेले असे होत नाही. ज्याप्रमाणे विजापूरच्या किल्ल्याभोवती एक मोठा खंदक पाण्याने भरलेला होता किंवा आहे आणि त्यामध्ये शत्रूचे सैन्य पडून मृत्यू ओढवून घेत होते. मग खंदकात पडून मरण्यापेक्षा आपण सर्वांनी लढू या आणि जिंकूया, असा आग्रह पक्षातील पदाधिकाऱ्यांकडे केला आहे. विरोधी पक्षनेतेपद मिळण्याकरता मी नाराजीचे नाटक करत आहे, हे सातत्याने पुढे आणणे हे तर माझ्या ४३ वर्षाच्या राजकीय सिद्धांतावर प्रचंड अन्याय करणारे आहे, असे जाधव यांनी सांगितले.

चौकट
तत्त्वांना मूठ माती देणार नाहीः जाधव
मी दिलेली वेळ आणि शब्द पाळतो. आता माझ्या उत्तरार्धाच्या राजकीय कारकीर्दीमध्ये मी माझ्या तत्त्वांना मूठ माती द्यावी असं मला अजिबात वाटत नाही. उलट मूळ शिवसेनेवर झालेल्या अन्यायाविरोधात आम्ही न्याय मागत आहोत. पण तिथेही तारीख पे तारीख आम्हाला मिळत आहे. पण आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार हे उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच आहेत हे सिद्ध करण्याकरता लढत राहू आणि सिद्ध करून दाखवू, असेही त्यांनी शेवटी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com