‘किसान क्रेडिट’बाबत प्रतीक्षाच

‘किसान क्रेडिट’बाबत प्रतीक्षाच

Published on

49089

किसान क्रेडिट कार्डबाबत प्रतीक्षाच

‘कृषी’ची योजना; जिल्ह्यात पंधरा हजार जण वंचित


सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ४ ः पीएम किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत जिल्ह्यात २५ हजार २१६ लाभार्थींना ऑनलाईन क्रेडिट कार्ड प्राप्त झाली आहेत. अजूनही १५ हजारांहून अधिक लाभार्थी या योजनेच्या प्रतीक्षेत आहेत. काही लाभार्थ्यांपर्यंत ही योजना अद्यापही पोहोचली नसल्याचे स्पष्ट होत आहे.
केंद्र आणि राज्याने पीएम किसान क्रेडिट कार्ड योजना अंतर्गत कृषीच्या सर्व योजनांचा लाभ एका छताखाली देण्यासाठी ही योजना अंमलात आणली आहे. कृषी योजनांचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी केंद्र आणि राज्याने ही योजना अंमलात आणली. या योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३५ हजार ५३० लाभार्थी संख्या निश्चित असून प्रत्यक्षात किसान क्रेडिट कार्डधारक २३ हजार ५६३ लाभार्थी आहेत. आतापर्यंत २३ हजार २१६ लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. अनेक शेतकऱ्यांनी महा ई-सेवा केंद्र किंवा ऑनलाईन पद्धतीने आपला अर्ज सादर केला असला तरी तलाठी स्तरावर अजूनही अर्जांची छाननी पूर्तता करून फेर अर्ज संबंधित महा ई-सेवा केंद्रांकडे पाठविण्यास विलंब होत असल्यामुळे अद्यापही मोठ्या प्रमाणात शेतकरी पीएम किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या लाभासाठी निश्चित झालेले नाहीत. सिंधुदुर्ग जिल्हा बँक, बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक किंवा अन्य राष्ट्रीयकृत बँकांच्या माध्यमातून सुमारे २४ ते २५ हजार शेतकरी या योजनेत समाविष्ट असले तरी अजूनही सुमारे १० हजार लाभार्थी शेतकरी ऑनलाईन प्रकरण करण्यापासून वंचित राहिले आहेत. काही शेतकरी याबाबत कोणतीही माहिती न मिळाल्यामुळे योजनेपासून लांबच राहिले आहेत.
--
प्रकरणे तलाठीस्तरावरच धूळ खात
केंद्र आणि राज्याच्या पीएम किसान क्रेडिट कार्ड योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळावा, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ऑनलाईन पद्धतीने दाखल झालेल्या प्रकरणांची तलाठीस्तरावर पूर्तता करून तत्काळ ऑनलाईन महा ई-सेवा केंद्राने हे कार्ड तयार केले, त्या केंद्राकडे पुन्हा पाठविले जाते; मात्र अनेक प्रकरणे आजही तलाठी स्तरावरच धूळ खात पडली आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत.
---
..तोपर्यंत लाभ नाहीच
सुमारे २४ हजार २१६ प्रकरणे जिल्हाभरात तयार झाली असून जोपर्यंत तलाठ्यांकडून छाननी करून निश्चिती होत नाही, तोपर्यंत या लाभार्थींना पीएम किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध होणार नाही. त्यामुळे या प्रकियेला गती दिली तरच शेतकरी पीक विमा किंवा प्रधानमंत्री किसान, नमो शेतकरी सन्मान योजनेसारख्या अनेक योजनांचा लाभ मिळणार आहे.
---
पालकमंत्र्यांकडूनही सूचना
सिंधुदुर्ग जिल्ह्यात या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी, यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री नीतेश राणे, जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या माध्यमातून संबंधित तलाठी आणि महसूल अधिकाऱ्यांना जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेतून कार्ड उपलब्ध करून द्यावीत, अशा सूचना दिल्या आहेत.
----
३१ मार्चपूर्वी कार्ड द्या!
जिल्ह्यातील शंभर टक्के शेतकऱ्यांना पीएम किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध व्हावे, यासाठी ग्रामपंचायत स्तरावर याद्याही पाठविल्या आहेत. काही ठिकाणी कॅम्पही घेण्यात आले; परंतु त्यांच्या माध्यमातून तयार झालेली ऑनलाईन अर्जांची पूर्तता करून ३१ मार्चपूर्वी किसान क्रेडिट कार्ड प्रत्यक्ष शेतकऱ्याला मिळावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
---
कोट
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पीएम किसान क्रेडिट कार्ड योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेची प्रचार प्रसिद्धीही केली आहे; मात्र काही शेतकऱ्यांकडून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता वेळीच होत नसल्याने विलंब होत आहे. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ व्हावा, या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत.
- ज्ञानेश्वर बडे, कृषी उपसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय सिंधुदुर्ग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com