रत्नागिरी ः धार्मिक परंपरेसह सांस्कृतिक एकोपा
सकाळ विशेष--------लोगो
50806
50807
50802
50803
धार्मिक परंपरेसह सांस्कृतिक एकोपा
कोकणातील शिमगोत्सव; नव्या संकल्पनांमुळे ‘हायटेक’ उत्सव, पर्यटनाला मिळू शकते चालना
इंट्रो
कोकणातील शिमगा हा केवळ एक सण नसून सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक आणि आर्थिक महत्व वाढवणारा गावकऱ्यांच्या एकजुटीचा, परंपरांचा आणि भक्तीभावाचा उत्सव आहे. भारतभर होळी साजरी केली जाते; पण कोकणात हा सण शिमगोत्सवाच्या रूपाने अधिक भव्य आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. ग्रामदेवतेच्या पालख्या, शरणे, होळी पूजन, संकासूर, ढालकाठी, खेळे, लोककला आणि पारंपरिक जल्लोष यामुळे शिमगा हा कोकणातील सर्वात मोठा आणि उत्साहवर्धक सण मानला जातो. गावाच्या संस्कृतीशी, शेतीशी आणि ग्रामदैवताशी निगडित असलेला भक्तीचा सण लोकसंस्कृती, परंपरा आणि भक्तीभावाचे दर्शन घडवतो. ग्रामसंस्कृती, ग्रामदेवांचे महात्म्य अधोरेखित करणारी गाणी, लघुपट, व्लॉग व्हिडिओ, संदेशात्मक पेहराव यामुळे कोकणचा शिमगा सण आता जगभर पोहचला असून हायटेक बनला आहे.
- सचिन माळी, मंडणगड.
------
प्रत्येक गावामध्ये ग्रामदेवता असते. ही ग्रामदेवता गावाचे रोगराई, नैसर्गिक आपत्ती यांसारख्या संकटांपासून रक्षण करते, असा समज आहे. या ग्रामदेवतेची पालखी शिमगा सणाच्या काळात गावातून फिरवली जाते. पालखी घरोघरी जाते आणि भाविक तिची पूजा करतात. पालखीसोबत वाद्ये, नृत्य आणि गाणी असतात. पालखीचे गावात आगमन हा एक आनंदाचा आणि उत्साहाचा क्षण असतो. ग्रामदेवतांची पालखी ही गावातील लोकांच्या श्रद्धेचे प्रतीक आहे. त्यालाच देव घरी येणे असे म्हटले जाते. ही प्रथा कोकणातच पाहायला मिळते. या निमित्ताने गावातील लोकांमध्ये एकोपा वाढतो. सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेता येतो. सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून कोकणातील प्रसिद्ध शिमगोत्सव देशाच्या कानाकोपऱ्यात पोचला आहे. त्यामुळे अनेकजण या प्रथा पाहण्यासाठी कोकणात दाखल होतात. त्यामुळे आपसूकच याला पर्यटनाची जोडही मिळू शकते. त्याचे योग्य पद्धतीने मार्केटिंग झाले तर त्याचा उपयोग स्थानिक व्यावसायिकांना होऊ शकतो. त्यासाठी व्यावसायिकांनी, गावातील लोकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.
------
देव घरी येण्याचा सोहळा
रूपे लावून ग्रामदेवतेची मूर्ती मंदिरातून पालखीत बसवून गावातून फिरवली जाते. ज्यामुळे ग्रामस्थांना देवतेचे दर्शन घेण्याची संधी मिळते. गावातील प्रत्येक घरात पालखी नेण्यात येते. वर्षानुवर्ष ठरवलेल्या दिवसांनुसार घरोघरी देव पाहुणचाराला येतात, असं मानलं जातं. ग्रामदेवता घरोघरी जात असल्याने स्वागताची रांगोळी, गोडाधोडाचा नैवेद्य दाखवून देवाची पूजा केली जाते. महिला ग्रामदेवतेची आस्थेने ओटी भरतात. गावातील प्रत्येक घरात पालखी नेण्याचा सोहळा पार पडल्यावर पालखी नाचवणे हा उत्साहवर्धक कार्यक्रम करण्यात येतो. हा उत्सव पाहण्यासाठी देश-विदेशातील पाहुणे मंडळीदेखील कोकणात येतात.
