‘वाचनसंस्कृती 
सक्षमच हवी’

‘वाचनसंस्कृती सक्षमच हवी’

Published on

‘वाचनसंस्कृती
सक्षमच हवी’
लांजा ः आज वाचन संस्कृती हळूहळू कमी होत असल्याचे निदर्शनास येते; पण नियमित वाचन करणारे वाचन चळवळीला पाठबळ देत असून, वाचनसंस्कृती अधिक सक्षम करायला हवी. वाचन म्हणजे केवळ अभिवाचन नसून शब्दाला सजीव करून त्यात प्राण फुंकणारा साहित्यकला प्रकार आहे, असे प्रतिपादन मुंबई आकाशवणीच्या वृत्तनिवेदिका, कथाकार श्रद्धा वझे यांनी लांजा येथे केले. लांजा येथील लोकमान्य वाचनालय लांजेच्यावतीने वझे यांचा कथा अभिवाचन आणि संहिता व सादरीकरण कार्यक्रम लांजा शहरातील जनता नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रा. मधु दंडवते सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. अभिजित जेधे, सल्लागार विजय बेर्डे, उपाध्यक्ष योगेश वाघधरे, कार्यवाह उमेश केसरकर, माजी अध्यक्ष व संचालक विजय नारकर आदी उपस्थित होते. वझे यांनी कथांची लिखाणशैली, कथांचे प्रकार समजावत कथा सादर करून लघुकथा, बोधकथा, अतिलघुतम कथा सादरीकरणमधून आवाजाचा चढ-उतार, सुसंवाद साधत कथा अभिवाचनातून सादरीकरण केले. या वेळी लोकमान्य वाचनालयाचे अध्यक्ष जेधे म्हणाले, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी साहित्यक्षेत्रामधील सर्वांचे मोठे योगदान आहे.
------
देवराईच्या जमिनीसाठी
आज रत्नागिरीत घंटानाद
रत्नागिरी ः कोकणातील अनेक देवस्थानांच्या देवराई तथा देवरहाटी जमितीच्या सातबारा उताऱ्यामधून कमी करण्यात आली आहेत. यासाठी कोणतीही नोटीस देण्यात आलेली नाही. या देवराई देवस्थानांच्या नावावर कराव्यात, या मागणीसाठी महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि समस्त मंदिर विश्वस्त भाविक-भक्त हिंदू यांच्यावतीने उद्या (ता. १०) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे. देवराई किंवा देवराहाटी या जमिनी केवळ धार्मिक उपासनेसाठी नव्हे तर पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी देखील आवश्यक आहेत. अनेक वर्षापासून या जमिनी देवस्थानांच्या ताब्यात होत्या आणि त्या ठिकाणी ग्रामस्थांच्या धार्मिक भावना आणि परंपरा जपल्या जात होत्या. मात्र शासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता किंवा स्थानिक जनतेची कोणतीही समुपदेशन प्रक्रिया न करता या जमिनी शासनाच्या नावे केल्यामुळे ग्रास्थांच्या धार्मिक व सांस्कृतिक हक्कांचे उल्लंघन जाळे असून या बाबत ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे.
---
प्रचंड उकाड्याने
विजेची मागणी वाढली
रत्नागिरी ः गेल्या दोन आठवड्यांपासून तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे विजेच्या मागणीत वाढ झाली असली तरी वीज पुरवठा अखंडीत सुरु आहे. तांत्रिक बिघाड उद्भवल्यास दुरुस्तीच्या कामासाठी वीज पुरवठा काही काळ बंद ठेवला जात असला तरी जिल्ह्यात भारनियमन नसल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. दर सोमवारी वीज वहिन्यांची दुरुस्तींची कामे हाती घेण्यात येत असल्याने त्या दिवशी वीज पुरवठा काही वेळ बंद असतो. मात्र याची पुर्वसूचना दिली जाते. याशिवाय अन्य दिवसात नादुरस्तीमुळे वीज पुरवठा खंडीत होत असतो. परंतु भारनियमन नसल्यामुळे ग्राहकांना तेवढाच दिलासा मिळाला आहे. सध्या मागणीप्रमाणे वीज पुरवठा कऱण्यात महावितरण सक्षम असल्यामुळे भारनियमन करण्याचा प्रश्नच नाही. भारनियमनाबाबत ग्राहकांना पूर्वसूचना करण्यात येणार असल्याचे महावितरण कडून सांगितले.
---
कुंभारखाणी येथे
१३ला शिमगोत्सव
सावर्डे : संगमेश्वर तालुक्यातील कुंभारखाणी बुद्रुक येथील ग्रामदेवता मंदिर क्र. दोन श्री गंगा, वरदान, वाघजाई, भावकादेवी व बाजी केदार या देवस्थानतर्फे १३ मार्चपासून परंपरेप्रमाणे शिमगोत्सवास सुरवात होणार आहे. गुरूवारी दुपारी तीन वाजता ग्रामस्थ व देवीभक्तांच्या उपस्थितीत देवींची चंदेरी रूपे मानकरी, गावकरी, गुरव यांच्या समवेत पालखीत लावतील. सांयकाळी सहा वाजता माड तोडण्यात येईल. १४ ला दुपारी तीन वाजता ग्रामस्थांची सभा होऊन त्यामध्ये मान्यवरांचे सत्कार होतील. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास माड उभा करून होळी, धूलिवंदन संपन्न होईल. दिवसभर महिलांना मंदिरात पालखीत तसेच सहाणेवर देवींची ओटी भरता येईल. सायंकाळी पालखी ढोलताशांच्या गजरात गावभेटीसाठी कोंडराई धडा क्र. पाचमधील घरांना पूजा घेण्यासाठी देवींची पालखी भोवनी भेट देईल. या दिवशी उपस्थित सर्व देवीभक्तांसाठी अन्नप्रसाद दिला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com