बारा वाड्यांचा अधिपती श्री देव भैरीचा शिमगा सुरू

बारा वाड्यांचा अधिपती श्री देव भैरीचा शिमगा सुरू

Published on

51108
51109

श्री देव भैरीच्या शिमग्याला अलोट गर्दी
बारा वाड्यांचा अधिपती ; नवलाई-पावणादेवीच्या भेटीप्रसंगी जयघोष
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १४ : होळी पौर्णिमेला बारा वाड्यांचा अधिपती श्री देव भैरीचा शिमगोत्सव अपूर्व उत्साहात, अलोट गर्दीत सुरू झाला. तत्पूर्वी सडामिऱ्या येथील नवलादेवी-पावणादेवी व जाकिमिऱ्या येथील श्री देवी नवलाई, श्री देवी पावणाई या बहिणींच्या पालख्यांची भेट भैरी मंदिराच्या प्रांगणात झाली. भैरीची पालखी देवी जोगेश्वरीच्या मंदिरात पोहोचली तेथे गाऱ्हाणे घालण्यात आले. तेथेही अलोट गर्दी झाली.
नवलाई-पावणाई पालख्यांनी श्री भैरीची भेट घेऊन शिमगोत्सव, होळी उभे करणे वगैरे कार्यक्रम निर्विघ्न पार पडण्याची प्रार्थना केली. हुरा रे हुरा आणि आमच्या भैरीबुवाचा सोन्याचा तुरा ऽऽ रे होलिओऽऽ ही फाक दुमदुमली.
भैरी मंदिरात नगारा व शंखवादन करण्यात आले. ढोलताशांचा मंगलनाद आणि भैरी.. भैरी.. असा गजर मंदिर परिसरात घुमला. गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी, नेत्रदीपक विद्युत रोषणाई, रंग उधळत होळीपौर्णिमा रंगली. श्री देव भैरी हा बारा वाड्यांचा रखवालदार. त्यामुळेच लाखो भाविक भैरीच्या चरणी नतमस्तक होतात. श्री भैरी हा अधिपती असल्याने त्याला भेटण्यासाठी आसपासच्या गावांतील ग्रामदेवता येतात. यामध्ये हरचेरी, काजरघाटी, टेंभ्ये, नाचणे, मिरजोळे आणि मिऱ्यावरील ग्रामदैवतांचा समावेश आहे.
पौर्णिमेला श्री देव भैरी जोगेश्‍वरीची होळी तोडण्यासाठी बाहेर पडतो. तत्पूर्वी सडामिऱ्या आणि जाकिमिऱ्या येथील देवी भैरीची मंदिरात भेट घेतात. या पालख्यांची विधीवत पूजा करण्यात आली, धूपारत करण्यात आली, गाऱ्हाणे घालण्यात आले. त्यानंतर या दोन्ही बहिणींची भेट मंदिराच्या प्रांगणात झाली. हा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक आतुरतेने वाट पाहत होते.
एका बाजूला ढोलताशांचा गजर, श्री भैरी, जोगेश्‍वरी, नवलाई-पावणाई, तृणबिंदूकेश्‍वराचा शिमगा म्हणजे सर्वांत मानाचा मानला जातो. त्यामुळे भैरीच्या मंदिरात बारा वाड्यांतील मानकरी, समस्त ग्रामस्थ, मुंबईकर चाकरमानी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले आहेत.

चौकट १
अलोट गर्दी
नवलाई- पावणाई पालख्या भेटीचा अनोखा क्षण टिपण्यासाठी मोबाईल व निरनिराळ्या कंपन्यांचे महागडे कॅमेरे घेऊन भाविक प्रयत्न करत होते. पालख्या खेळवणे आणि भेट घडवण्यासाठी शेकडो हात पुढे सरसावत होते.

चौकट २
मंत्री उदय सामंत नतमस्तक
ग्रामदैवत श्री देव भैरीच्या चरणी उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत हे रात्री उशिरा मंदिरात भैरीचरणी नतमस्तक झाले. मिऱ्या येथील नवलाई-पावणाई पालख्यांची भेट आणि ग्रामदैवत श्री भैरीची पालखी होळीसाठी मंदिराबाहेर येईपर्यंत सामंत उपस्थित होते. त्यांनी सर्व ट्रस्टींसह भाविकांचीही भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com