

-rat१२p१७.jpg-
२५N५०८१३
रत्नागिरी : कार्यक्रमात गायन करताना कलाकार सूरमणि पंडित श्रीपाद पराडकर, दीपा पराडकर-साठे, पंडित ललित पराडकर, मुग्धा भट-सामंत व वादक कलाकार.
----
स्वरवंदना श्रवणीय मैफलीत श्रोते मंत्रमुग्ध
पराडकरबुवांना आदरांजली ; शास्त्रीय, अभंग, नाट्यगीतांना रसिकांची दाद
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १२ : ग्वाल्हेर घराण्याचे प्रसिद्ध गायक व पद्मभूषण सी. आर. व्यासांचे गुरू गायनाचार्य (कै.) पंडित राजाराम बुवा नारायण पराडकर शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीनिमित्त आयोजित ‘स्वरवंदना’ मैफलीत श्रोते मंत्रमुग्ध झाले. महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे जयेश मंगल कार्यालयात हा कार्यक्रम रंगला.
(कै.) राजारामबुवांचे चिरंजीव सूरमणि पंडित श्रीपाद पराडकर, त्यांची नात दीपा पराडकर- साठे, नातू पंडित ललित पराडकर आणि रत्नागिरीच्या गायिका मुग्धा भट-सामंत यांनी शास्त्रीय, उपशास्त्रीय, अभंग, नाट्यगीते ऐकवली. हार्मोनियमसाथ चैतन्य पटवर्धन, तबलासाथ हेरंब जोगळेकर, पखवाज साथ मंगेश चव्हाण, तालवाद्यसाथ अद्वैत मोरे व निवेदन दीप्ती कानविंदे यांनी केले. मैफलीचे नियोजन रत्नागिरीतील खल्वायन संस्थेने केले. संचालन व लेखन प्रदीप तेंडुलकर यांनी केले.
सूरमणि पराडकर यांनी एक बंदिश सादर केली. पराडकर-साठे यांनी आपल्या दमदार आवाजात राग भूपाल तोडीमधील बंदिश, मज भेटूनी जाहो, का धरिला परदेश, माझे अछडे बछडे छकुडे, हरी माझा सावळा व राजारामबुवांची तान बान शरण तुला देवा ही भैरवी सादर केली. पंडित पराडकर यांनी राग कौशी कानडा रागातील बंदिश, आम्हा न कळे ज्ञान व रूप सावळे सुंदर हे अभंग व भुलविले कृष्णाला ही गीते सादर केली. भट-सामंत यांनी गोविंद गोविंद, जोहार मायबाप जोहार, योगियां दुर्लभ तो म्या हे अभंग, नयने लाजवित हे नाट्यगीत आणि तुझ्या मनात कुणीतरी लपलंय गं, ही गाणी आपल्या सुरेल आवाजात सादर केली.
खल्वायनचे अध्यक्ष मनोहर जोशी यांनी कलाकार आणि श्रोत्यांच्या प्रतिनिधी म्हणून प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस. एस. गोसावी यांच्या सुविद्य पत्नी नीता गोसावी यांचे स्वागत केले. मैफल यशस्वीतेसाठी सांस्कृतिक कार्य संचालनालय, खल्वायनचे अध्यक्ष मनोहर जोशी, कार्यवाह प्रदीप तेंडुलकर, खजिनदार श्रीनिवास जोशी यांनी विशेष परिश्रम घेतले. ध्वनी व्यवस्थापन उदयराज सावंत यांनी केले.
--------
वेरळचे सुपुत्र
श्रोत्यांना (कै.) पंडित राजारामबुवांच्या आवाजातील देवगिरी बिलावल राग ऐकवण्यात आला. (कै.) राजारामबुवा हे वेरळ (ता. लांजा) गावचे सुपुत्र. या संगीतभूषण कुटुंबाची ओळख व माहिती या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्हा सर्वांना झाली तसेच अतिशय सुरेल आणि दमदार आवाजात काही नवीन तसेच काही जुनी गाणी नव्या चालीत ऐकायला मिळाली. याबद्दल श्रोत्यांनी सांस्कृतिक कार्य संचालनालयाला धन्यवाद दिले. तब्बल साडेचारशे श्रोत्यांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला. बऱ्याच दिवसांनी श्रोत्यांना अशी पर्वणी लाभल्याचे अनेक रसिकांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.