दापोली नगराध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव

दापोली नगराध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव

Published on

दापोली नगराध्यक्षांविरोधात ‘अविश्वास’
शिंदे शिवसेना आक्रमक ः ठाकरे गटाला आणखी एक धक्का
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. ४ ः दापोली नगरपंचायतीच्या ठाकरे शिवसेनेच्या नगराध्यक्षा ममता मोरे यांच्याविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वासाचा प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून सुरू असलेल्या ऑपरेशन टायगरचा दुसरा अंक येथे सुरू झाला आहे. त्यामुळे कोकणात ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसणार आहे.
एकेकाळी तत्कालीन पालकमंत्री अनिल परब यांच्या पुढाकाराने दापोली नगरपंचायतीत स्थापन झालेल्या सत्तेला मंत्री कदम यांनी हादरा दिला आहे. ठाकरे गटाच्या नगराध्यक्षा मोरे यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडला जाणार असून, त्यासाठी जिल्हा प्रशासनाला मंगळवारी (ता. ४) पत्र दिले आहे. आता नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष बदल निश्चित झाले आहे. जिल्हा प्रशासनाचे आदेश आल्यानंतर तातडीने बैठक लावली जाईल. ठाकरे गट आणि शरद पवार गटाच्या नगरसेवकांनी एकत्र येऊन १४ जणांचा एकत्र गट स्थापन केला आणि त्यांनी चार दिवसांपूर्वी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेच्या युवा नगरसेविका शिवानी खानविलकर यांच्याकडे या गटाचे नेतृत्व आहे. मात्र, यामध्ये मोरे यांचा समावेश नव्हता. मोरे यांच्यावर विश्वास ठराव संमत झाल्यास शिंदे शिवसेनेकडून नगराध्यक्षपदासाठी ज्येष्ठ नगरसेविका कृपा घाग व शिवानी खानविलकर यांची नावे असतील असा अंदाज आहे. नगराध्यक्षपद एक-एक वर्षासाठी दिले जाऊ शकते, तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले ज्येष्ठ कार्यकर्ते व नगरसेवक विलास शिगवण हे उपनगराध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या जवळचे नेते अनिल परब यांच्या पुढाकाराने तीन वर्षांपूर्वी रामदास कदम व आमदार योगेश कदम यांना शह देण्यासाठी नगरपंचायतीवर ठाकरे गटाने शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या साथीने सत्ता स्थापन केली होती. सत्ता स्थापन केल्यापासून ठाकरे गटाच्या ममता मोरे नगराध्यक्षपदी आणि खालिद रखांगे उपनगराध्यक्षपदी पदावर आहेत. यातील ठाकरे गटाचे असलेले उपनगराध्यक्ष खालिद रखांगे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मोरे यांच्यावर अविश्वास ठराव आणल्यावर आता उपनगराध्यक्षपदही बदलले जाणार आहे.

कोट
दापोली नगरपंचायतीत शिवसेनेचाच नगराध्यक्ष बसणार, हे नक्की झाले आहे. कोकणचे नेते रामदास कदम आणि राज्यमंत्री योगेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली दापोलीत लवकरच विकासाचे नवे पर्व सुरू होईल. दापोलीकरांच्या अपेक्षा शिवसेना नक्कीच पूर्ण करेल.
- प्रसाद ऊर्फ पप्पू रेळेकर, शहरप्रमुख, शिंदे शिवसेना

शिवसेनेची नगराध्यक्षा म्हणून कार्यभार पाहात आले आहे. जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी कार्यरत राहिले. मोरे कुटुंबीय सुरुवातीपासूनच शिवसैनिक आहेत. आता जे राजकारण सुरू आहे, ते कल्पनेपलीकडील आहे. माझ्यावर अविश्वास ठराव आणल्याचे प्रसारमाध्यमांकडून समजले. वरिष्ठांशी चर्चा करून यापुढील निर्णय घेऊ.
- ममता मोरे, नगराध्यक्षा, दापोली

तीन वर्षांपूर्वी रामदास कदम आणि त्यांचे पुत्र आमदार योगेश कदम यांना शह देण्यासाठी दापोली नगरपंचायतीत अस्तित्वात केलेली आघाडीची सत्ता उलथून टाकण्यासाठी कदम यांनी तयारी सुरू केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com