दापोलीच्या राजकारणात मोठी उलथापालथ
४७६९६
दापोलीच्या राजकारणात उलथापालथ
उपनगराध्यक्ष रखांगे शिवसेनेच्या वाटेवर : रामदास कदम यांच्याशी चर्चा
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. २५ ः दापोली नगरपंचायतीच्या राजकारणातील किंगमेकर उपनगराध्यक्ष खालिद रखांगे यांनी कोकणचे नेते रामदास कदम यांची समर्थकांसह भेट घेतल्याने दापोलीच्या राजकारणात उलथापालथ पाहावयास मिळणार आहे. खालिद रखांगे यांच्यासह अजून किती नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मूळचे शिवसेनेचे असलेल्या रखांगे यांनी राजकीय जीवनाला माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीची वाट पकडली व राष्ट्रवादीतून ते नगरसेवकही झाले. त्या वेळी खासदार सुनील तटकरे यांच्या जवळचे सहकारी म्हणून त्यांची ओळख होती. माजी आमदार संजय कदम यांच्या प्रेमापोटी त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला होता; मात्र २०२४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर दापोली मतदारसंघामध्ये फार मोठ्या प्रमाणात बदल होऊ लागले आहेत. राज्यमंत्री म्हणून योगेश कदम यांचा शपथविधी झाल्यावर दापोली मतदारसंघात अनेक पदाधिकारी शिवसेनेच्या संपर्कात आहेत. राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेले व त्यानंतर उद्धव ठाकरे गटामध्ये प्रवेश केलेल्या पाच नगरसेवकांनी राज्यमंत्री योगेश कदम यांच्या वाढदिवसादिवशी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या वेळी लवकरच शिवसेनेचा भगवा नगरपंचायतीवर फडकेल, असा विश्वास योगेश कदम यांनी व्यक्त केला होता. त्यानंतर काही दिवसांतच उपनगराध्यक्ष रखांगे यांनी अजिम चिपळूणकर, फिरोज गिलगिले, स्वीकृत नगरसेवक नादीर रखांगे, नगरसेविका रिया सावंत यांच्यासह शिवसेना नेते रामदास कदम यांची भेट घेतली. त्यानंतर या सर्वांचा प्रवेश हा शिवसेनेत होणार, हे निश्चित झाले आहे.
नगराध्यक्षांसह
तिघांबाबत उत्सुकता
दरम्यान, नगराध्यक्षा ममता मोरे, नगरसेवक रवींद्र क्षीरसागर, नगरसेवक आरिफ मेमन नेमकी काय भूमिका घेणार, हे समजू शकले नाही. तसेच उद्धव ठाकरे शिवसेनेत आणखी कोण पदाधिकारी रखांगे यांच्यासमवेत जाणार, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोट
मंगळवारी उपनगराध्यक्ष खालिद रखांगे व शिवसेनेचे नेते रामदास कदम यांची बैठक झाली. २८ फेब्रुवारीला खालिद रखांगे व त्यांच्या समर्थकांचा शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश होणार आहे. लवकरच दापोली नगरपंचायतीत शिवसेनेचा नगराध्यक्ष होईल.
- प्रसाद ऊर्फ पप्पू रेळेकर, शहरप्रमुख शिवसेना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

