सिंधुदुर्गात चित्रित ''भेरा'' उद्या प्रदर्शित
47777
सिंधुदुर्गात चित्रित ‘भेरा’ उद्या प्रदर्शित
जिल्ह्यातील कलावंतांचा सहभागः विविध पुरस्कारांचा मानकरी
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २६ः जिल्ह्यात चित्रीकरण झालेला आणि येथील कलाकारांच्या भूमिका असलेला ‘भेरा’ हा चित्रपट शुक्रवारी (ता.२८) सायंकाळी ६ वाजता वेंगुर्लेतील नाटककार मधुसूदन कालेलकर नाट्यगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे. सध्या फक्त सिंधुदुर्गातील नाट्यगृहांमध्ये तो प्रदर्शित होणार असून राज्यात २१ मार्चपासून पाहता येईल, अशी माहिती चित्रपटाचे दिग्दर्शक श्रीकांत प्रभाकर यांनी दिली.
येथील हॉटेल लाईम लाईट येथे पत्रकार आणि यु ट्यूब इन्फ्लुएन्सर यांच्यासाठी या चित्रपटाचा खास शो आयोजित केला होता. त्यानंतर श्रीकांत प्रभाकर आणि चित्रपटाच्या टीमने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पटकथा आणि संवाद लेखक प्रसाद खानोलकर (पिंगुळी), चित्रपटात ‘विष्णू’ ही मूक बधिर मुलाची मध्यवर्ती भूमिका साकारणारे देवगड येथील दीपक जोईल, ‘अनीबाई’ ही मध्यवर्ती भुमीका साकारणाऱ्या कुडाळच्या श्रद्धा खानोलकर, तसेच प्रमोद कोयंडे (देवगड), प्राजक्ता नेरूरकर (नेरुर), आकांक्षा खोत (म्हापण), गौरव राऊळ (वेंगुर्ला), विवेकानंद वाळके (कणकवली) याच बरोबर या टीममधील तन्मयी कांबळेकर, भैरवी कुलकर्णी आणि सुहास खानोलकर असे चित्रपटातील कलाकार आणि चित्रपटाची टीम उपस्थित होती.
यावेळी श्री. प्रभाकर म्हणाले, ‘‘मी चित्रपटाच्या दिग्दर्शनासोबतच पटकथा, संवाद लेखन, कला दिग्दर्शन ही बाजू सांभाळली आहे. श्री वैजप्रभा चित्र निर्मित ''भेरा'' हा असा पहिला मालवणी चित्रपट आहे जो नॅशनल आणि इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सादर झाला आहे. चेन्नई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये या चित्रपटाचा प्रीमियर झाला. पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये पहिल्या जवळजवळ ५० मराठी चित्रपटातून केवळ सातच मराठी चित्रपट निवडले जातात. त्यामध्ये ‘भेरा’ ची निवड झाली. त्यामध्ये बेस्ट डिरेक्टर आणि बेस्ट आर्ट डिरेक्टर अशी दोन पारितोषिके या चित्रपटाला मिळाली. सगळ्यात अभिमानाचा क्षण म्हणजे असा होता की, महाराष्ट्र शासन दरवर्षी फ्रान्समध्ये होणाऱ्या कान्स फिल्म मार्केटसाठी मराठीतील तीन चित्रपट पाठवते. त्यामध्ये ‘भेरा’ चित्रपटाचा समावेश होता. तसेच जर्मनीमध्ये होणाऱ्या स्टुटगार्ड एशियन फिल्म फेस्टिवलमध्ये सुद्धा हा चित्रपट दाखवण्यात आला. अलीकडेच झालेल्या २१ व्या थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिव्हल मध्ये श्रद्धा खानोलकर याना ‘अनीबाई’ च्या भूमिकेसाठी उत्कृष्ट अभिनेत्रींचे पारितोषिक मिळाले. असा हा फेस्टिव्हलचा जवळजवळ दीड वर्षाचा प्रवास तो प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. उद्या (ता.२८) पासून सिंधुदुर्गातील नाट्यगृहांमध्ये हा चित्रपट सुरुवातीला प्रदर्शित होणार आहे.’’
चौकट
तालुकास्तरावरील नाट्यगृहांत आयोजन
पूर्णपणे मालवणी चित्रपट, स्थानिक कलाकार आणि येथील लोकेशनवर चित्रित झालेला हा चित्रपट आहे. तसेच सिंधुदुर्गात नाट्यगृहांचा पर्याय जास्त उपलब्ध आहे. त्यामुळे हा चित्रपट सुरुवातीला नाट्यगृहात दाखवण्यात येणार आहे. प्रत्येक शुक्रवार, शनिवार आणि रविवार प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी हा चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. वेंगुर्लेपासून याची सुरुवात होणार आहे. नंतर सावंतवाडी, कुडाळ, देवगड, मालवण, कणकवली येथे हा चित्रपट दाखविला जाणार आहे. आणि त्याच्यानंतर साधारण तीन आठवड्यांनी २१ मार्चपासून महाराष्ट्रातील मल्टिफ्लेक्समध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे श्री. प्रभाकर म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

