नेमळे कौल कारखाना आर्थिक तोट्यात

नेमळे कौल कारखाना आर्थिक तोट्यात

Published on

50419

नेमळे कौल कारखाना आर्थिक तोट्यात

अध्यक्ष आत्माराम राऊळ : पालकमंत्री राणेंना आर्थिक सहकार्यासाठी हाक

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १० : तालुक्यातील नेमळे सहकारी कौल उत्पादक संस्थेला विशेष खास बाब म्हणून दोन कोटी रुपये शासकीय भाग भांडवल देऊन आर्थिक सहकार्य करा, अशी मागणी संस्थेच्या संचालक मंडळाच्या माध्यमातून अध्यक्ष आत्माराम राऊळ यांनी राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नीतेश राणे यांच्याजवळ केली.
संस्थेच्या माध्यमातून संचालक मंडळामार्फत श्री. राऊळ यांनी पालकमंत्री राणे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नेमळे येथील कौल उत्पादक संस्था ही सहकारी तत्त्वावर चालणारी सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांतील एकमेव औद्योगिक सहकारी संस्था आहे. १९६३ ला अधिकृतरीत्या मान्यता मिळवून ती सुरू करण्यात आली. या संस्थेच्या माध्यमातून बांधकामासाठी लागणाऱ्या विटा, मंगलोरी कौले, काच कौले, हुंड्या यांचे उत्पादन घेण्यात येते. संस्थेच्या माध्यमातून काम करणारे कामगार हे बांधकाम व्यवसायाखाली काम करणाऱ्या प्रकारांमध्ये मोडतात. कोरोना कालावधीत ही संस्था आर्थिक तोट्यात सापडली. त्या चार महिन्यांत कुठल्याही प्रकारचे उत्पादन घेण्यात आले नाही. शिवाय जुलै ते सप्टेंबर या चार महिन्यांत पावसाळी हंगाम असल्याने युनिट मशिनरी व भट्टी दुरुस्तीसाठी बंद असते. एकूणच आठ महिने कौले कारखान्यातून काहीच उत्पादन घेण्यात आले नाही. मात्र, असे असले तरी संस्थेमध्ये काम करणाऱ्या कामगार व कर्मचाऱ्यांना पगार देणे संस्थेला भाग पडले. त्यामुळे संस्था आर्थिक अडचणीत येऊन तोट्यात सापडली.
---
७५ लाखांपेक्षा जास्त कर्ज
सद्य:स्थितीत जवळपास ७५ लाखांपेक्षा जास्त कर्ज संस्थेवर असून, शासनाच्या हरित लवाद कायद्याच्‍या धोरणानुसार कच्चामाल, माती तसेच जळावू लाकूड यांची वेळोवेळी उपलब्धता होत नसल्याने उत्पादनातही घट होऊन संस्थेला आर्थिक भार सोसावा लागत आहे. सद्य:स्थितीत १०० कामगार व १० कर्मचाऱ्यांना रोजीरोटी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच उत्पादन वाढवून तोटा भरून काढण्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे.
---
शासकीय भाग भांडवलाची मागणी
यासाठी शासनाकडून विशेष खास बाब म्हणून दोन कोटी शासकीय भाग भांडवल उपलब्ध करून देण्यात यावे, असे म्हटले आहे. संस्थेच्या माध्यमातून दिलेल्या या निवेदनानंतर पालकमंत्री राणे यांनी संबंधित खात्याच्या मंत्र्यांच्या माध्यमातून मदत करण्याचे आश्वासन यावेळी संचालक मंडळ तसेच अध्यक्ष राऊळ यांना दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com