राजाभाऊ....पंडित म्हणायची गुस्ताखी आम्ही करणार

राजाभाऊ....पंडित म्हणायची गुस्ताखी आम्ही करणार
Published on
Summary

महाराष्ट्रभर फिरल्याने वेगवेगळ्या गायनशैलीच्या लागवडीच्या नोंदी सतत चढतच गेल्या. विविध ठिकाणी ओळखी झाल्या, गायन सेवा करता आली. त्यातून महाराष्ट्रभर त्यांचे चाहते वाढत गेले.

-अमित ओक, चिपळूण


राजाराम उर्फ राजाभाऊ शेंबेकर हे कोकणातील एक अष्टपैलू व्यक्तीमत्व. राजाभाऊ ‘जॅक ऑफ ऑल मास्टर ऑफ एव्हरीथिंग.’ गायन, तबला, हार्मोनियम, नाट्य अभिनय, ज्योतिषशास्त्र, औषधशास्त्र, वाहनदुरुस्ती-कसबी ड्रायव्हिंग आणि पाककला. जसं बोलतोस तसं गा, हा वसंतरावांचा कानमंत्र लक्षात ठेवून त्याच सहजतेने राजाभाऊ मैफल रंगवतात. राजाभाऊंनी शास्त्रीय व नाट्यसंगीतात प्रावीण्य, प्रभुत्व गाजवण्यापेक्षा निरतिशय प्रेम केले. गेली ४० वर्षे हीच निरपेक्ष भावना मनात ठेवून संगीक्षेत्रात स्वतःची राजाभाऊ शैली खुलवणाऱ्या-फुलवणाऱ्या कोकण गंधर्वाचा आज चिपळुणात त्यांचा सत्कार होत आहे. त्या निमित्ताने त्यांचा शिष्य म्हणतोय, राजाभाऊंना पंडित म्हटलेले आवडत नाही; पण याना पंडित नाही तर मग कोणाला म्हणायचे? त्यामुळे पंडित म्हणायची गुस्ताखी आम्ही करणार.

कोणाचीही नक्कल न करता प्रत्येकाची बलस्थाने अभ्यासायची आणि त्यातलं चांगलं काय असेल ते उचलायचं ही विद्यार्थी वृत्ती. ती जोपासल्याने राजाभाऊ एकाचवेळी शरीराने गुरू आणि मनाने विद्यार्थी होऊ शकतात. (कै.) पं. जितेंद्र अभिषेकी, (कै.) पं. रामभाऊ मराठे, नूतन गंधर्व (कै.) अप्पासाहेब देशपांडे आणि दिवंगत राष्ट्रीय कीर्तनकार दत्तदास बुवा घाग, संगीत सौदागर पं. छोटा गंधर्व, पं. वसंतराव देशपांडे, पं. कुमार गंधर्व, बालगंधर्व, थोर ऑर्गन व पेटीवादक पं. गोविंदराव पटवर्धन यांना गुरूस्थानी मानून राजाभाऊंनी आपली संगीत कला फुलवली.
राजाभाऊ यांचे वैयक्तीक जीवन कधीच गाण्याप्रमाणे अलगद समेवर आलेले नाही. त्यांना तरुणपणासून सतत संघर्ष करावा लागला. छान षड्ज लावत तानपुरा धरण्याच्या वयात त्यांना ट्रकचालक म्हणून स्टेअरिंग धरावं लागलं. १९८४ पासून ३० वर्ष एसटी चालक म्हणून सोबत कायम राहिले. बारागावचे पाणी प्यायलेल्या राजाभाऊंचा गाण्याचा सातबारा मात्र कधीही कोरा राहिला नाही.

