संक्षिप्त

संक्षिप्त

Published on

कापडी पिशव्यांचे
मंडणगडमध्ये वाटप
मंडणगड ः सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्यावतीने मंडणगड बाजारामध्ये नुकतेच कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहुल जाधव, विस्तार विभाग समन्वयक प्रा. संदीप निर्वाण, प्रा. शरिफ काझी आदी मान्यवर उपस्थित होते. प्रा. शरिफ काझी यांनी या कार्यक्रमामागील उद्देश सांगताना प्लास्टिक प्रदुषणाचा पर्यावरणावर होणारा दुष्परिणाम याबाबत थोडक्यात माहिती दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहुल जाधव यांनी हा उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगताना प्लास्टिक विघटनाचा फार मोठा प्रश्न सगळ्या जगासमोर उभा असल्याचे सांगितले. त्यासाठी प्लास्टिकचे विघटन शेकडो वर्षे होत नसल्यामुळे आपणाला अनेक रोगांना सामोरे जावे लागत असल्याचे स्पष्ट केले. प्लास्टिकला पर्याय म्हणून कापडी पिशवीचा वापर करावा असे आवाहन केले.
------------
यंगेस्ट आयबीआर
अचिव्हर सोनाक्षी मेहता
चिपळूण ः पाच वर्षाच्या मुलीची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याने त्या चिमुकलीचे कौतुक होत आहे. सोनाक्षी मेहता या पाच वर्षाच्य़ा मुलीची "इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड" २०२५ मध्ये झाली असून तिने यंगेस्ट आयबीआर अचिव्हर हा बहुमान पटकावला आहे. तिच्या असामान्य बुद्धिमत्ता व कौशल्यामुळे ती सर्वात लहान वयातच फळ आणि आरोग्याची माहिती असणारी, आरोग्यासाठी फळांचा योग्य सल्ला देणारी ती एक मार्गदर्शकच बनली आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. तिने ७६ सामान्यज्ञान प्रश्नांची उत्तरे देताना ३५ आरोग्यविषयक समस्या आणि त्यावरील फळांद्वारे नैसर्गिक उपाय, २२ फळे व भाज्यांचे फायदे, ३ वनस्पती आणि १६ वास्तूशास्त्रविषयक प्रश्न यशस्वीपणे उत्तरले आहेत याशिवाय तिने २९ फळे आणि २६ क्रियापदे ओळखून सांगण्याचा विक्रम केला आहे. तसेच तिने ७ संस्कृत श्लोकांचे पठण आत्मविश्वासाने सादर केले असून, तिच्या वयाच्या इतर मुलांच्या तुलनेत सोनाक्षी सर्वच बाबींमध्ये उल्लेखनीय आहे, हे या सामान्य ज्ञानाच्या परीक्षेतून दिसून येत आहे.

-------------

धर्मरक्षणदिनानिमित्त
देवरूखमध्ये कार्यक्रम

साडवली ः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज धर्मरक्षण दिन समिती संगमेश्वरच्यावतीने ११ मार्च रोजी धर्मरक्षण दिनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. प्रमोद जठार यांच्या संकल्पनेतून धर्मरक्षण दिनानिमित्त धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या अलौकिक गाथा या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. प्रा. योगेश माणिकराव चिकटगावकर ही गाथा सादर करणार आहेत. यावेळी पोवाडा, शंभू महाआरती आदी कार्यक्रम होतील. तसेच छावा चित्रपटातील अभिनेते विकी कौशल उपस्थित राहण्याची शक्यता आहे. धर्मरक्षक दिन धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक कसबा येथे सकाळी नऊ वाजता आयोजित केली असून, यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज धर्मरक्षण दिन समिती संगमेश्वरच्यावतीने करण्यात आले आहे.

------------
खंडाळा स्कूलमध्ये
विज्ञानदिन उत्साहात

जाकादेवी ः इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये २८ फेब्रुवारी रोजी विज्ञानदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला संस्थापक अध्यक्ष निमकर, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष जोग, मुख्य कार्यकारी अधिकारी कारखानीस, मुख्याध्यापक वासावे, पर्यवेक्षिका मांगले, शितप सर आदी मान्यवर तसेच पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी विद्यार्थ्यांनी विज्ञानाचे महत्व पटवून देणारी विविध सायन्स मॉडेल्स सादर केली. या प्रयोगांमधून त्यांनी विज्ञानातील संकल्पनांचे उत्तम सादरीकरण केले. विद्युतऊर्जेचा उपयोग, सौरऊर्जा प्रकल्प, पर्यावरण संवर्धन, जलचक्र, भूकंपसंकेत यंत्र, चंद्रयान आदी विषयांवर विद्यार्थ्यांनी प्रभावी मॉडेल्स तयार केली. कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि विज्ञान व तंत्रज्ञानाच्या वाढत्या भूमिकेवर प्रकाश टाकला. या प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दलची गोडी वाढली असून, त्यांना नव्या संशोधनाची प्रेरणा मिळाली. पालकांनीही विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला दाद दिली. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन शाळेचे शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी केले.
----------------
कालभैरव देवस्थानचा
शिमगोत्सव १३ पासून
चिपळूण ः शहराचे ग्रामदैवत श्री जुना कालभैरव देवस्थान ट्रस्टच्या विद्यमाने यंदाही शिमगोत्सव १३ ते २१ मार्च या कालावधीत साजरा होणार आहे. यानिमित्ताने १३ रोजी रात्री ९ वाजता लावणी नृत्य कार्यक्रम होईल. रात्री १२.३० वाजता होळी पूजा व होम होईल. यावेळी विघ्नहर्ता ग्रुपकडून पुणेरी ढोल ताशा पथक आणि विविधांगी मनोरंजनाचे अनोखे सादरीकरण केले जाणार आहे. १४ आणि १५ मार्चला श्रींची सहाण भरणे, श्री देवी भवानी भेट सीमा व धुळवड होईल. २१ रोजी श्री केदार लळीत कार्यक्रमानंतर दुपारी १२ वाजता शिमगोत्सव समाप्ती होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com