

तीन एक्स्प्रेसना थांब्यासाठी
शरद पवार यांना साकडे
साडवली ः माजी कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरदचंद्र पवार यांची निसर्गरम्य चिपळूण-संगमेश्वर फेसबुक ग्रुपच्या सदस्यांनी भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस आणि रत्नागिरी जिल्हा निरीक्षक बबन कनावजे यांच्या पुढाकाराने ही भेट घेण्यात आली. या वेळी कनावजे यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सुरेश बने, ग्रुपचे प्रमुख संदेश जिमन, दीपक पवार, मंगेश बाईत, राकेश शिर्के उपस्थित होते. मागील दीड वर्षांपासून संघटनेचे सर्व सदस्य आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी एकजुटीने आपल्या मागण्यांचा विचार कोकण रेल्वे आणि रेल्वे बोर्डाने लवकरात लवकर करावा यासाठी निवेदन, प्रस्ताव, आंदोलन, उपोषण, बैठका सर्व गोष्टी करत आहेत. केवळ वेळकाढूपणा होतो आहे. आपल्यानंतर मागणी करणारी राज्ये आपल्या राज्यात एक्स्प्रेसला थांबे मिळवण्यात यशस्वी झाली आहेत; पण उपेक्षा मात्र संगमेश्वर तालुक्यातील जनतेच्या वाट्याला आली आहे. सर्वच राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, वाडीवस्तीतील मंडळे, ग्रामपंचायती, स्थानिक आमदार, खासदार यांची या थांब्यासंदर्भात रेल्वेकडे पत्रे गेली असून, आता माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनीसुद्धा केंद्रीय रेल्वे बोर्डाकडे पत्र पाठवले आहे. हे ना ते कारण सांगून वेळकाढूपणा करणारे कोकण रेल्वे आणि रेल्वेबोर्ड आतातरी संगमेश्वरवासीयांच्या मागण्यांचा विचार करून थांबे देणार का, याकडे कोकणवासीयांचे लक्ष आहे.
५१०८५
एमइएस कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये विविध उपक्रम
चिपळूण ः जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून एमइएस कॉलेज ऑफ नर्सिंग व रोट्रॅक्ट क्लब ऑफ एमइएस कॉलेज ऑफ नर्सिंग यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या वेळी महिलांना आरोग्य तसेच शिक्षण विषयक मार्गदर्शन करण्यात आले. तसेच विविध स्तरातील महिलांचा सन्मान करण्यात आला. आरोग्य व शिक्षणक्षेत्रात काम करणाऱ्या महिलांनादेखील निमंत्रित केले होते. यामध्ये लोटे प्राथमिक आरोग्य केंद्रअंतर्गत शीतल पवार, परशुराम रुग्णालयाच्या मेट्रन स्नेहल साळवी, कविता विनोद सराफ हायस्कूलच्या शिक्षिका महाडिक, परशुराम रुग्णालयाच्या जनसंपर्क अधिकारी सुष्मिता पाटील व व एमइएस कॉलेज ऑफ नर्सिंगच्या मेघना गोखले यांचा समावेश होता. पारकर यांनी स्त्रीचे समाजातील स्थान याबरोबरच समाजात वावरताना विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांनी कशा प्रकारची काळजी घ्यायला हवी, यावर विशेष मार्गदर्शन केले. या क्षेत्रातला त्यांचा अनुभव मोठा असल्यामुळे अनेक उदाहरणे देऊन त्यांनी आपले मुद्दे पटवून सांगितले.
रोटरी क्लबतर्फे भेटवस्तूचे वाटप
चिपळूण : रोटरी क्लब चिपळूणच्यावतीने डीबीजे महाविद्यालयातील महिला विकास कक्षाला दोन शिलाई मशीन प्रदान करण्यात आल्या. रोटरी क्लब चिपळूणच्या या सामाजिक उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. महिलांनी या संधीचा उपयोग करून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचा संकल्प केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव बापट, उपप्राचार्य तळपसर, पर्यवेक्षिका कुलकर्णी आदींनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका दीशा दाभोळकर यांनी केले, तर आभार प्राध्यापिका तृप्ती यादव यांनी मानले.
डीबीजेत यशवंतराव चव्हाण यांची जयंती
चिपळूण ः येथील डीबीजे महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे अभ्यासकेंद्र चालवले जाते. या केंद्रामध्ये नुकतेच महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी करण्यात आली. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव बापट व पर्यवेक्षिका प्रा. स्नेहल कुलकर्णी यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी केंद्र संयोजक प्रा. विनायक बांद्रे उपस्थित होते. यशवंतरावांच्या विचारांचा वारसा जोपासणे हे फार महत्त्वाचे आहे. महाराष्ट्राचे ते द्रष्टे नेते होते, असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य बापट यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजना विभागप्रमुख प्रा. अरुण जाधव, मराठी विषयाच्या प्रा. तृप्ती यादव, कार्यालयीन कर्मचारी राहुल सावंत उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.