सदर-रोज म्हणा मातृदेवो भव

सदर-रोज म्हणा मातृदेवो भव

Published on

rat19p1.jpg

धनंजय चितळे

संतांचे संगती - लोगो

इंट्रो
सर्व संतचरित्रांचा बारकाईने अभ्यास केला तर आपल्या लक्षात येते की, या संतांनी देवांवर आपल्या श्रीसद्गुरूंवर अनन्यतेने उत्कट प्रेम केले याशिवाय त्यांनी आपल्या आईवर खूप प्रेम केले म्हणूनच हे संत देवांना मातृस्वरूपात पाहतात. ते पांडुरंगांना विठाई माऊली म्हणतात, श्री ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानोबा माऊली म्हणतात. आजच्या लेखांमध्ये आपण संतचरित्रातील मातृगौरवाचा विचार करणार आहोत.
- धनंजय चितळे, चिपळूण
--
रोज म्हणा मातृदेवो भव

भगवत्पूज्यपाद आद्य शंकराचार्य यांनी बालवयातच संन्यासग्रहण केला त्या वेळी त्यांनी आईला वचन दिले होते की, तुझ्या अंतकाळी मी उपस्थित असेन आणि तुझे अंत्यसंस्कार मी स्वतः करेन. काही वर्षांनंतर जेव्हा मातोश्री आर्यांबा शेवटच्या घटका मोजू लागल्या तेव्हा आचार्य स्वतः उपस्थित झाले. त्यांनी आपल्या आईला भगवान श्री विष्णूंचे दर्शन घडवले आणि तिच्या निधनानंतर सर्व समाजाचा विरोध डावलून तिचे अंत्यसंस्कार स्वतः केले. एकदा श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांना एकाने विचारले की, आपण आपल्या आईबद्दल काही सांगाना. त्यावर श्री महाराज म्हणाले, मी काय सांगू एकच सांगतो. ज्या अर्थी झाडाला आंबा लागला आहे त्या अर्थी झाड आंब्याचे आहे म्हणजेच श्री महाराज ज्याप्रमाणे नामात मुरले होते, अखंड नाम घेत होते त्याचप्रमाणे त्यांच्या आई गीताबाई या सुद्धा नामस्मरणात मग्न होत्या. स्वामी विवेकानंद शिकागोची धर्म परिषद गाजवून पुढे तीन वर्ष युरोपात काम करून भारतात परत आले तेव्हा कलकत्तावासियांनी त्यांची मोठी मिरवणूक काढली. ही मिरवणूक त्यांच्या घराजवळून जात असताना कोणीतरी त्यांना सांगितले की, तुमची आई मिरवणूक पाहत उभी आहे. स्वामी विवेकानंदांनी रथावरून खाली उडी मारली ते धावत आईजवळ गेले. आईच्या पायावर डोके ठेवले आणि नंतर तिचा पदर आपल्या डोक्यावर घेतला व म्हणाले, आता मी खरा विश्वविजयी आहे. संतांच्या चरित्रामधील आईचे स्थान किती उच्च आहे, हे सांगण्यासाठी या कथा पुरेशा आहेत एका रामायणात प्रभू श्रीरामचंद्र आणि लक्ष्मण यांचा संवाद आला आहे, यामध्ये श्री रामचंद्र म्हणतात.
अपि स्वर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोचते।
जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरियसी ।। अर्थात, हे लक्ष्मण जरी ही लंका सोन्याची असली तरी मला ती आवडत नाही. आई आणि मातृभूमी ही स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहेत. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्रांचा आदर्श सर्व संतांपुढे असल्यामुळे तेही आदराने मातृसेवा करतात. समर्थ श्री रामदास स्वामींनी दासबोधाच्या 17व्या दशकातील दुसऱ्या समासात आईची महती सांगणारी सुंदर ओवी लिहिली आहे. ते म्हणतात,
वीट नाही कंटाळा नाही ।
आळस नाही तिटकारा नाही।
इतुकी माया कोठेची नाही। माते वेगळी।।
आजच्या काळात मात्र मातृभक्ती गौणस्थानावर गेलेली दिसते. आपल्या आई-वडिलांची सेवा करणारा श्रावण, पुंडलिक, कुकुट ऋषी, कौंडिण्य ऋषी मुलांना माहीतच नाहीत. भारतीय संस्कृतीतील मातृसेवेचे हे आदर्श पुन्हा एकदा पुढच्या पिढीसमोर आले पाहिजेत. श्यामची आई, विनोबांची आई, मातोश्री पार्वतीदेवी देशपांडे यांसारख्या थोरमातांची चरित्रे लोकांसमोर पुन्हा पुन्हा मांडायला हवीत. आपल्या देवांना जी नावे आहेत त्यातील अनेक नामें आईवरून आली आहेत. जसे भगवान श्रीकृष्ण देवकीनंदन या नावानेही ओळखले जातात, श्रीगणेशांना पार्वतीनंदन तर श्रीमारूतीरायांना अंजनीसुत किंवा आंजनेय म्हटले जाते. भगवान श्रीपरशुरामांचा जयजयकार करताना रेणुकानंदन श्री भार्गवराम महाराज म्हणतात. स्वतः साठी तयार केलेल्या भूप्रदेशाला श्रीपरशुराम आपल्या आईच्या कुंकणा या नावावरूनच कोकण हे नाव देतात हा मातृगौरवच नव्हे काय? म्हणूनच, आपण वर्षातून एकदा मदर्स डे साजरा न करता रोजच कृतज्ञतेने म्हणावे, मातृदेवो भव.

(लेखक संत आणि संस्कृतीचे अभ्यासक आहेत)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com