

rat9p28.jpg
50163
सावर्डे: वालावलकर रुग्णालय प्रवेशद्वारासमोर वाहन तळाला लागून नाले नसल्याने पावसाचे पाणी सखल भागात साचणार आहे.
डेरवणफाटा ते रुग्णालय रस्त्याच्या दुतर्फा हवेत नाले
पावसाळ्यात बाका प्रसंग; रस्त्याला नाही कोणी वाली
सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. ९ः झपाट्याने विकसित होत असलेल्या गोवा-मुंबई महामागावरील सावर्डे ग्रामपंचायत हद्दीतील डेरवणफाटा ते डेरवण रुग्णालय रस्त्याच्या दुतर्फा नाले बांधण्याची गरज आहे. पावसाळ्यात पाणी रस्त्यावर साचते. त्याचा त्रास विद्यार्थी, रुग्णालयाकडे जाणारे कर्मचारी तसेच पादचाऱ्यांबरोबर वाहनचालकांनाही होणार आहे. रस्त्याचीही हानी होत आहे. गजबजलेल्या या रस्त्याची पावसाळ्यात दुरवस्था असते. या रस्त्याला कोणी वाली आहे का, असा प्रश्न पडतो.
गोवा-मुंबई महामार्गावरील सावर्डेपासून दुर्गवाडीकडे जाणारा हा सार्वजनिक बांधकाम खात्याचा रस्ता खूपच वर्दळीचा आहे. कै. गोविंदराव निकम यांनी सुरू केलेल्या सह्याद्री शिक्षणसंस्थेमुळे बनलेले विविध अभ्यासक्रमाचे शैक्षणिक केंद्र. येथील वालावलकर रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय व त्या अनुषंगाने सुरू केलेले विविध वैद्यकीय अभ्यासक्रम, इंग्रजी माध्यमाच्या शाळा, सर्व सोयीनींयुक्त क्रीडासंकुल, डेरवण येथील शिवसृष्टी आदी कारणांनी या रस्त्यावर रुग्णालयापर्यंत दुतर्फा चार-चार माळ्याची निवासी संकुले उभारली आहेत. त्यामध्ये आणखी भर पडत आहे. वीस ते पंचवीस किलोमीटर परिघातील लोक नोकरी व शिक्षणाच्या निमित्ताने या निवासी संकुलात वास्तव्यास आहेत. त्यामुळे हा रस्ता डेरवणफाटा ते वालावलकर रुग्णालय दिवसभर गजबजलेला असतो. दररोज शेकडो वहाने या मार्गावर ये-जा करतात.
रस्त्याच्या दोन्ही बाजूस नाले नसल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही. परिणामी, हे पाणी रस्त्यावरून सखल भागाकडे वाहताना दिसते. या पाण्यावरून वाहन गेले की, बाजूला पाण्याचे फवारे उडतात. त्यामध्ये पादचारी चिखलयुक्त पाण्याने चिंब होऊन जातो. अशावेळी अंगावर पाणी उडल्यामुळे पादचारी व वाहनचालकांचे वादाचे प्रसंग उद्भवतात. एखादा गंभीर अपघात होईपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभाग बघ्याची भूमिका घेत असल्याबद्दल सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी रस्त्याच्या दोन्ही बाजूस नाले बांधावेत, अशी मागणी होत आहे.
------
कोट १
सार्वजनिक बांधकामने डिसेंबर महिन्यात रस्त्यावरील खड्डे व बाजूपट्ट्या भरल्या. रस्ता वाहतुकीस योग्य आहे; मात्र नाले नसल्याने पावसाळ्यात रस्त्याची दयनीय अवस्था होईल. पावसाळ्यात पायी जात असताना खड्ड्यातील पाणी चुकवत शाळेत पोहचावे लागते. प्रशासनाने रस्ता रूंद करून नाले काढण्याची गरज आहे.
- आयुष जाधव, सावर्डे
कोट २
रस्ता उंच सखल आहे. त्यातच दोन्ही बाजूस गटारे नसल्याने पावसात वाहन चालवणे जिकिरीचे असते. लहान-लहान मुले शाळेत जात असतात. अशावेळी वाहन चालवताना अंगावर पाणी उडणार नाही, याची सावधगिरी बाळगावी लागते.
- राकेश जाधव, रिक्षाचालक, येगाव
----
कोट ३
वालावलकर ट्रस्ट प्रशासनाने रुग्णालयासमोर वाहनतळ बनवताना नाला काढलेला नाही. त्यामुळे रुग्णालय, कुडप फाटा व डेरवण रस्ता बाजूने येणारे पावसाचे पाणी उताराने पश्चिमेकडे सखल भागात साचणार आहे. त्याचा त्रास सर्वांनाच होणार आहे. ही बाब संबंधितांना सांगितली आहे; मात्र याकडे लक्ष दिले जात नाही.
- संतोष कातकर, हॉटेल मालक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.