

46010
कलावंतांमुळे सिंधुदुर्गाचा नावलौकिक
पांडुरंग परब ः पेंडूरमध्ये नवचैतन्य संघातर्फे सन्मान सोहळा
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १८ ः सिंधुदुर्ग जिल्हा हा सांस्कृतिक चळवळीची खाण आहे. येथील अनेक कलावंतांनी आपल्या कलेच्या माध्यमातून जिल्ह्याचा नावलौकिक केला. या कलाकारांसाठी शासनाच्या विविध योजना आहेत. त्याचा लाभ कलावंतांनी घ्यावा, असे आवाहन नवचैतन्य कलाकार संघ पेंडूर या संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग परब यांनी कलावंत सन्मान सोहळ्यात केले.
नवचैतन्य कलाकार संघ पेंडूर (ता. मालवण) या संघटनेतर्फे ‘कलाकार सन्मान सोहळा २०२५’ चे आयोजन रविवारी (ता. १६) करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गावातील स्थानिक भजनी कलावंतांचा चक्रीभजनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत कलाकारांचा सन्मानपत्र, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
सरचिटणीस भारत पेंडूरकर यांनी प्रास्ताविकात गेल्या सात वर्षांत संघटनेचा झालेला विस्तार व केलेले कार्य समजावून सांगितले. त्यानंतर पखवाज अलंकार महेश सावंत, त्यांचे सहकारी व शिष्यवर्ग यांचा पखवाज सोलो वादनाचा कार्यक्रम झाला. यावेळी सरचिटणीस भारत पेंडूरकर, उपाध्यक्ष साबाजी सावंत, उपाध्यक्ष गीता नाईक, सहसचिव वैष्णवी लाड, सहसचिव रमेश गावडे, खजिनदार विश्वनाथ सरमळकर, कार्याध्यक्ष संतोष नागवेकर, सदस्य रामचंद्र सावंत, नितीन सावंत, सुरेश कांबळी, सतीश कांबळी व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. भारत पेंडूरकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
---
‘जिल्ह्यात अनेक कलाक्षेत्रे’
परब पुढे म्हणाले, ‘‘सिंधुदुर्ग जिल्हा हा विविध कलांचा, सांस्कृतिक परंपरेचा वारसा जोपासत आहे. अनेक कलाक्षेत्रे या ठिकाणी आहेत. या कलाकारांच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्याचा नावलौकिक केवळ राज्यातच नव्हे तर देशपातळीवर झाला आहे. शासनाच्या कलाकारांसाठी विविध योजना आहेत. त्या योजनांचा प्रत्येक कलाकाराला लाभ मिळाला पाहिजे. प्रत्येक कलाकार संघटित होणे तेवढेच महत्त्वाचे आहे. कलाकारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्वांनी संघटित व्हा.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.