Ratnagiri News
Ratnagiri News

अभ्यास कसा करावा तेही सांगती संत

Published on
Summary

भारतीय तत्त्वज्ञानातील महत्वाचा ग्रंथ म्हणजे श्रीमद्भगवद्गीता. या ग्रंथामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अभ्यासाचे महत्व सांगितले आहे.

- धनंजय चितळे, चिपळूण

स्वतः श्री समर्थांनी बारा वर्षे टाकळी येथे श्रीराम जय राम जय जय राम या त्रयोदशाक्षरी मंत्राचे तसेच गायत्रीमंत्राचे पुरश्चरण केले. याच काळात दुपारच्यावेळी त्यांनी संपूर्ण श्री वाल्मिकी रामायण लिहून काढले. आजही श्री समर्थ वागदेवता मंदिर धुळे या ठिकाणी ही पोथी पाहता येते. त्यातील अक्षर पाहिले की, उत्तम अक्षर कशाला म्हणतात ते आपल्याला कळते. आधी केले मग सांगितले, या न्यायाने सर्वच संतांनी प्रथम सद्विचार स्वतः समजून घेतले, ते आपल्या आचरणात आणले आणि मगच लोकांना त्याचा उपदेश केला. बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले या वचनाप्रमाणे संत जसे बोलतात तसे करतात म्हणून त्यांना नित्यशरण जावे.

भारतीय तत्त्वज्ञानातील महत्वाचा ग्रंथ म्हणजे श्रीमद्भगवद्गीता. या ग्रंथामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अभ्यासाचे महत्व सांगितले आहे. गीतेच्या आठव्या अध्यायात आठव्या श्लोकात ते म्हणतात, अभ्यासयोगयुक्तेन चेतसा नान्यगामिना।परमं पुरुषं दिव्यं याती पार्थानुचिंतन्।।यावर भाष्य करताना श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तेवी सदभ्यासे निरंतर। चित्तासी परमपुरुषाची मोहर। लावी मग हे शरीर । राहो अथवा जावो।।भगवान श्रीकृष्ण श्रीमद्भगवद्गीतेच्या बाराव्या अध्यायामध्ये याच अभ्यासाबद्दल नवव्या आणि दहाव्या श्लोकांमध्ये सांगतात.

या श्लोकांवर भाष्य करताना श्री ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, म्हणोनी अभ्यासासी काही । सर्वथा दुष्कर नाही ।या लागी माझ्या ठाई ।अभ्यासे मिळ ।।अर्थात, अभ्यास केला तर कोणतीही गोष्ट मिळणे अशक्य नाही म्हणून हे अर्जुना तूही अभ्यासाने माझ्या ठायी ये. जगद्गुरू श्री तुकाराम महाराजही अभ्यासाबद्दल सांगतात, असाध्य ते साध्य करिता सायास कारण, अभ्यास तुका म्हणे। जे मिळण्यास अवघड आहे ते अभ्यासाने मिळवता येते. आणखी एका अभंगात ते म्हणतात, तुका म्हणे तेच पाहिजे अभ्यास नित्य नवा दिस जागृतीचाकेवळ ऐकणे, वाचणे, लिहिणे म्हणजे अभ्यास नव्हे. या अभ्यासाच्या काही पायऱ्या आहेत. यांच्या माध्यमातून आपण जे समजून घेतले ते कृतीत आणण्याचे प्रयत्न करणे म्हणजे खरा अभ्यास करणे होय.

श्री समर्थ रामदास स्वामी आपल्या शिष्यांना या अभ्यासाचे महत्व सांगताना म्हणतात. अभ्यासे प्रकट व्हावे। नाहीतर झाकून असावे। प्रकट होऊनी नासावे। हे बरे नव्हे।।हा अभ्यास कसा करावा याबद्दल समर्थ म्हणतात, कष्टेविण राज्य नाही । कष्टेविण विद्या नाही। केल्याविण होत नाही । साध्य जनी।। याचबद्दल स्वामी विवेकानंद म्हणतात, आपल्यासमोर एखादी कल्पना असावी. त्याचा आपण ध्यास घ्यावा आणि ती मिळेपर्यंत विश्रांती घेऊ नये. मूळ वाक्य असे आहे, ‘take up one idea live in it, leave all other ideas behind sleep not till the goal is reached. उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्ननिबोधत !’आजच्या कटपेस्टच्या जमान्यात आपण चिकाटीने अभ्यास करणे, मूळ संदर्भ ग्रंथ पाहणे विसरून जातो आहोत. आपल्या नित्यपठणातील स्तोत्रांचा, आरत्यांचा मूळ पाठ कसा आहे तेही आपण पाहिनासे झालो आहोत. त्यांचे अर्थ पाहणे, त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करणे याची आपण कल्पनाही करत नाही म्हणूनच कदाचित श्री तुकाराम महाराज अर्थे लोपली पुराणे नाश केला शब्दज्ञाने, असे म्हणून गेले असावेत. आता मात्र आपण नेटाने अभ्यासाला लागूया. तसा दृढ निश्चयच करूया.. पटतंयना.

(लेखक संत आणि संस्कृतीचे अभ्यासक आहेत. )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com