------
देवतांची भेट
गावाच्या वेशीवर, गावभेटीदरम्यान दुसऱ्या गावातील ग्रामदेवता यांच्या भेटी घडतात. या वेळी पालखी नाचवताना त्या एकमेकींची ओटी भरतात, असं म्हटलं जातं. यासाठी पालखी नाचवताना पालख्यांमधील ओटीचे खण-नारळ बदलण्यात येतात. कोकणवासियांसाठी हा क्षण अविस्मरणीय असतो.
-------
शिमग्यातील होमाचा पवित्र विधी
होम म्हणजे होळी पूजन व होलिकादहन हा एक प्रमुख विधी असतो. होम म्हणजे पवित्र अग्निकुंडात आहुती देणे, ज्याचा संबंध शुद्धीकरण, वाईट शक्तींचा नाश आणि नवीन ऊर्जेच्या स्वागताशी आहे. हा होम गावाच्या मंदिराजवळ, चौरस्त्यावर किंवा विशेष होळीच्या ठिकाणी केला जातो. होम झाल्यानंतर त्यातील उरलेल्या अंगारांवरून लोकं उडी मारतात, याला पवित्र मानले जाते. होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगांची उधळण केली जाते, यालाच धुलिवंदन म्हणतात. शिमगा हा कोकणातील एक महत्त्वाचा सांस्कृतिक वारसा आहे. या सणामध्ये पारंपरिक लोककला, नृत्य, गाणी आणि वाद्ये सादर केली जातात, ज्यामुळे कोकणची संस्कृती जिवंत राहते. शिमगा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. या दिवशी होळी पेटवून वाईट विचारांचे दहन केले जाते. लोकांच्या मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
-----------
*धार्मिक महत्त्व
- शिमगा सणामध्ये ग्रामदेवतांची पूजा केली जाते.
- ग्रामदेवता गावाची रक्षणकर्ती मानली जाते त्यामुळे तिची पूजा करणे महत्त्वाचे असते.
- शिमगा सणामुळे लोकांच्या मनात धार्मिक भावना आणि श्रद्धा वाढते.
- होमाचे सांस्कृतिक व धार्मिक महत्त्व
- वाईट शक्तींचा नाश आणि चांगल्या ऊर्जेचे स्वागत
- शेतकरी आणि गावकरी नवीन पेरणीपूर्वी निसर्गाला वंदन करतात. गावकऱ्यांमध्ये ऐक्य आणि सामूहिक आनंद निर्माण होतो
----
सामाजिक व आर्थिक महत्त्व
कोकणातील माणूस नोकरी, व्यवसायासाठी कितीही लांब गेलेला असला तरी होळी आणि गणपतीच्या सणांना त्याचे पाय आपोआप गावाकडे वळतात. शिमगा लोकांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. शिमगा सणामुळे लोकांमध्ये सामाजिक एकोपा वाढतो. लोक एकत्र येतात, नाच-गाणी करतात आणि आनंद साजरा करतात. लोकांमध्ये सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण होते. शिमगा सणामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळते. या सणामध्ये अनेक लोक वस्तू आणि खाद्यपदार्थ खरेदी करतात ज्यामुळे स्थानिक व्यापार वाढतो. शिमगा सणामुळे पर्यटनाला चालना मिळते ज्यामुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळतो.
-----
शिमगोत्सवाचा लोकनायकः संकासूर
गुहागर तालुक्यातील शिमगोत्सवाचा लोकनायक संकासूर आहे. फाकपंचमी म्हणजे फाल्गुन शु. पंचमीला पहिली होळी लागते आणि गावोगावीचे खेळेपरंपरेनुसार गावभोवनीसाठी बाहेर पडतात. या खेळ्यांमधील काळे कपडे घातलेला, कंबरेला घुंगरांचा पट्टा असलेला, हातात छोटा चाबूक ज्याला वेट म्हणतात. डोक्यावर निमुळते होणारे तुरा असलेले व पांढरी दाढी असलेले टोपरे घातलेला हा संकासूर सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. या संकासुराला कोणी ग्रामदेवतेचा रक्षक म्हणत तर कोणी शंकराचा अवतार समजत. घरोघरी येणाऱ्या खेळ्यांमध्ये संकासूर नाचताना भेदक नजरेने चहुबाजूला पाहतो. कोणी चिडवले तर पाठलाग धरून पकडतो. पाया पडणाऱ्याच्या पाठीवर वेटेचा हळूवार फटका मारून आशीर्वादही देतो. अनेकजण या संकासूर आणि गौळणीसमोर नवसही बोलतात आणि नवसपूर्तीही करतात. शिमगोत्सव सुरू झाला की, गावात येणाऱ्या या संकासुराची लोक आतुरतेने वाट पाहात असतात.
