

जपूया बीज वारसा – लोगो
(४ मार्च टुडे ३ अणेराव यांचा फोटोही घ्यावा)
हजारो वर्षांची परंपरा असलेली आदिम बियाणी संवर्धन करण्याची मुळात गरजच का भासते, हे समजून घेऊया. याची सुरवात अठराव्या शतकात इंग्रज शासनाच्या काळात झाली. त्या काळात युरोपमध्ये औद्योगिक क्रांतीमुळे विविध उद्योगधंदे तेजीत होते. या उद्योगांना लागणारा कच्चा माल हा युरोपीय देशात त्यांच्या वसाहती असलेल्या आशिया आणि आफ्रिका देशांमधून आणला जाई. सतराव्या शतकात इंग्लंडच्या ईस्ट इंडिया कंपनीने भारतामध्ये आपले बस्तान बसवायला सुरवात केली होती. त्यानुसार भारतात शेतकऱ्यांकडून इंग्लंडमधील कापड गिरण्या, सिगारेट कारखाने यांना लागणारा कच्चा माल म्हणजेच कापूस, ताग, नीळ, तंबाखू यासारखी पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांवर दबाव आणला. त्याशिवाय चीनमध्ये आपला शिरकाव होऊ शकत नाही, हे लक्षात आल्यावर चिनी लोकांना अफूचे व्यसन लावण्यासाठी भारतात मोठ्या प्रमाणावर अफू पिकवून तिची चीनमध्ये तस्करी केली जायची.
- rat१०p८.jpg-
- कुणाल अणेराव, वरिष्ठ प्रकल्प अधिकारी, सृष्टीज्ञान संस्था
-----
येथील अन्न सुरक्षितता
ब्रिटिशांनी धोक्यात आणली
त्या काळातील कमकुवत राजकीय सत्ता हेरून किंवा प्रसंगी त्यांना कमकुवत करून त्यांच्या साहाय्याने इंग्रजांनी आपला हा हेतू साध्य केला. शेतमालावर मोठ्या प्रमाणात सारा पैशांमध्ये भरण्याची सक्ती केली. हा शेतसारा गोळा करण्यासाठी त्यांनी जमीनदारी व्यवस्थेला उभारी दिली. त्या आधी भारतात सुखेनैव सुरू असलेली वस्तूविनिमय प्रणाली ज्यात चलन म्हणजेच रोख पैशाचा विशेष वापर नव्हता, ही नामशेष झाली. सारा भरण्यासाठी शेतकरी रोख पैसे मिळवून देणारी पिके घेऊ लागले. इंग्रजांचे अभय मिळाल्याने जमीनदार त्यांच्या मनमर्जीने शेतकऱ्यांकडून वसुली करू लागले. मान्सूनवर अवलंबून कोरडवाहू शेती करणाऱ्या आणि दुष्काळ, अतिवृष्टी यासारख्या संकटांना तोंड देत हा सारा भरण्यास असमर्थ असलेल्या छोट्या शेतकऱ्यांच्या जमिनी जमीनदारांनी जप्त करायला सुरवात केली. हिंदीतील ‘दो बिघा जमीन’ आणि ‘लगान’ सारख्या चित्रपटातून आपण हे सारे पहिले आहे.
जमिनी हिसकावलेला छोटा शेतकरी जमीनदारांच्या शेतात मजूर म्हणून काम करू लागे. त्यातूनच पुढे ‘वेठबिगार’ ही शोषणाची पद्धत सुरू झाली. यात एखाद्या मजुराला अडचणीच्या वेळी मदत म्हणून काही पैसे कर्ज म्हणून दिले जायचे आणि त्या रकमेवर चक्रवाढ पद्धतीने अत्यंत जास्त व्याजदर आकारले जायचे. त्याची फेड करण्यासाठी तो मजूर, त्याची बायको, मुले हे फुकट वर्षानुवर्षे राबत राहायची. लग्न किंवा श्राद्ध यासारख्या घरगुती समारंभासाठी घेतलेले १०, ५०, १०० रुपये तीन पिढ्या अख्ख्या कुटुंबाने काम करूनही फिटत नसत. हातात पैसा नसल्याने परत काही कार्य निघाले किंवा काही अडचण आलीच तर त्याच जमीनदाराकडून पुन्हा कर्ज घेतले जायचे आणि ते फेडण्यात हे मजूर झालेले छोटे शेतकरी आणि त्यांचे कुटुंबीय पिळून निघायचे.
