कचरा निर्मुलन नको, कचऱ्याचा पुनर्वापर करा

कचरा निर्मुलन नको, कचऱ्याचा पुनर्वापर करा
Published on

५०१२३
प्रशांत परांजपे

वसा वसुंधरा रक्षणाचा.........लोगो

इंट्रो

कचरा निर्मुलन हा शब्द प्रचलित आहे. निर्मुलन म्हणजे नष्ट करा; परंतु सद्यःस्थितीमध्ये कचरा निर्मुलन कसे होते? तर एका ठिकाणाहून गोळा केलेला कचरा दुसऱ्या ठिकाणी नेऊन टाकला जातो. म्हणजे जेथून कचरा उचलला तेथे स्वच्छता झाली. त्या जागेवरील कचऱ्याचे निर्मुलन झाले; परंतु तो उचललेला कचरा जेथे नेऊन टाकला जातो तेथे भयावह परिस्थिती असते. या कचऱ्याच्या ढिगावर कुत्रे, कावळे, डुकरे, गुरे, माश्या, डास इतर कीटक यांचा स्वैर संचार सुरू असतो. कोणीतरी या कचऱ्याचे निर्मुलन करावे म्हणून आग लावलेली असते त्यामुळे प्रचंड प्रदूषण होत असते.

- प्रशांत परांजपे, दापोली
----------------------------

कचरा निर्मुलन नको,
कचऱ्याचा पुनर्वापर करा

महानगरातील कचरा संकलन केलेल्या परिसरामध्ये जाणेही अशक्य गोष्ट झालेली आहे. कचऱ्याचे निर्मुलन केल्याचा असा परिणाम दिसून येतो. शिवाय जागोजागी ज्या कचराकुंड्या ठेवलेल्या असतात त्यांचा किळसवाणा देखावा. हे असे का व कसे होते? उत्तर सोपे आहे. ज्या परिसरात कचराकुंडी ओसंडून वाहत असते त्या परिसरातील सोसायट्यांमधील आणि घरांमधील कचऱ्याचे निर्मुलन झालेले असते. येथील नागरिकांनी हेल्मेट, गॉगल्स, पर्सपासून किचन वेस्ट आणि सॅनेटरी नॅपकीन असा सारा एकत्रित कचरा या कचराकुंडीत फेकलेला असतो. स्वतःच्या सोसायटीतील किंवा घरातील कचरा निर्मुलन करताना कोणताही मुलाहिजा बाळगलेला नसतो. परिणामतः रस्त्यावर गलिच्छतेचे साम्राज्य होते म्हणूनच कचऱ्याचे निर्मुलन न करता त्याचा पुनर्वापर करा. प्रत्येक कचऱ्याचा कण हा दुसऱ्या वस्तूचा कच्चा माल आहे हे लक्षात घ्या. ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मितीचा उत्तम उपाय करून निसर्गाकडून आलेली वस्तू निसर्गाला परत देता येते. सुका व कुजणाऱ्या कचऱ्याचे खत तर होणार नाही; परंतु वर्गीकरण करून सुयोग्यपणे ठेवल्यास सर्व खाद्य पदार्थांचे रॅपर, दूध, तेलपिशव्या अर्थात पॅकिंग मटेरिअल तसेच काच, लोखंड अर्थात धातूवर्गीय आदी टाकावू वस्तू हे सर्व पुनर्निर्माण करण्याकरिता वापरता येते. प्लास्टिक पॅकिंगच्या कचऱ्याचे प्रथम वर्गीकरण होते नंतर त्या कचऱ्याला पाण्याने स्वच्छ केले जाते व नंतर त्याला उष्णता देऊन त्या कचऱ्यापासून छोट्या लादीच्या आकारचे तुकडे केले जातात व ते तुकडे प्लास्टिकचे जाड पाईप बनवण्याकरिता वापरात आणले जातात. तसेच पाण्याच्या किंवा कोल्डड्रिंकच्या बाटल्यांपासून सुंदर बुके, फुले, फ्लॉवरपॉट तयार करून कचऱ्यातून सौंदर्यनिर्मिती करता येते. याचप्रमाणे कागदाच्या लगद्यापासून सुंदर गिफ्ट, आर्टिकल तयार केली जातात. करवंटी (नारळाची) पासूनही सुंदर वस्तूनिर्मिती केली जाते. इतकेच नव्हे तर फ्लेक्स बोर्ड वापरानंतर टाकून न देता त्यापासून सुंदर पिशव्या बनवल्या जातात. त्याचप्रमाणे पाण्याच्या रिकाम्या बाटल्या किंवा कोल्डड्रिंकच्या रिकाम्या प्लास्टिक अर्थात् पेटबॉटल्स यांच्यापासून फुले-बुके बनवले जात असले तरी सद्यःस्थितीमध्ये त्याचे प्रमाण अत्यल्प आहे; परंतु या बाटल्या संकलित करून त्याचा भुगा केला जाऊन