--------
चौकट १
रायपाटणचा रोमट उत्सव
राजापूर तालुक्यातील राटपाटण येथील ग्रामदेवता श्री वडचीआई देवीचा होळी उत्सव आणि ‘रोमट’ अनोख्या पद्धतीने साजरा होतो. पौर्णिमेदिवशी होळी नाचवत आणली जाते. त्यानंतर धुलिवंदन दिवशी होळीला सजवून उभी करताना टोकावर नारळ बांधला जातो. हा नारळ काढण्याचा अनोख्या पद्धतीचा खेळ रंगतो. त्यात लहान-मोठी सर्वचजणं सहभागी होतात. होळीच्या उंच टोकाला बांधलेला नारळ काढण्यासाठी होळीवर चढण्याचा प्रयत्न सुरू होतो. त्यासाठी झुंबड उडते. त्याचवेळी होळीवर चढणाऱ्याला खाली खेचणारेही अनेकजणं असतात. या चढाओढीमध्ये यशस्वीरित्या नारळ काढणाऱ्यापैकी कोणीतरी एक यशस्वी होतो. त्यानंतर अनोख्या पद्धतीने रंगलेला रोमटाचा हा खेळ संपतो. गेल्या अनेक वर्षांची ही परंपरा रायपाटण येथे रोमट म्हणून साजरी होते.
-------
चौकट २
शिळमधील ‘खुणा’ शोधण्याची प्रथा
शिमगोत्सवाचा शुभारंभ वा त्यानंतर खुणा काढण्याची प्रथा आहे. त्याचवेळी आजच्या नवीन पिढीला आपली परंपरा, संस्कृती आणि देवाच्या दिव्यत्वाची प्रचिती यावी, या पिढीनेदेखील भविष्यात या परंपरा जोपासाव्यात आणि आपल्या संस्कृतीचे जतन करावे, हाही उद्देश त्यामध्ये समाविष्ट असतो. खुणा ठेवणे आणि काढण्याचीही अनोखी प्रथा आहे. त्यामध्ये खुणेच्या आदल्या रात्री ग्रामदेवतेचे मानकरी मंडळी गावातील एखादी सपाट जागा हेरून त्या ठिकाणी खड्डा खोदून त्यात नारळ आणि फुलं लपवतात. दुसऱ्या दिवशी ग्रामदेवतेची पालखी त्या ठिकाणी आणून ढोलताशाच्या गजरात नाचवली जाते. या वेळी खुणा ठेवणारे मानकरी खुणेच्या जागेवरची माती इतरत्र पसरवतात. त्यामुळे पालखी या मातीच्या रोखाने खुणेचा शोध घेते आणि लपवून ठेवलेली ही खुणा बिनचूक शोधून काढते.
-------
चौकट ३
सावर्डेचा होलटे उत्सव
सावर्डेचा होलटे होम उत्सव हा भाविकांचे प्रमुख आकर्षण आहे. ग्रामदेवता केदारनाथ, बाजी यांचा होळी उत्सव होलटे खेळाने सुरू होतो. गावातील प्रमुख खोत मंडळी आपल्या होळी वाजतगाजत पेटते होलटे घेऊन देवाच्या फडावर आणले जातात. या वेळी खोत मंडळी गावातील मानकरी, गुरव, गावकरी आदींना होलटे खेळ खेळण्यासाठी आमत्रंण दिले जाते. ही मंडळी आपापल्या होळीतील पेटते होलटे घेऊन देवाच्या नावाच्या फाका घालत होळीच्या विशिष्ट ठिकाणी येतात. होळीतील पेटते होलटे एकत्र करून फडाच्या जागेला नमस्कार करतात. त्यानंतर रात्री दहा वाजता पेटते होलटे एकमेकाच्या विरूद्ध दिशेला फेकत उत्सवाला सुरवात होते. एका बाजूला खोत व दुसऱ्या बाजूला गावातील अन्य वाड्यांचे ग्रामस्थ अशी रंगत येते. हा प्रकार तीनवेळा केला जातो. त्यानंतर गुरव, मानकरी, गावकरी व ग्रामस्थ मंडळी देवाला गाऱ्हाणे घालतात. त्यानंतर पेटते होलटे एकत्र करून मोठी होळी उभारली जाते. गुरूवारी (ता. १३) रात्री बारा वाजता आंब्याच्या झाडाची विधीवत पूजा करून तो माड तोडून होळी म्हणून उभारला जातो. शुक्रवारी (ता. १४) पहाटे पाच वाजता होळी उभी करण्यात येणार आहे, असे सावर्डे येथील सूर्यकांत चव्हाण यांनी सांगितले.
