पूर्णगड शाळेत महिला दिनी विविध कार्यक्रम
पूर्णगड शाळेत महिला
दिनी विविध कार्यक्रम
पावसः रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा पूर्णगड नं. १ मध्ये जागतिक महिला दिनी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सुरूवातीला महिलांना मानवंदना देण्यासाठी ढोलताशांच्या गजरात, लेझिमच्या ठेक्यावर फेरी काढण्यात आली. या वेळी विविध घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर दीपप्रज्वलन, सरस्वतीपूजन, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उपस्थित सर्व महिलाभगिनींचे फेटा बांधून पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. थोर महिलांच्या कार्याचा आढावा शिक्षकांनी कथन केला. महिला सक्षमीकरणासाठी शाळेतील विद्यार्थिनींनी उत्कृष्ट गीतगायन केले. त्यानंतर महिलांसाठी विविध फनीगेम्सचे आयोजन केले. त्यात महिलांनी सहभाग घेऊन आनंद मिळवला. यातील विजेत्यांना बक्षिसेही देण्यात आली. उत्कृष्ट यश मिळवलेल्या शाळेतील विद्यार्थिनींना या वेळी गौरवण्यात आले.
----------
वाचनसंस्कृती सक्षम
कराः श्रद्धा वझे
लांजाः आज वाचन संस्कृती हळूहळू कमी होत असल्याचे निदर्शनास येते; पण नियमित वाचन करणारे वाचन चळवळीला पाठबळ देत असून, वाचनसंस्कृती अधिक सक्षम करायला हवी. वाचन म्हणजे केवळ अभिवाचन नसून शब्दाला सजीव करून त्यात प्राण फुंकणारा साहित्यकला प्रकार आहे, असे प्रतिपादन मुंबई आकाशवणीच्या वृत्तनिवेदिका, कथाकार श्रद्धा वझे यांनी लांजा येथे केले. लांजा येथील लोकमान्य वाचनालय लांजेच्यावतीने वझे यांचा कथा अभिवाचन आणि संहिता व सादरीकरण कार्यक्रम लांजा शहरातील जनता नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रा. मधु दंडवते सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. अभिजित जेधे, सल्लागार विजय बेर्डे, उपाध्यक्ष योगेश वाघधरे, कार्यवाह उमेश केसरकर, माजी अध्यक्ष व संचालक विजय नारकर आदी उपस्थित होते. वझे यांनी कथांची लिखाणशैली, कथांचे प्रकार समजावत कथा सादर करून लघुकथा, बोधकथा, अतिलघुतम कथा सादरीकरणमधून आवाजाचा चढ-उतार, सुसंवाद साधत कथा अभिवाचनातून सादरीकरण केले. या वेळी लोकमान्य वाचनालयाचे अध्यक्ष जेधे म्हणाले, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी साहित्यक्षेत्रामधील सर्वांचे मोठे योगदान आहे.
----------
मेर्वी शाळेत
महिलांचा सन्मान
पावसः रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा मेर्वी शाळेत जागतिक महिलादिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दरवर्षी आठ मार्च हा दिवस महिलांच्या संघर्षांचा, त्यागाचा आणि त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी जागतिक महिला दिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो. आज महिला शिक्षण, विज्ञान, क्रीडा, व्यवसाय अशा विविध क्षेत्रात यशस्वीपणे आपली छाप उमटवत आहेत, असे पेटकर यांनी सांगितले. जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक मराठी शाळा मेर्वी शाळेच्या मुख्याध्यापिका शर्वरी करगुटकर, अंगणवाडीच्या शिक्षिका सुनीता मेस्त्री, मदतनीस आकांक्षा गुरव, चित्रा हातणकर, माजी विद्यार्थिनी सलोनी खरडे आदींचा मेर्वी शाळेच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
-----------------------
ज्ञानदीप वाचनालयात
महिला दिन साजरा
राजापूर ः तालुक्यातील साखर येथील ज्ञानदीप वाचनालयामध्ये जागतिक महिलादिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. वाचनालयाचे ग्रंथपाल मनोहर धुरी यांच्या हस्ते सर्वांचे स्वागत झाल्यानंतर नम्रता मिरगुले यांनी महिला शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन आणि पुष्पहार अर्पण केला. या वेळी मार्गदर्शन करताना सरपंच दशरथ मांजरेकर यांनी महिलादिनाचे महत्व विषद केले. या वेळी नम्रता मिरगुले, सरस्वती बाणे, संपदा बाणे, दीक्षिता बाणे, मालन माने, जान्हवी नवलू, रचना नवलू, रचना कणेरी, सुधाकर भोसले, सुरेंद्र कांबळी, दीक्षा गराडे आदी उपस्थित होते.
------------
स्त्रियांविषयीचा दृष्टिकोन
बदलाः स्नेहा कोलते
राजापूरः आज सर्वच क्षेत्रात स्त्रिया आपल्या नावाची मोहर उमटवताना दिसत आहेत; पण दुसर्या बाजूला स्त्रियांवर होणारा अन्यायही कमी झालेला दिसत नाही. स्त्री सन्मानासाठी फक्त भाषणबाजी करून चालणार नाही. त्यासाठी कृती केली पाहिजे. प्रत्येकाने स्त्री सन्मानाची सुरवात स्वतःपासून केली तर स्त्रीविषयक दृष्टिकोन बदलत जाईल आणि त्यांना योग्य न्याय मिळेल. हे फक्त पुरुषांनीच करून चालणार नाही तर स्त्रियांनीही स्त्री म्हणून दुसर्या स्त्रीचा सन्मान केला पाहिजे. म्हणूनच आपण स्त्री सन्मानाची सुरवात स्वतःपासून करूया, असे आवाहन स्नेहा कोलते यांनी केले. तालुक्यातील रायपाटण येथील श्री मनोहर हरी खापणे महाविद्यालयात ‘आंतरराष्ट्रीय महिलादिन’ निमित्ताने ‘आजची स्त्री’ या विषयावर कोलते यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते. प्राचार्य डॉ. पी. एस. मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या महिला विकास कक्षाच्या प्रा. चव्हाण, प्रा. देवरूखकर, प्रा. धोंगडे आदी उपस्थित होते. स्त्री-पुरुष असा भेद न करता स्त्रियांना सर्व क्षेत्रात समान संधी आणि सन्मान दिल्यास हा भेद संपून जाईल. त्यासाठी आपण सर्वांनीच स्त्री सन्मानाचा वसा घेऊया, असे आवाहन डॉ. मेश्राम यांनी केले.
----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

