संगमेश्वर-रस्त्याच्या दुतर्फा लावलेली झाडे करपली
48990
रस्त्याच्या दुतर्फा लावलेली झाडे करपली
संगमेश्वर-देवरूख रस्ता; उन्हाळ्यात लागवडीची घाई का?
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ४ ः संगमेश्वर-कोल्हापूर राज्यमार्गावर आणि संगमेश्वर ते देवरूखदरम्यान भरउन्हात रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्यात येत आहेत. कडाक्याच्या उन्हामुळे जी झाले लावली आहेत ती करपून जात आहेत. सध्याच्या परिस्थितीत वृक्षलागवड करण्याचा शासनाचा नक्की हेतू काय, असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. ही लागवड योग्य हंगामात केली गेली तर त्याचा उपयोग होईल, अशी मागणी संगमेश्वरवासियांनी केली आहे.
संगमेश्वर ते देवरूख रस्त्यावर झाडे लावण्याचे काम सुरू झाले आहे. संगमेश्वर ते कोसुंबदरम्यान काही रोपं लावूनही झाली आहेत. बुरंबी येथे झाड लागवडीचे काम सुरू आहे; मात्र, ती लावताना योग्य हंगाम, वेळ याचा विचार केला नाही. रस्त्याच्या दुतर्फा खड्डे मारून त्यात झाडे लावली जात असून, काही झाडे रखरखत्या उन्हाने जगण्यापूर्वीच करपून गेली आहेत. कडक, रणरणत्या उन्हात व चुकीच्या हंगामात झाडे लावून प्रशासन काय साध्य करत आहे, अशी चर्चा संगमेश्वरमध्ये रंगली आहे.
ही झाडे जगवण्यासाठी पाणी दिले जात असले तरीही एवढ्या उष्ण वातावरणात ती टिकाव धरतीलच असे नाही. झाडाच्याभोवती पाणी साठवणूक होईल, अशीही व्यवस्था केलेली नाही. दुतर्फा लावलेल्या झाडांसभोवार मोठ्या प्रमाणात गवत असल्याने वणवा लागून झाडाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. या बाबींकडे आमदार शेखर निकम यांनी लक्ष घालावे व चुकीच्या पद्धतीने अयोग्य हंगामात करण्यात येत असलेली झाडांची लागवड थांबवावी, अशी मागणी संगमेश्वरमधून केली जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने देवरूखपासून संगमेश्वरपर्यंत झाडे लावण्यासाठी जागोजागी खड्डे खोदले आहेत. बुरंबीपासून संगमेश्वरपर्यंत मारलेले दोन फूट खोलीचे खड्डे आजही तसेच आहेत. त्यामध्ये झाडे न लावल्याने रस्त्याच्या बाजूने पादचाऱ्यांना चालणेही कठीण झाले आहे.
चौकट १
शाखा अभियंत्यांचे आश्वासन हवेत
संगमेश्वर-देवरूख मार्गावर एका खासगी कंपनीने रस्त्याच्या बाजूने केबल टाकताना संपूर्ण बाजूपट्टीची दुर्दशा करून टाकली आहे. अनेक ठिकाणी गाईडस्टोन उखडून टाकलेले आहेत. रस्ता आणि बाजूपट्टीमध्ये उंची निर्माण झाल्यामुळे अपघाताची शक्यता आहे. पावसाळ्यात बाजूपट्टी खचण्याचा धोका असतानाही सार्वजनिक बांधकाम विभाग यावर कोणतीही कार्यवाही करत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग देवरूखचे शाखा अभियंता बुर्शे यांनी प्रत्येक पाच किमीचा भाग रोलर फिरवून समपातळीत करण्यात येणार असल्याचे सांगितले होते; मात्र अद्यापही रोलर फिरवणे सोडाच, केबल टाकताना उखडलेले गाईडस्टोनही बसवण्यात आलेले नाहीत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

