आर्थिक फसवणूक, सायबर क्राईम तपासाला मिळणार गती
50892
आर्थिक फसवणूक, सायबर क्राईम तपासाला मिळणार गती
संकेतस्थळ अपडेट ः पोलिस दलातर्फे ऑनलाईन तक्रारीचाही पर्याय
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १२ ः सिंधुदुर्ग पोलिस दलाचे संकेतस्थळ (वेबसाईट) अपडेट करण्यात येत आहे. याचा विशेषतः पर्यटकांना फायदा होणार आहे. शिवाय याद्वारे ज्येष्ठ नागरिक, महिला यांच्यासह आर्थिक फसवणूक, सायबर क्राईम यांच्याशी संबंधित तक्रारी आता ऑनलाईन सुद्धा नोंदवता येणार आहेत. यासाठी संकेतस्थळाबरोबरच व्हॉटस्अॅप नंबरचा पर्यायही उपलब्ध करून दिल्याची माहिती आज जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी दिली.
पोलिस अधीक्षक इमारतीतील सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १०० दिवसांचा सात कलमी कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यात प्रत्येक विभागाने आपली संकेतस्थळ अद्ययावत करावे, अशी महत्त्वाची अट घातली आहे. त्या अनुषंगाने सिंधुदुर्ग पोलिसांची संकेतस्थळ अद्ययावत करण्याचे काम सुरू असून ९९ टक्के काम पूर्ण झाले आहे. यामध्ये अपेक्षित बदल सुचविण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार युझर फ्रेंडली संकेतस्थळ तयार केले आहे.
जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक, महिला यांच्यासाठी स्वतंत्र सूची ठरवली आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिक, महिला आपल्या समस्या मांडू शकतात. तक्रारही दाखल करू शकतात. याची तत्काळ दखल घेऊन आवश्यक मदत केली जाणार आहे. पर्यटकांसाठी उपलब्ध माहिती मराठी आणि इंग्रजी भाषेत दिली आहे. जिल्ह्यांत असलेले पोलिस बीट तसेच हवाई, सागरी व रस्ते मार्ग यांचीही माहिती दिली आहे. वाहतूक कोंडी, चोरी झाल्यावर ई-तक्रार दाखल केल्यास त्वरित मदत देण्याची व्यवस्था केली आहे. जिल्ह्यातील हेल्पलाईन नंबर, रुग्णवाहिका नंबर ठळक दिसतील, असे नोंदवले आहेत. जिल्ह्यात होणारे महत्त्वाचे महोत्सव कधी आणि कुठे होतात, याबाबत सविस्तर मांडणी केली आहे. जिल्ह्यात राहणाऱ्या भाडेकरूंची माहिती दिली आहे. या सर्व सुविधा देताना त्यात ‘आम्ही कशी मदत करू शकतो’ हा कॉलम ठेवून कशाप्रकारे मदत केली जाईल, याचीही माहिती संकेतस्थळावर आहे. एखादी व्यक्ती ज्या ठिकाणी असेल त्याला त्याच्या नजिकचे पोलिस ठाणे माहीत होईल, अशीही माहिती आहे. पोलिस ठाणे आणि प्रभारी अधिकाऱ्यांच्या संपर्क नंबरमुळे ती व्यक्ती मदतीसाठी तत्काळ संपर्क करू शकते.
ऑनलाईन पद्धतीने कशाप्रकारे आर्थिक फसवणूक करून सायबर क्राईम केला जातो, याचीही माहिती या संकेतस्थळावर आहे. यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या मोबाईलचा गैरवापर झाल्यास त्याचाही मोबाईल नंबर टाकल्यास कोणत्या ठिकाणी, किती वाजता गैरवापर करण्यासाठी मोबाईल वापरला गेला याचाही शोध घेता येणार आहे. तसेच शासनाच्या अन्य महत्त्वाच्या खात्यांची माहिती देण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्यातील तहसीलदार, मरीन अधिकारी, मत्स्य अधिकाऱ्यांचीही तालुकानिहाय माहिती दिली जाणार आहे. संकेतस्थळ अद्यावत करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. काही किरकोळ काम शिल्लक आहे. हे काम पूर्ण झाल्यावर थर्ड पार्टीच्या माध्यमातून अद्यावत संकेतस्थळ सायबर हल्ल्यापासून सुरक्षित आहे का? याची शहानिशा होईल, असेही पोलिस अधीक्षक अग्रवाल यांनी सांगितले.
-------------
काय आहे संकेतस्थळात?
अद्ययावत केलेल्या संकेतस्थळात जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची तालुकानिहाय माहिती आहे. त्यात पर्यटन स्थळाचा फोटो व माहिती, पर्यटकांना सिंधुदुर्ग जिल्हा कसा सुरक्षित आहे? येथे सुरक्षेसाठी कोणती मदत मिळू शकते? जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांचा नकाशा, प्रभारी पोलिस अधिकारी फोटो, नाव व संपर्क क्रमांक तसेच मदतीसाठी १०९३ हा डायल नंबर देण्यात आला आहे. एखाद्या व्यक्तीने वेबसाईटवर ऑनलाईन तक्रार केली तरी त्याची तत्काळ दाखल घेतली जाणार आहे. व्हॉट्सअप सुध्दा देण्यात आले असून याद्वारे तक्रार केली तरी त्याची दखल घेऊन तत्काळ मदत केली जाणार आहे, असे अग्रवाल यांनी सांगितले.
--------------
जिल्हा नियोजनकडे सीसीटीव्हींची मागणी
जिल्ह्यात २०१६ मध्ये बसविण्यात आलेले सीसीटिव्ही बंद झाले आहेत. त्यांना दुरुस्तीचा खर्च जास्त येत आहे. त्यामुळे ते बदलण्याचे काम सुरू आहे. सागरी भागात सीसीटीव्ही बसविणे आणि जिल्हा राजधानी सिंधुदुर्गनगरीमध्ये सीसीटीव्ही वाढविणे गरजेचे आहे. यासाठी जिल्हा नियोजनकडे स्वतंत्र निधीची मागणी केली आहे. आंबोली येथेही सीसीटीव्ही बसविण्यासाठी निधी हवा आहे. जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणे स्वच्छ व सुंदर करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. चोरी, अपघात आणि गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेली वाहने पोलिस ठाणे परिसरात मोठ्या प्रमाणात असल्याने अडचण आहे. नवीन कायद्याचा आधार घेत ही वाहने नष्ट करण्यासाठी न्यायालयात अर्ज करण्यात येत आहेत, असेही पोलिस अधीक्षकांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

