राजापूर-प्राणी, पक्ष्यांसाठी स्वतंत्र कुंड्या, पाणवठे

राजापूर-प्राणी, पक्ष्यांसाठी स्वतंत्र कुंड्या, पाणवठे

Published on

काही सुखद - ओळी

49051
49052
49053

प्राणी, पक्ष्यांसाठी स्वतंत्र कुंड्या, पाणवठे
खरवते ग्रामपंचायतीचा उपक्रम; ग्रामस्थांचाही सहभाग, पक्ष्यांसाठी घरट्यांची सोय
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ४ : गेल्या काही दिवसांमध्ये उष्मा वाढला असून, घराबाहेर पडणेही मुश्किल झाले आहे. त्यामुळे नैसर्गिक जलस्रोतामधील पाणी कमी होणार आहे. त्याचा फटका प्राणी-पक्ष्यांना बसेल. पिण्याच्या पाण्याबरोबर त्यांना खाद्यासाठीही भटकंती करावी लागणार आहे. हे लक्षात घेऊन खरवते ग्रामपंचायतीने ‘माझी वसुंधरा अभियानां’तर्गंत पक्षी अन् प्राण्यांसाठी पाणी आणि खाद्याच्या स्वतंत्र कुंड्या, पाणवठे, पक्ष्यांसाठी घरटी तयार केली आहेत. यामध्ये ग्रामपंचायतीला लोकसहभागाचीही साथ मिळाली आहे.
जागतिक वन्यजीवदिनाचे औचित्य साधून खरवते येथे झालेल्या कार्यक्रमात तयार करण्यात आलेले पाणवठे पशूपक्ष्यांसाठी खुले करण्यात आले. या वेळी सरपंच अभय चौगुले, ग्रामपंचायत अधिकारी नेहा कुडाळी, ग्रामपंचायत सदस्य जान्हवी माटल, पर्यावरणदूत भास्कर गुरसाळे, माजी सरपंच दयानंद चौगुले, दत्तात्रय उबाळे, मुख्याध्यापक विलास जाधव, किरण एकशिंगे, वनविभागाचे कुंभार, ग्रामपंचायत कर्मचारी देविदास उबाळे, संजय माटल, भक्ती माटल, चैत्रा गुरव, स्त्रीरत्न बचतगटाच्या महिला आदी उपस्थित होते.
मुबलक प्रमाणात पाऊस पडूनही मार्च-एप्रिल महिन्यातील वाढत्या उष्म्याचा नैसर्गिक जलस्रोतांवर प्रतिकूल परिणाम होतो. त्याचा फटका मानवी लोकवस्तीसह जंगलामध्ये मुक्तपणे विहार करणार्‍या प्राणी आणि पक्ष्यांनाही सहन करावा लागतो. पाणीटंचाईच्या काळात पशूपक्ष्यांची पाण्याअभावी बिकट होणारी स्थिती लक्षात घेऊन खरवते ग्रामपंचायतीच्यावतीने पाणी आणि अन्न (खाद्याची) कुंड्या तयार केल्या आहेत. पक्ष्यांसाठी घरटीही तयार केली आहेत. त्यासाठी सरपंच अभय चौगुले, उपसरपंच गौरव सोरप, ग्रामपंचायत सदस्य किशोर चौगुले, ग्रामपंचायत कर्मचारी देविदास उबाळे, संजय माटल यांनी विशेष मेहनत घेतली. केवळ ग्रामपंचायत नव्हे तर ग्रामस्थ भास्कर गुरसाळे, दयानंद चौगुले यांनीही पक्ष्यांसाठी घरटी अन् पाणवठे तयार केले आहेत. या उपक्रमामुळे टंचाईच्या काळात प्राणी आणि पक्ष्यांना पाणी अन् खाद्य उपलब्ध होणार आहे.

चौकट
लोकसहभागातून चार वनराई बंधारे
खरवते ग्रामपंचायतीने महिला बचतगट, ओणी पारेषण विभाग यांच्या सहकार्याने आणि लोकसहभागातून चार वनराई बंधारे बांधले आहेत. त्यामध्येही मुबलक पाणीसाठा झाला आहे. त्याचा उपयोगही पशूपक्ष्यांसह अन्य प्राण्यांना होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com