इतका नफा मिळवूनही इंग्रज किंवा त्याचे प्रतिनिधी असलेले जमीनदार यांनी शेतीचे उत्तम उत्पादन यावे यासाठी कोणत्याही सोईसुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत. जसे की, मातीची सुपीकता टिकून राहावी यासाठी उपाययोजना, नवीन तंत्रज्ञान किंवा सिंचन सुविधा यासाठी अशी कोणतीही मदत दिली गेली नाही. त्यामुळे शेतकऱ्याबरोबरच मातीचेही मोठ्या प्रमाणावर शोषण झाले, गुणवत्ता खालावली. पूर्वी फेरपालट आणि मिश्र पीकपद्धती यामुळे मातीचा कस टिकून राहायचा; पण सारा भरण्यासाठी म्हणून रोख रक्कम मिळवून देणाऱ्या पिकांची एकसुरी लागवड सुरू झाली. याचाच परिणाम म्हणून अन्न सुरक्षितता धोक्यात आली. अन्नधान्याचे उत्पादन कमी झाले. परिणामी, कुपोषण हे मोठ्या प्रमाणावर वाढले. एखादा दुष्काळ पडायचा आणि हजारो लोक त्यात मृत्यूमुखी पडायचे. १८९९ मध्ये तत्कालीन बॉम्बे प्रेसिडन्सीमध्ये ४ लाख ६२ हजार, दख्खन पठारावर १ लाख ६६ हजार लोक मृत्यूमुखी पडले.
१९०८च्या द इम्पिरियल गॅझेटियर इंडियानुसार, १९०० ते १९०८ या कालावधीमध्ये ब्रिटिश प्रशासित जिल्ह्यांमध्ये १० लाख लोक उपासमारी आणि त्यामुळे आलेल्या आजारपणामुळे मरण पावले. त्याशिवाय चाऱ्याच्या कमतरतेमुळे लाखो गुरेढोरे मृत्यूमुखी पडली. या आकडेवारीवरून इंग्रजांनी शेतीमध्ये केलेल्या शोषणाची तीव्रता लक्षात येते.
यामुळे शेतकऱ्यांमध्ये ईस्ट इंडिया कंपनी आणि जमीनदार यांच्या विरोधात प्रचंड असंतोष पसरला होता. त्याची परिणीती म्हणून शेतकऱ्यांनी अनेक उठाव केले. स्वातंत्र्यसंग्रामातील भारतातील विविध प्रांतात पसरलेला पहिला मोठा उठाव म्हणून १८५७चा उठाव मान्यता पावलेला आहे. त्यात शेतकऱ्यांचा सहभाग खूप मोठ्या प्रमाणावर होता. पुढेही स्वातंत्र्य चळवळींमध्ये हे असंतोषाने पेटलेले शेतकरी अग्रक्रमाने पुढे होते त्याशिवाय भारताच्या विविध भागात छोटे -मोठे अनेक शेतकऱ्यांचे उठाव झाले होते. यात बंगाल आघाडीवर होता. १७६३ ते १८०० या कालावधीमध्ये बंगालमध्ये ‘संन्यासी उठाव’ झाला. ज्यात महिला, संन्यासी, फकीर यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश होता म्हणूनच याला संन्यासी उठाव असे नाव मिळाले. या आंदोलनावर आधारित ‘आनंदमठ’ ही कादंबरी बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिली आणि वंदे मातरम् हे गीत लिहिले. ज्यामुळे सर्वसामान्य लोकांमध्येही मोठ्या प्रमाणात या असंतोषाचे लोण पसरले आणि ‘वंदे मातरम’ ही घोषणा संपूर्ण भारताला मिळाली.
(लेखक स्वत: शेतकरी असून, आदिम बियाणी संवर्धन करत आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.