

-rat१०p१९.jpg
P२५N५०३४०
ः मंडणगड : तुळशी, माहू व पाले गावांच्या सीमांवर पेटलेल्या वणव्यांमुळे निसर्गातील नैसर्गिक संपत्तीचा दरवर्षी ऱ्हास होत आहे.
-----
वणव्यांमुळे नैसर्गिक संपत्तीचा ऱ्हास
मंडणगड तालुका; दरवर्षी कोट्यवधींचे नुकसान
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. १० ः वणव्यांचे आगडोंब उसळू लागणे हे मंडणगड तालुक्यातील दरवर्षीचे विदारक चित्र आहे. उन्हाच्या तीव्रतेबरोबर डोंगरांना वणवे लागण्याचे प्रमाण वाढले आहे. कारवाई व उपाययोजना होत नसल्याने वणव्यात दुर्मिळ वनसंपदेसह खासगी व सार्वजनिक संपत्तीचे कोट्यवधींचे नुकसान होते. दरवर्षी लागणाऱ्या वणव्यात आजपर्यंत हजारो हेक्टरचे क्षेत्र यात नष्ट झाले आहे. ऐन हंगामात आंबा-काजूला याचा फार मोठा फटका बसत असून, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे.
तालुक्यात डोंगरउताराच्या जमिनी गेल्या दहा वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर विकसित होत आहेत. याचबरोबर सर्व प्रमुख व उपरस्त्यांशेजारी डोंगरावर वनविभागाच्या सामाजिक वनीकरण विभागाने वृक्ष लागवड केली आहे; मात्र दरवर्षी डोंगरावर लागलेल्या आगीच्या भक्ष्यस्थानी लावलेली झाडे, औषधी वनस्पती, लहान पक्षी, प्राणी पडतात. ऐन हंगामात आंबा, काजू तसेच रानमेव्याची मोहरलेली झाडे होरपळतात. त्यामुळे मोठे नुकसान होते. पंचनामे होतात; पण नुकसान भरपाई मिळत नाही. दरवर्षी वणवा लागत असल्याने ही आग जाणीवपूर्वक लावली जाते की, अचानक लागते याचे कोडे अद्याप सुटलेले नाही. महसूल विभाग आगीनंतर नुकसानीच्या पंचनाम्याचे सोपस्कार पूर्ण करतो; मात्र नुकसान भरपाई निकषात बसत नाही. हे वणवे विझवण्यासाठी वनविभागाकडे आवश्यक साधनसामुग्री नसल्याने या वणव्यामुळे ही जंगले नष्ट होण्याची भीती पर्यावरणप्रेमी यांनी व्यक्त केली आहे.
----
जनजागृतीची आवश्यकता
ऐन हंगामात वणव्यापासून काजू, आंबा व अन्य फळं देणारी झाडे वाचवण्याच्यादृष्टीने जनजागृती करणे आवश्यक आहे. त्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती शेतकऱ्यांना देण्यासाठी संबंधित विभागाच्यावतीने कार्यक्रमांचे आयोजन करून मार्गदर्शन करणे गरजेचे बनले आहे. अशा वणवे लागण्याच्या घटना आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना केली नाही. यामुळे दिवसेंदिवस वणव्यांचे प्रमाण वाढत आहे.
----
आर्थिक गणित कोलमडते
चार महिन्यात काजू, आंब्याचे उत्पादन घेऊन कुटुंबाचे आर्थिक गणित शेतकऱ्यांकडून आखले जाते; मात्र वणव्यात मोहोर जळाल्याने अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होते तसेच झाडेही होरपळून गेल्याने ती जगण्याची शक्यता कमी होते. तुळशी, पाले, माहू, सावरी, पणदेरी, उमरोली, कोन्हवली, पाट, कोंझर, कुडुक, नारगोली, पालवणी, जावळे, आंबवली, म्हाप्रळ अशा तालुक्यातील सर्वच परिसरात, रस्त्यालगत वणवे पेटत आहेत. हे वणवे चार ते आठ दिवस धुमसत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.