‘शबय शबय, होळी रे होळी...’
51189
‘शबय शबय, होळी रे होळी...’
भिरवंडेतील उत्सव ः चैत्र पाडव्यापर्यंत उत्साहाला उधाण
कणकवली, ता. १४ : कोकणातील होळी उत्सव हा निसर्गाशी नाते जोपासणारा. होळीच्या दिवशी आंबा, नारळ, सुपारी आणि बेडला माड अशा विविध झाडांची होळी केली जाते. तब्बल पंधरा दिवस साजऱ्या होणाऱ्या उत्सवाला भिरवंडेत कालपासून (ता.१३) प्रारंभ झाला. ‘शबय शबय, होळी रे होळी पुरणाची पोळी’ अशा आरोळ्याही कानी पडल्या.
मंदिर परिसरात, वाडी वस्तीवर अशा विविध होळ्या उभारल्या जातात. काही ठिकाणी तमाशा अर्थात मांड केले जातात. पारंपरिक संगीताच्या तालावर गावागावात तमाशा होतात. या कोकणातील तिन्ही जिल्ह्यांमध्ये होळी उत्सव साजरा करण्याच्या वेगवेगळ्या प्रथा आहेत. दक्षिणेकडील भागात अर्थात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येही वेगवेगळ्या पद्धतीने होळी उत्सव साजरा होतो. रूढी परंपरेने होलिका उत्सव हा मंदिरामध्येही साजरा होतो. देव देवतांच्या ओठ्या भरणे असाही उत्सव काही ठिकाणी साजरा केला जातो. परंतु, सार्वजनिकदृष्ट्या विचार केला तर होळीच्या दिवशी विविध प्रकारच्या झाडांची होळी तयार केली जाते. होळीसाठी झाडाची निवड करण्यासाठी विशेष वर्गाला अधिकार दिले आहेत. त्यानंतर संपूर्ण गाव एकत्र जमून जिथे होळीसाठी झाड निवडले आहे. ते तोडले जाते. तिथून ‘शबय शबय, होळी रे होळी पुरणाची पोळी’ अशा विविध प्रकारच्या आरोळ्या देत मोठ्या उत्साहाच्या वातावरणात होळी मंदिरामध्ये किंवा चव्हाट्यावर आणली जाते. तिथे पारंपरिक पद्धतीने देवाला साकडे घालून पेटवली जाते. या उत्सवात वर्षभराची दुःख विसरून आणि कटू आठवणींना होळीच्या ज्वालांमध्ये ठेवून नवी वर्षाची वाट चोखाळली जाते. कारण, होळी नंतर चैत्र पालवीला सुरुवात होते. पाडव्यापासून हे नववर्ष साजरे केले जाते. त्यामुळे गतवर्षाला आणि त्या गतवर्षातील कटू आठवणीला तिलांजली देण्याची येथे प्रथा आहे.
---
नवरंग उधळणारा उत्सव
गावागावात होणाऱ्या तमाशामध्येही सोंग आणले जाते. तमाशासाठी पुरुष मंडळी स्त्री वेशांमध्ये नाचगाणे करतात. गावागावांमध्ये फिरून तळी घेतली जाते. रात्री मांडावर तमाशा होतो. गावात होणाऱ्या चोऱ्या किंवा शेतकऱ्यांचे होणारे नुकसान आदी घटना या माध्यमातून समाजासमोर अप्रत्यक्षरीत्या आणल्या जातात. होळीच्या पंधरा दिवसांच्या कालावधीत वाद होत नाहीत. नवरंग उधळणारा उत्सव म्हणून तो साजरा होतो. कोकणात त्याला ‘धूळ मारणे’ असेही म्हणतात. होळी पौर्णिमेपासून चैत्र पाडव्यापर्यंत हा उत्सव साजरा होतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

