आंगणेवाडीत पाच टन कचरा संकलित

आंगणेवाडीत पाच टन कचरा संकलित

Published on

47676

आंगणेवाडीत पाच टन कचरा संकलित

मंदिर परिसराची स्वच्छता; जिल्हा प्रशासनाच्या मोहिमेस प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २५ : आंगणेवाडीतील श्री भराडी देवीची यात्रा शनिवारी (ता. २२) झाली. त्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम राबवित सुमारे ५ टनपेक्षा जास्त कचरा संकलित करत मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आला.
राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो भाविकांनी भराडी देवीचे दर्शन घेतले. जत्रेच्या निमित्ताने व्यावसायिकांद्वारे हॉटेल, गृहोपयोगी साधने, कपडे, भांडी, खेळाचे साहित्य, मालवणी खाजा, शीतपेय असे शेकडो स्टॉल उभारले होते. श्री देवी भराडी जत्रोत्सवाला लाखोंचा जनसागर आणि शेकडो स्टॉल आदीमुळे अर्थातच मोठ्या प्रमाणात कचराही निर्माण झाला होता. जत्रा झाल्यानंतर तेथील परिसर स्वच्छ करण्याच्या सूचना पालकमंत्री नीतेश राणे तसेच जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी दिल्या होत्या. त्यानुसार सोमवारी (ता. २४) आंगणेवाडी येथे स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले.
या मोहिमेत मालवण नगरपरिषद, सावंतवाडी नगरपरिषद, वेंगुर्ले नगरपरिषद, कणकवली नगरपंचायत, देवगड-जामसंडे नगरपंचायत व कुडाळ नगरपंचायतीचे एकूण ४५ कर्मचारी सहभागी झाले. कचरा वाहतुकीसाठी नगरविकास विभागाकडून एकूण ७ घंटागाड्या उपलब्ध केल्या होत्या. सकाळी ९.३० वाजता कर्मचारी स्वच्छतेसाठी आवश्यक सामग्रीसह आंगणेवाडी येथे हजर झाले. त्यानंतर मालवण नगरपरिषद कार्यालयीन अधीक्षक महेश परब, सावंतवाडी नगपरिषद स्वच्छता निरीक्षक पांडुरंग नाटेकर, कणकवली नगरपंचायत स्वच्छता निरीक्षक विनोद सावंत, आंगणेवाडी विकास मंडळाचे कार्याध्यक्ष सीताराम आंगणे व बिळवस ग्रामपंचायत, ग्रामसेवक युगल प्रभुगावकर यांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहिमेस प्रारंभ केला. आंगणेवाडी विकास मंडळाचे कार्याध्यक्ष श्री. आंगणे व बिळवस ग्रामपंचायत, ग्रामसेवक श्री. प्रभुगावकर यांनी कचरा संकलनासाठी आवश्यक पिशव्या व झाडू तसेच मास्क उपस्थितांना देण्यात आले. संविता आश्रमचे स्वयंसेवक, दादासाहेब वराडकर कॉलेज कट्टाचे ६० विद्यार्थी, आर. पी. बागवे हायस्कूलचे २० विद्यार्थी, प्राथमिक शाळा, वरवडेचे ५ विद्यार्थी तसेच आंगणेवाडी ग्रामस्थही सहभागी झाले.
दरम्यान, आंगणेवाडी विकास मंडळ, मुंबई यांच्याकडून स्वच्छता मोहिमेत सहभागी सर्व अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थेचे पदाधिकारी तसेच नागरिक या सर्वांसाठी सकाळी ११ वाजता अल्पोपहार, दुपारी २ वाजता मंडळाकडून जेवणाची व्यवस्था केली. सकाळी १० वाजल्यापासून दुपारी ३ वाजेपर्यंत चाललेल्या स्वच्छता मोहिमेत उन्हाची तीव्रता लक्षात घेता मंडळाकडून सर्वांना पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था केली होती. स्वच्छता मोहीम संपल्यानंतर आंगणेवाडी विकास मंडळाचे कार्याध्यक्ष बाळा आंगणे, कमलाकर आंगणे, समीर आंगणे, दिनेश आंगणे, प्रसाद आंगणे, सचिन आंगणे, बाळकृष्ण आंगणे यांनी उपस्थितांना श्री भराडी देवीचा प्रसाद व पेन वाटप केले. जिल्हा सह-आयुक्त विनायक औंधकर, मालवण मुख्याधिकारी संतोष जिरगे व सर्व सहभागी पालिकांचे मुख्याधिकाऱ्यांचे आभार मानले.
---
कचरा वाहतुकीसाठी सात गाड्या
प्रारंभी स्वच्छता निरीक्षक पांडुरंग नाटेकर, विनोद सावंत, ग्रामसेवक युगल प्रभुगावकर यांनी संपूर्ण परिसराचा आढावा घेऊन उपस्थितांचे वेगवेगळे गट करून त्यांना परिसर वाटून दिले. जमा झालेला कचरा पिशव्यांमध्ये भरून पालिकांच्या घंटागाड्यांतून ग्रामपंचायत व आंगणेवाडी विकास मंडळाने नेमून दिलेल्या जागेत एकत्र जमा केला. कचरा वाहतुकीसाठी जिल्ह्यातील पालिकांकडून ७ गाड्या उपलब्ध करून दिल्या होत्या. या गाड्यांमधून कचरा नियोजित स्थळी नेला. या स्वच्छता मोहिमेत सुमारे ५ टनपेक्षा जास्त कचरा संकलित करून मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com