अपघातांमुळे कुंभार्ली घाटात वाहतूक कोंडी
अपघातांमुळे कुंभार्ली घाटात वाहतूक कोंडी
वारंवार घडतात घटना ; प्रशासनाकडून तात्काळ कार्यवाही अपेक्षित
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १८ : कुंभार्ली घाटातील रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली असरी तरीही घाटातील अपघाताची मालिका अजून संपलेली नाही. घाटात मालवाहू ट्रक बंद पडणे, चारचाकी वाहनांचे अपघात हे प्रकार सुरूच आहेत. त्यामुळे घाटात वारंवार वाहतूक कोंडीही होत आहे. सोमवारी एका अवघड वळणावर ट्रकला अपघात झाल्यामुळे वाहतूककोंडीला सामोरे जावे लागले. अपघातग्रस्त ट्रक बाजूला करण्यासाठी चोविस तास शर्थीचे प्रयत्न सुरू होते.
कुंभार्ली घाटातील अपघातामधील ट्रक काढण्यासाठी क्रेन बोलावण्यात आली. ती रस्त्यावर उभी केल्यामुळे वारंवार वाहतूक कोंडीचा सामना प्रवाशांना करावा लागत होता. कुंभार्ली घाट पावसाळ्यात पूर्णपणे खराब झाला होता. घाटात जागोजागी मोठे खड्डे पडल्यामुळे त्या खड्ड्यात वाहने आदळून बंद पडत होती. त्यामुळे पावसाळ्यात या रस्त्यावर वारंवार वाहतूक कोंडीचा सामना प्रवाशांना करावा लागत होता. पावसाळ्यानंतर काही दिवसाने घाटातील खड्डे बुजवण्यात आले. त्यामुळे वाहतूक सुरळीत होईल, अशी अपेक्षा होती; मात्र घाटात अपघाताचे प्रकार सुरूच आहेत. सोमवारी संध्याकाळी पावणेसहा वाजता चिपळूणहून पुण्याकडे जाणाऱ्या ट्रकला घाटात अपघात झाला. हा ट्रक कापसाला दिघेवाडी येथील अमित दिलीप कांबळे यांच्या मालकीचा आहे. मुरादपूर कुंभारवाडी येथील सचिन सुरेश शिरकर हा चिपळूण ते पुणे ट्रक चालवत असताना कुंभार्ली घाटात आल्यानंतर त्याच्या ट्रकला अपघात झाला. यामध्ये ट्रकचालकाला गंभीर दुखापत झाली असून, ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. हा अपघात झाल्यानंतर काही काळ घाटातील वाहतूक थांबली होती. शिरगाव पोलिस ठाण्याचे कर्मचारी आल्यानंतर त्यांनी वाहतूक सुरळीत केली. त्यानंतर ट्रक काढण्यासाठी क्रेन बोलावण्यात आली. ही क्रेन रस्त्यावरच उभी करण्यात आली होती. त्यामुळे वाहतुकीमध्ये अडथळा येत होता. सोमवारी सायंकाळी उशिरापर्यंत ट्रक रस्त्यावरून हटवण्यात आला नाही. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला. मंगळवारी सकाळी ट्रक हटवण्यास सुरवात झाली तेव्हा दोन्ही बाजूने वाहनांची रांग लागली होती. घटनास्थळावरून पोलिस वाहतुकीचे नियोजन करत होते. त्यामुळे वाहनचालकांना फार काळ कोंडीत अडकावे लागले नाही.
---
कोट
कुंभार्ली घाटाची दुरुस्ती झाली आहे. त्यामुळे रस्ता मोकळा आहे. त्याचा फायदा घेऊन वाहनचालक बेदरकारपणे वाहने चालवतात. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहेत. या मार्गावरून अवजड मालाची वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते. त्याचबरोबर खासगी वाहनेही चालतात. त्याचा विचार करून सर्वांनी वाहन चालवले पाहिजे. अपघात होणार नाही, याची काळजी प्रथम वाहनचालकांनी घेतली पाहिजे
- मंगेश वाजे, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, चिपळूण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

