

आयटी, जीकेची ४८०३ विद्यार्थी देणार परीक्षा
उद्यापासून ऑनलाईन परीक्षा ; सीसीटीव्हीची नजर, बैठेसह भरारी पथके तैनात
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० ः उद्यापासून (ता. १२) बोर्डाची सुरू होणारी बारावीतील माहिती तंत्रज्ञान (आय टी) व सामान्य ज्ञान (जीके) विषयांची ऑनलाईन परीक्षाही गैरप्रकारमुक्त करण्यासाठी कोल्हापूर व कोकण विभागीय मंडळाने क्षेत्रीय अधिकारी आणि केंद्रसंचालकांना सक्त ताकीद दिली आहे. ही परीक्षा कोकणातील ४ हजार ८०३ विद्यार्थी देणार आहेत. ऑनलाइन परीक्षा आयोजित केलेल्या सर्व संगणक प्रयोगशाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक केले असून प्रत्येक केंद्रावर बैठ्या व भरारी पथकांची नियुक्ती करा, अशा सूचना विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिल्या आहेत.
बोर्डाची बारावीची परीक्षा अंतिम टप्प्यात असून ११ मार्च रोजी लेखी परीक्षा (तुरळक विषय वगळता) संपत आहे. त्यानंतर १२ ते १८ मार्च या कालावधीत माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान विषयाची ऑनलाईन परीक्षा होत आहे. ज्या कनिष्ठ महाविद्यालयांना आयटी विषयाची मान्यता दिली आहे, तिथे (काही अपवाद वगळता) परीक्षा केंद्र आहेत. तसेच खाजगी सैनिकी शाळेत शिकवल्या जाणाऱ्या सामान्य ज्ञान या अनिवार्य विषयाची ऑनलाईन परीक्षा त्या-त्या सैनिकी शाळेतच होईल. कोकण विभागात रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येकी एक खाजगी सैनिकी शाळा असून यामधील ७० विद्यार्थ्यांची सामान्य ज्ञान या अनिवार्य विषयाची परीक्षा होणार आहे. इंग्रजी, जलसुरक्षा आणि पर्यावरण शिक्षण, आरोग्य आणि शारीरिक शिक्षण हे तीन अनिवार्य विषय वगळता इतर विषयांकरिता वैकल्पिक विषय म्हणून कला, वाणिज्य व शास्त्र या तिन्ही शाखेच्या विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान (आय टी) हा विषय घेता येतो. कोकण विभागीय मंडळातील ४ हजार ८०३ विद्यार्थ्यांनी हा वैकल्पिक विषय घेतलेला आहे. कोकण मंडळात ७० परीक्षा केंद्रांवर या विषयाची ऑनलाईन परीक्षा होईल. कोकण मंडळात समन्वयक म्हणून रत्नागिरी जिल्ह्याला समृद्धी बावधनकर तर सिंधुदुर्गमध्ये प्रसन्नकुमार मयेकर यांची नियुक्ती केली आहे.
----
जिल्हानिहाय परीक्षा केंद्र
*विषय* रत्नागिरी* सिंधुदुर्ग* एकूण
* परीक्षा केंद्र* ४६* २४* ७०
* एकूण विद्यार्थी* २,९०४* १,८९९* ४,८०३
* सामान्य ज्ञान विद्यार्थी* ३४* ३६* ७०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.