

जिल्ह्यातील १९ गावातील वाद मिटले
शिमगोत्सव ; दोन गावात जमावबंदी लागू
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १२ : जिल्ह्यात शिमगोत्सवाचा ज्वर चढत असतानाच मानपानावरून असलेल्या पारंपरिक वादामुळे केळवडे (ता. राजापूर) आणि नागावे (ता. चिपळूण-अलोरे) या दोन गावांमध्ये जमावबंदी आदेश लागू केला आहे. गावात पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्रित येण्यास बंदी घालण्यात आली आहे. जिल्ह्यातील १९ गावांमधील वाद सामोपचाराने मिटवण्यात पोलिसांना यश आले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या सूचनेवरून उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस निरीक्षकांनी बैठका घेऊन गावातील वाद मिटवले आहेत.
जिल्ह्यात शिमगोत्सवाला सुरवात झाली आहे. कोकणातील पारंपरिक मोठ्या सणांपैकी एक म्हणून शिमगोत्सवाकडे पाहिले जाते. त्या निमिताने गावाबाहेर राहणारे चाकरमानी मुंबई-पुण्यासह उर्वरित महाराष्ट्रातून जिल्ह्यात दाखल होतात. अशावेळी मानपानावरून पारंपरिक वाद उफाळून येतात. मानपानावरून होणाऱ्या वादाचे पर्यावसान हाणामारीपर्यंत येऊन शिमग्याच्या सणाला गालबोट लागते. हे टाळण्यासाठी जिल्हा पोलिसदल प्रयत्नशील आहे. शिमगोत्सवापूर्वी २१ गावांमध्ये देवस्थान, पालखीवरून वाद होते. केळवडे (राजापूर), नागावे (अलोरे-चिपळूण) येथील पारंपरिक वाद मिटवण्यासाठी पोलिसांनी वारंवार गावभेट, बैठका घेतल्या; परंतु दोन्हीही बाजूंकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यामुळे तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे या दोन्ही गावांमध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.
उर्वरित १९ गावांमध्ये मध्यस्थी वाद मिटवण्यात जिल्हा पोलिसांना यश आले आहे. दोन्ही गटातील नागरिकांनी एकोप्याने सण साजरा करण्याचा शब्द जिल्हा पोलिसांना दिला आहे. त्यामध्ये देवरूखमध्ये दख्खन, निवधे, ओझरे खुर्द, निवे खुर्द, सोनारवाडी, साडवली, राजापूर तालुक्यातील चुनाकोळवण, पाथर्डे, लांजा तालुक्यातील हर्दखळे, वाडगाव, पुनस, बोरथडे, नाटे पोलिस ठाण्यांतर्गत देवाचे गोठणे, धाऊलवल्ली, खेडमधील चाटव, सावर्डेमधील सावर्डे, मांडकी, जामसूद, गुहागरमधील आबलोली अशा १९ गावांमधील वाद सामोपचाराने सुटले आहेत.
----
जिल्ह्यात कडक पोलिस बंदोबस्त
शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, सर्वत्र अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिल्हा पोलिस दलासह राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या, एसआरपी बटालियन, होमगार्ड शिमगोत्सवावर लक्ष ठेवणार आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरासह ग्रामीण भागात गस्त वाढविण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.