लोटेतील उद्योजकांना ''ब्लॅकमेल'' करण्याचे प्रकार
51144
लोटेतील उद्योजकांना ‘ब्लॅकमेल’ करण्याचे प्रकार
विशेष पोलिस महानिरीक्षकांकडून दखल; यापुढे त्रास देणाऱ्यांची गय नाही
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १४ : लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांना ब्लॅकमेल करण्याचे, त्यांना नाहक त्रास देण्याचे प्रकार सध्या वाढत आहेत. या विरोधातील तक्रारी उद्योजकांनी लोटे दौऱ्यात कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक संजय दराडे यांच्यासमोर मांडल्या. यावर कुठल्याही उद्योजकांना कोणी व्यक्ती अथवा संघटना विशिष्ट हेतूने नाहक त्रास देऊन ब्लॅकमेलिंग करत असतील तर त्यांची यापुढे गय केली जाणार नाही, असे आश्वासन दराडे यांनी उद्योजकांना दिले.
कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक दराडे यांनी लोटे परशुराम उद्योजक संघटनेच्या समस्या जाणून घेण्यासाठी उद्योगभवन येथे भेट दिली. या वेळी लोटे परशुराम उद्योजक संघटनेच्यावतीने दराडे यांचा सन्मान करण्यात आला. उद्योजक संघटनेचे अध्यक्ष अॅड. राज आंब्रे यांनी प्रास्ताविकात लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांचा गोषवारा केला आणि पोलिस महानिरीक्षकांना याबाबत लक्ष घालून सहकार्य करण्याची विनंती केली. दराडे यांनी संपूर्ण पोलिस खाते उद्योजकांच्या पाठीशी आहे. उद्योजकांना नाहक त्रास देणाऱ्यांचा बंदोबस्त आम्ही करतो; मात्र उद्योजकांकडूनही काही चुका झाल्या तर त्याकडेही पोलिस खात्याचे लक्ष असणार आहे. लोटे परशुराम औद्योगिक वसाहत दिवसेंदिवस प्रगती करत आहे. परिणामी, येथील लोकवस्ती आणि रहदारी वाढली आहे म्हणून लोटे येथे पोलिस दूरक्षेत्राऐवजी अद्ययावत पोलिस ठाण्याची गरज आहे. याबाबत उद्योजक संघटनेकडून आलेला प्रस्ताव आम्ही सकारात्मकदृष्टीने पाहून पुढे पाठवला आहे आणि लवकरच येथे नवीन पोलिस ठाणे असेल, असेही आश्वासन दिले.
या वेळी विनती ऑरगॅनिकचे जनसंपर्क अधिकारी सचिन खरे यांनी औद्योगिक वसाहतीत कंटेनर, टँकर यांसारखी अवजड वाहने नेहमी ये-जा करत असतात. या वाहनांना चौपदरीकरण झालेल्या महामार्गावरून अपेक्षित कारखान्याकडे जाताना सोयीचे व्हावे यासाठी महामार्ग प्राधिकरणाकडे विनंती करून आम्हास योग्य ती सोय करून द्यावी, अशी ही विनंती उद्योजकांच्यावतीने केली. जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, चिपळूणचे उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, खेडचे नितीन भोयर, लोटे पोलिस दूरक्षेत्राचे उपनिरीक्षक संजय पाटील, रत्नागिरी गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी, घरडा केमिकल्सचे आर. सी. कुलकर्णी, आनंद भोसले, एक्सेल इंडस्ट्रीजचे आनंदा पाटणकर, सुप्रिया लाईफ सायन्सचे संजय सावंत, विश्वास जोशी, मिलिंद बारटक्के, राजेश तिवारी आदी उपस्थित होते.
चौकट
उद्योजकांकडून तक्रारींचा पाढा
लोटे औद्योगिक क्षेत्रात उद्योजकांना ब्लॅकमेलिंग करण्याचे प्रकार वाढत असतानाच दुसरीकडे नाहक त्रास देण्याच्या हेतूने वारंवार उद्योगांची माहिती मागवणाऱ्या अर्जाचा ढीग विविध शासकीय कार्यालयांमध्ये पडत असल्याची कैफियत या सभेत उद्योजकांकडून मांडण्यात आली. यावर तक्रार द्या कारवाई करतो, असे दराडे यांनी सांगितले. यावर उद्योग चालवायचा असल्याने कुठलाही उद्योजक तक्रार करण्यास पुढे येत नाही. याउलट पोलिस खात्यानेच शासकीय कार्यालयांमध्ये माहिती अधिकारात अर्ज करणाऱ्यांची माहिती घेऊन कडक कारवाई करावी, अशी मागणी केली. यावर महानिरीक्षकांनीही योग्य ती कारवाई केली जाईल, असे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