महाराष्ट्रभर फिरल्याने वेगवेगळ्या गायनशैलीच्या लागवडीच्या नोंदी सतत चढतच गेल्या. विविध ठिकाणी ओळखी झाल्या, गायन सेवा करता आली. त्यातून महाराष्ट्रभर त्यांचे चाहते वाढत गेले. ३० वर्षे विनाअपघात सेवा बजावत जवळपास हजारेक मैफली त्यांनी केल्या. राजाभाऊंनी जिद्द आणि गाण्याची आस या दोन गुणांचे इंधन भरून आपली गाण्याची सेवासुद्धा एसटीप्रमाणे विनाअडथळा साध्य केली. या सातबाऱ्यावर रसिकांच्या प्रेमाचा बोजा चढत गेला तो अजूनही चढतच आहे. रात्री चिपळूणवरून मुंबईला बस घेऊन जायची. मुंबईला पहाटे उतरून थोडाफार आराम करून कॅन्टीनमधला असेल तसा वडापाव, जळजळीत उसळपाव पोटात ढकलून मग दिवसभर मुंबईला शास्त्रीय संगीत ऐकण्यासाठी, नवीन टिपण्यासाठी वणवण करायची. रात्र झाली की, पुन्हा मुंबईहून चिपळूणला बस घेऊन यायचं.

राजाभाऊ सतत ३० वर्षे हे करत होते. सतत एसटी इंजिनची घरघर ऐकावी लागत असूनही शास्त्रीय संगीताने राजाभाऊंच्या कानात आणि मनात घर केलं होतं. चालक म्हणजे प फ ब भ म ची आणि संगीत म्हणजे सारेगमपची भाषा. या दोन्ही परस्परविरोधी घराण्यांचे संस्कार. त्यातला त्यांनी ओंकार निवडला म्हणूनच आपल्या मैफलीची सुरवात राजाभाऊ ‘जेथोनी उद्गार प्रसवे ओंकार’ या पदाने करत असावेत. पेटीसाथ करताना उगाच जास्त भात्या मारायचा नाही, तबलासाथ करताना फापटपसारा न वाजवता उत्तम ठेका द्यायचा आणि गाताना कुठल्या स्वरावर थांबा द्यायचा, मध्यम-पंचमावर ब्रेक कधी द्यायचा, आलापीवर गियर बदलत शेवटी तानांचा डबल टॉप ओढायचा या सूत्रबद्ध सवयीचा फायदा ड्रायव्हिंग करताना झाला असावा.

रामभाऊ आणि अभिषेकीबुवांना गुरू मानून राजाभाऊंनी स्वतःला एकलव्याप्रमाणे घडवले. साथीदारांना वाजवायला देत त्यांना प्रोत्साहन देत ते मैफल काबीज करतात. राजाभाऊ प्रत्येक व्हरायटी पेटीवादकाकडून वाजवून घेतात. त्यामुळे त्यांना साथ करताना साथीदारांसाठी एकीकडे गायकी अंगाने वादन करून गळा उतरवावा लागतो तर दुसरीकडे पोटात गोळा येतो. तबल्याचा ठेका पदानुसार कसा बांधायचा, कुठली लग्गी केव्हा वापरायची, तबलाबरोबर सुरांत लागलाय की नाही ते ओळखायची खुबी, शास्त्रीय आणि नाट्यगीत साथीला पेटी कशी वाजवायची, हे बारकावे शिकावे तर राजाभाऊंकडूनच.

गायनात तर हुकूमत, मोकळेपणा आणि आत्मविश्वास ठासून भरलेला. गायकांना शिकवताना त्यांची पट्टी काळी चार असेल तर राजाभाऊसुद्धा त्याच वरच्या पट्टीत गाऊन शिकवतात. त्यांना कोणत्याही पट्टीत गाणं सादर करण्याची अनोखी शैली लाभली आहे. एका रागातून दुसऱ्या रागात शिरण्याची कला राजाभाऊंना अवगत आहे. चिपळूण-रत्नागिरीत त्यांचे शिष्य गायन, वादनकलेत नैपुण्य दाखवत आहेत. त्यांच्या या गायन तपस्येला त्यांच्या कुटुंबीयांनीही भक्कम साथ दिली आहे. गंधर्व गायकीची परंपरा लाभलेल्या महाराष्ट्राला राजाभाऊंच्या रूपात गुणी कोकण गंधर्व ही नियतीने दिलेली भेट आहे.

(लेखक हार्मोनियम व ऑर्गनवादक डॉ. विद्याधर ओक व राजाभाऊ शेंबेकर यांचे शिष्य आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com