

50400
कर्मचाऱ्यांचे ‘काम बंद’, स्वच्छतेचा बोजवारा
सावंतवाडीतील स्थिती; मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १० : येथील पालिकेच्या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या तीन दिवसांपासून काम बंद आंदोलन पुकारले आहे. याचा परिणाम शहरातील स्वच्छतेच्या कामावर दिसून येत आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन कायम राहणार असल्याची भूमिका कंत्राटी कामगारांनी घेतली आहे.
येथील पालिकेच्या तब्बल ७० हून अधिक कंत्राटी सफाई कर्मचारी शनिवार (ता. ८) पासून काम बंद आंदोलनात उतरले आहेत. एकूणच सद्य:स्थितीत पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांमार्फत शहरातील स्वच्छता कशीबशी सुरू आहे. कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलनामुळे स्वच्छतेचा बोजबारा आहे. तरीसुद्धा पालिकेच्या स्वच्छता विभागाकडून परिपूर्ण शहराची स्वच्छता करण्यावर कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. याशिवाय कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याच्या दृष्टीनेही पालिका प्रशासन कटिबद्ध आहे. मात्र, काही तांत्रिक मुद्दे आणि अडचणी लक्षात घेता यामध्ये अडथळा निर्माण झाला आहे. लवकरात लवकर कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मार्ग काढण्यात येईल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. तरीसुद्धा सफाई कर्मचारी जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरूच राहील या भूमिकेवर ठाम आहेत.
कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार पालिकेचे स्वच्छतेचे टेंडर संपून सहा ते सात महिने झाले तरीसुद्धा नवीन टेंडर काढण्याबाबत कोणतीही कारवाई झालेली नाही. त्याच ठेकेदारची मुदत वाढवून काम सुरू आहे. कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांमध्ये नव्याने कर्मचारी भरणा करण्यात आली आहे. कामावर रुजू होऊन काहींना दहा, काहींना पाच तर काहींना चार महिने झाले आहेत. पगारासोबत त्यांचा ईपीएफ कट करून घेतला जातो. पण, खात्यावर तो जमा केला जात नाही. काही जणांचा पगार चेकने किंवा हाती दिला जातो. कर्मचाऱ्यांकडून बँक पासबुक झेरॉक्स घेऊन सुद्धा पगार आजही हाती दिला जातो, हे चुकीचे आहे. मुळात ईपीएफ देताना कामगारांचा साडेबारा टक्के आणि ठेकेदाराचा साडेबारा टक्के असा २५ टक्के ईपीएफ देणे ग्राह्य असताना फक्त साडेबारा टक्केच ईपीएफ दिला जातो. बऱ्याच वेळा त्यातही कमतरता असते. तसेच सफाई कर्मचाऱ्यांमधील कचरा गाडीवर असलेल्या वाहक-चालकांचा रखडलेला साडेतीन वर्षांचा ईपीएफ अद्यापही देण्यात आला नाही, तो देण्यात यावा. लहू चव्हाण या सफाई कर्मचाऱ्याचा एक महिन्याचा पगार द्यावा, अशा विविध मागण्या त्यांनी नगरपालिका प्रशासनासमोर मांडल्या.
----------------
काय आहेत प्रमुख मागण्या
* नव्याने टेंडर भरल्यावर ठेकेदाराकडून १९ क्रमांकाचा फायनल सेटेलमेंट फॉर्म भरून घ्यावा
* नवीन नियमानुसार पगाराची रक्कम द्यावी
* दहा वर्षांचा अनुभव असलेल्याच सुपरवायझर म्हणून नेमावे
* वाहकचालकांचा रखडलेला साडेतीन वर्षांचा ईपीएफ द्यावा
* २५ टक्के ईपीएफ कट करून तत्काळ जमा करावा
----------
कोट
कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी मागण्यांसाठी काम बंद आंदोलन छेडल्याने पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांमार्फत शहरातील स्वच्छतेवर भर दिला आहे. सफाई कामगारांच्या मागण्याप्रमाणे नव्याने घेतलेल्या सफाई कर्मचाऱ्यांचा ईपीएफ काही तांत्रिक अडचणीमुळे रखडला आहे, तो त्यांच्या खात्यावर लवकरच जमा केला जाईल. अन्य मागण्यांबाबतही प्रशासनाकडून तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.
- पांडुरंग नाटेकर, स्वच्छता निरीक्षक, सावंतवाडी नगरपालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.