स्मरण जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांचे
संतांचे संगती -------लोगो
(६ मार्च टुडे ३)
स्मरण जगद्गुरू
श्री तुकाराम महाराजांचे
फाल्गुन हा भारतीय वर्षाचा अखेरचा महिना. या महिन्यात कृष्ण द्वितीयेला जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांची पुण्यतिथी तसेच फाल्गुन वद्यषष्ठीला प्रपंच नेटकेपणाने करता करता परमार्थही साधणाऱ्या श्री एकनाथ महाराजांची पुण्यतिथी येते. या निमित्तानेच त्यांच्या वाङ्मयाचे किंचितसे चिंतन करूया. ज्ञानदेवे रचिला पाया उभारीले देवालया या शब्दांमध्ये भागवत धर्माचा पाया श्री ज्ञानेश्वर माऊलींनी रचला, असे सांगितले आहे. या देवालयाचा कळस म्हणजे जगद्गुरू श्री तुकाराम महाराज असे म्हटले आहे. श्री तुकाराम महाराजांचे कार्य खरोखरच अद्भुत आहे.
- rat१२p२.jpg-
25N50778
- धनंजय चितळे, चिपळूण
----
व्यवहारातील उदाहरणे देत तुकोबाराय करतात अंतर्मुख
सोप्या सोप्या शब्दांमध्ये व्यवहारातील उदाहरणे देत देत श्री तुकाराम महाराज सामान्यजनांना अंतर्मुख करतात. त्यांना परमार्थ का करावा, ते सांगून खऱ्या परमार्थाची दिशाही दर्शवतात. कधीकधी ते आईच्या मायेने मृदू शब्दात अज्ञजनांना समजावून सांगतात. जसे आपण देवांचे स्मरण का करत नाही, हा प्रश्न लोकांना विचारताना ते म्हणतात,
का रे नाठवीसी कृपाळू देवासी
पोसीतो जगासी एकला तो।।
जन्माला आलेले मूल असो की, कुठेही वाढणारे झाड असो सर्वांची काळजी श्री भगवंतच घेत असतात म्हणूनच त्यांना तू का बरे आठवत नाहीस? असा प्रश्न ते लोकांना विचारतात; पण वारंवार सांगूनही कोणी ऐकत नाही, हे पाहिल्यावर ते बापाप्रमाणे कठोर होतात आणि कठोर शब्दात सांगतात.
आतातरी उघडी डोळे जरी अद्यापी न कळे
तरी मातेचीया खोळे दगड आला पोटासी ।।
अजून सुद्धा तुला कळले नसेल तर आईच्या पोटी जन्माला आलेला तू एक दगड आहेस. वाचकहो, एखाद्याला दगड म्हणणे यापेक्षा आणखी कोणती निर्भर्त्सना करावी? अर्थात, आपण हा उपदेश करत आहोत तो ऐकणारे फार कमी असणार. आपण आपले सांगण्याचे कर्तव्य करावे, याची त्यांना पूर्ण जाणीव होती म्हणूनच
बुडते हे जन देखवे ना डोळा
येतसे कळवळा म्हणोनिया
या धारणेतूनच त्यांनी जनोपदेश केला. त्यांना पक्के माहित होते की, फार कमी मंडळी आपले म्हणणे मानतील म्हणूनच ते म्हणाले, तुका म्हणे जातो सादवीत वाटे
भेटो तरी भेटे कोणी एक।।
त्यांनी काव्यरचना केली; पण मी कर्ता असे न मानता बोलविता धनी वेगळाची हेच सांगितले. मी बोलत नाही तर मज विश्वंभर बोलवितो, असे सांगणाऱ्या या संतश्रेष्ठ जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांनी समाजाला खरेखुरे अ-भंग अर्थात् कधीही भंग न पावणारे असे अक्षरधन उपलब्ध करून दिले आहे. श्री महाराजांचा व्यवहारातील धन मिळवण्यावर आक्षेप नव्हता तर ते धन चांगल्या व्यवहाराने मिळवावे आणि स्वतःचा प्रपंच साधता साधता समाजासाठीसुद्धा त्या धनाचा उपयोग व्हावा असाच त्यांचा आग्रह होता .
जोडोनिया धन उत्तम व्यवहारे
उदास विचारे वेच करी ।।
हीच त्यांची शिकवण होती. आध्यात्मिक माणूस हा पोशाखाने ओळखू नये तर त्याचे बोलणे त्याची वृत्ती यावरून त्याचे पारख करावी असेच त्यांचे सांगणे होते म्हणूनच एका अभंगांमध्ये ते म्हणतात,
अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ
त्याचे गळा माळ असो नसो।।
अर्थात, जो मनाने स्वच्छ आहे आणि सर्वांशी चांगल्या भाषेत बोलतो तो खरा परमार्थिक, मग त्याने गळ्यात माळ घातलेली असू दे अथवा नसू दे. ज्या प्रमाणे श्री ज्ञानेश्वर महाराजांनी
साचा आणि मवाळ। मितले आणि रसाळ।
शब्द जैसे कल्लोळ। अमृताचे।।
या शब्दात संतांच्या बोलण्याचे वैशिष्ट्य सांगितले आहे. त्याचप्रमाणे वाचेचा रसाळ या शब्दात श्री तुकाराम महाराजांनी संतांच्या वक्तृत्वाचे लक्षण सांगितले आहे. त्यांच्या गाथेतील अभंगांमधील अनेक चरण हे सुविचार किंवा सुवचने म्हणून आपण नेहमी म्हणतो किंवा ऐकतो. जसे,
भले तर देऊ कासेची लंगोटी
नाठाळाचे माथा हाणू काठी।।
आम्ही चांगल्याशी चांगले वागू; पण दुष्टाशी त्याच्याप्रमाणेच वागू. (त्याला धडा शिकवू) असाच आणखी एक अभंग चरण प्रसिद्ध आहे,
विंचू देव्हाऱ्यावरी आला देवपूजा नावडे त्याला
तेथे पैजाराचे काम अधमासि तो अधम
जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांच्या अभंगातील अशा आणखी काही विचारपुष्पांचे चिंतन पुढील भागात करूया.
(लेखक संत आणि संस्कृतीचे अभ्यासक आहेत. )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