तो भुगा जाड कच्चे प्लास्टिक किंवा दुय्यम प्लास्टिकच्या टब, टेबल इ. तयार करण्याकरिता वापरात आणला जातो. सर्व प्रकारच्या प्लास्टिक कचऱ्यापासून यशस्वी इंधन निर्मिती सुरू करण्यात सुरवात झाली आहे. हे इंधन जनरेटर किंवा मच्छीमारांच्या ट्रॉलरकरिता आणि रॉकेलला सशक्त पर्याय म्हणून अतिशय उपयुक्त आहे. हे इंधन डिझेलच्या दरात उपलब्ध करता येते. म्हणजेच आजपर्यंत जो कचरा होता तो आता दुसऱ्या वस्तूचा कच्चा माल झाला आहे. तेव्हा त्याला फेकू नका. संकलन करून स्थानिक प्रशासनामार्फत संकलन व वाहतूक व्यवस्था करून पुनर्निर्माण प्रकल्पाकडे पाठवून देण्याचा हट्ट करूया.
ओला आणि सुका कचरा याचा पूर्ण वापर होतो, हे आपण पाहिले; परंतु याकरिता प्रत्येक घरामध्ये ओला व सुका कचरा साठवणुकीकरिता स्वतंत्र कचराकुंडी (डस्टबीन) व भंगाराकरिता एक थैली किंवा कचराकुंडी करणे गरजेचे आहे. तिसऱ्या कुंडीत दाढीची ब्लेड, ब्रश, पर्स, हेल्मेट, केसांचे चाप इ. वस्तू टाकाव्यात. कचरा विघटनामध्ये निवेदिता प्रतिष्ठानसारख्या सामाजिक सेवा संस्था अग्रेसर आहेत. अशा संस्थांकडे किंवा कचरा व्यवस्थापन करणाऱ्या कंपन्यांकडे संपर्क करून आपल्या कॉलनीकरिता दर रविवारी वेळ ठरवून त्यांना बोलावून तो कचरा त्यांच्या ताब्यात द्यावा. जे भंगार गोळा करणारे येतात त्यांना चार पैशाच्या लालसेपोटी आपण आपल्याकडील कचरा देऊन ५०/१०० रूपये घेतो; पण असे करताना सीएफ एल बल्ब, ट्यूब, वेटलेस्ट प्लास्टिक, कपडे असा अनेक प्रकारचा कचरा ते घेत नाहीत किंवा घेतलाच तर निर्जन ठिकाणी फेकून देतात किंवा आग लावतात म्हणजे दोन्ही प्रकारात प्रदूषणच करतात. तेव्हा स्वतःमध्ये मानसिक बदल घडवा आणि शास्त्रीय पद्धतीने ज्या संस्था किंवा कंपन्या हा कचरा घेतात त्यांना तो दान करा. थोडा वेळ स्वतः व स्वतःचा परिसर स्वच्छतेकरिता नियोजनबद्ध दिल्यास कचराच होणार नाही; परंतु या करिता प्रशासनाने कचरा गोळा करण्याकरिता स्वतंत्र गाड्या पाठवणे व त्या स्वतंत्र कचऱ्याला डंपिंग ग्राऊंडवर न नेता पुनर्निर्माण प्रकल्पाकडे पाठवणेही गरजेचे आहे.
सद्यःस्थितीमध्ये प्रशासन दोन डस्टबिन करण्याच्या सूचना देते इतकेच नव्हे निवडणूक जवळ आल्यावर काही उमेदवार आपल्या प्रभागातील नागरिकांना दोन डस्टबिन आपले नाव घालून भेट देतात. नागरिक दोन स्वतंत्र डस्टबिनमध्ये कचरा जमा करतात; मात्र घंटा गाडी आल्यावर हा स्वतंत्र कचरा एकाच गाडीतून संकलित करून डंपिंग ग्राऊंडवर ओतला जातो. त्यामुळे प्रशासनाने नियोजनपूर्वक आणि काटेकोर काम करणे अत्यावश्यक आहे. याला अपवाद असू शकतात.
अंतिमतः महत्वाचे, कचरा ही माझी जबाबदारी हे लक्षात घेऊन माझे आवार आतून आणि बाहेरून दुसऱ्याच्या आवारापर्यंत स्वच्छ राहील, याची मी दक्षता घेईन. असे प्रत्येकाने ठरवले तर सहजशक्य आहे. आपला परिसर, वाडी, नगर, वॉर्ड, गाव, शहर, तालुका आणि जिल्हा स्वच्छ होण्यास वेळ लागणार नाही. आपला गाव, शहर, ग्रामपंचायत, नगरपंचायत, शाळा शास्त्रीय दृष्टिकोनातून स्वच्छ सुंदर करायची असेल तर दापोलीतील निवेदिता प्रतिष्ठान या संस्थेकडे संपर्क करा आणि वसुंधरेला कचरा मुक्त करण्यासाठी एक पाऊल उचला.

(लेखक कचरा व्यवस्थापन व प्लास्टिक मुक्तीसाठी काम करतात.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com