------
चौकट ४
हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक
गोवळकोट-पेठमाप येथील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री देवी करंजेश्वरी व श्री देव सोमेश्वर देवस्थानचा शिमगोत्सव हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. गोवळकोट येथील जामा मस्जिदीला पालखी भेट देते. चौगुले कुटुंबीयांतर्फे मानाची पहिली आरती करून हा उत्सव सुरू होतो. कोकणातील पहिला शिमगोत्सव चिपळुणात सुरू होतो तसेच गोविंदगडावरील श्री रेडजाईदेवी भेटीचा कार्यक्रमही चिपळुणात प्रसिद्ध आहे. या शिमगोत्सवातील शेरणे कार्यक्रम तर भाविकांच्या जिव्हाळ्याचा विषय मानला जातो. पेठमाप येथील वाशिष्ठी नदी किनाऱ्यावरील मैदानात सुमारे तीन तास हा कार्यक्रम लाखो भाविकांच्या साक्षीने साजरा होतो. चिपळूण शहरातील ग्रामदैवत जुना व नवा कालभैरव देवस्थानचा प्रसिद्ध शिमगोत्सव फाल्गुन पौर्णिमेच्या मध्यरात्रीपासून प्रारंभ होतो. कालभैरव देवस्थानची बहीण म्हणून ओळख असलेल्या शहराजवळील मिरजोळी येथील श्री देवी महालक्ष्मी देवस्थानचा शिमगोत्सव सुरू होतो.
-------
कोट 1
उत्साहवर्धक असणाऱ्या शिमगा सणात प्रसारित झालेले ग्रामदैवत आणि शिमगा सणाचे वर्णन करणारी गाणी मनात आत्मिक भावभक्ती निर्माण करतात. त्यातून देवतांचे महात्म्य अधोरेखित होते. आपल्या गावाच्या शिमगोत्सवाची ओळख व्हावी, या हेतूने गाण्यांची नवनिर्मिती होत असून त्यातून कोकणचा सांस्कृतिक वारसाही जोपासला जातो आहे.
- समीर तटकरे, गायक
-------
कोट 2
समाजमाध्यमांवरून गुहागरचा संकासूर, शिमगोत्सवातील पारंपरिक खेळे हे देशाच्या कानाकोपऱ्यातच नव्हे तर जगभरात पोचलेले आहेत. त्यामुळे अनेक पर्यटक शिमगोत्सवाच्या काळात खेळे पाहण्यासाठी गुहागर तालुक्यात येऊ लागले आहेत. ही संख्या दरवर्षी वाढत जाईल आणि त्यामधून पर्यटनाला चालना मिळेल.
- संतोष घुमे, असगोली
-------
कोट 3
शिमगोत्सवात पालखी नाचवणे, पारंपरिक पद्धतीने ढोलवादन, कोकणातील विविध प्रथा याबाबत पर्यटकांमध्ये उत्सुकता असते. त्या दृष्टीने पावलेही उचलली जातात; परंतु याच कालावधीत कोकणातील बहुसंख्य वर्ग या उत्सवात व्यस्त असतो. या कालावधीत पर्यटकांची सरबराई करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध नसते. त्यामुळे अनेकवेळा अडचण होत असते; परंतु ग्रामीण पातळीवर नियोजन केले गेले तर निश्चितच याचा फायदा होईल.
- सुहास ठाकूरदेसाई, हॉटेल व्यावसायिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

