काँग्रेसच्या ३५ वर्षांच्या संघर्षाला हवे बळ
काँग्रेसच्या ३५ वर्षाच्या संघर्षाला हवे बळ
प्रदेशाध्यक्षांची पडझड रोखण्यासाठी बांधणी ; अंतर्गत वाद थोपविण्याचे आवाहन
मुझफ्फर खान, सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १७ : काँग्रेसचे नूतन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ रत्नागिरी दौऱ्यावर येवून गेले. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील काँग्रेसच्या पडझडीचा आढावा घेतला. तसेच कार्यकर्त्यांसह प्रमुख नेते, दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतल्या नेत्यांना कानमंत्रही दिला. मात्र ३५ वर्षात पक्षाची झालेली वाताहात आणि पडझडीचे काय? ते आता काँग्रेसला गत वैभव मिळवून देण्यासाठी बळ देणार का? यासाठी नवी टीम कशी उभी करणार असे प्रश्न विचारले जात आहेत.
जिल्ह्यातील काँग्रेसला मागील अनेक वर्षापासून नेतृत्व नाही. येथील काँग्रेस दोन गटात विखुरलेली आहे. कार्यकर्ते कमी आणि वाद जास्त, अशी येथील काँग्रेसची अवस्था आहे. प्रत्येक तालुक्यात गट आहेत. नेत्यांचा दौरा असला किंवा पक्षातील पद वाटायचे झाले तर वाद उफाळून येतो. प्रतिस्पर्धी गट किती निष्क्रिय आहे हे नेत्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जणू कार्यकर्त्यांमध्ये स्पर्धा सुरू होते. त्यात पक्षाच्या नावावर कोण किती मलिदा जमवतो, निवडणुकीत उमेदवारी घेऊन कोणी विरोधी पक्षाबरोबर हात मिळवणी केली, पैसे घेऊन कोणी पद मिळवले यावर चर्चा होते. काँग्रेसचे नूतन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ रत्नागिरी दौऱ्यावर येणार असल्याचे जाहीर झाल्यानंतरही तेच झाले.
एका गटाने पक्षाची सूत्र आपल्या हातात मिळवण्यासाठी फिल्डिंग लावली तेव्हा त्या गटाला पक्षाची पदे मिळू नये, यासाठी वातावरण निर्माण करण्यात आले. २००७ मध्ये नारायण राणे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राणे पक्ष वाढवण्यासाठी सर्व बाजूने सक्षम होते. त्यामुळे काँग्रेस वाढेल असे वाटले होते. मात्र त्याही काळात काँग्रेसला उभारी घेता आली नाही. अनेक वेळा मुंबईत राहणारे नेते जिल्हयातील काँग्रेस चालवतात. त्यामुळे पक्षाचे नुकसान होते. बदलत्या काळानुसार हा पक्ष कधी बदलला नाही. तेच तेच नेते पारंपरिक पद्धतीने कार्यकर्त्यांवर लादले जात असल्यामुळे पक्ष वाढत नाही, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. जिल्ह्यात आपले अस्तित्व घट्ट करण्यासाठी दोन्ही शिवसेना झगडत आहे. दुसरीकडे भाजप तळागाळापर्यंत संघटना बांधणीसाठी प्रयत्न करीत आहे. दोन्ही राष्ट्रवादी चे अस्तित्व टिकवण्यासाठी जिल्ह्यात प्रयत्न सुरू आहे. अजित पवारांची राष्ट्रवादी चिपळूण आणि खेड जिल्ह्यामध्ये मर्यादित आहे. अशावेळी रत्नागिरीत आलेल्या राजकीय वादळात काँग्रेसची अस्तित्वासाठी धडपड सुरू आहे.
जिल्ह्यावर १९७२ पासून ते १९९० पर्यंत काँग्रेस पक्षाचे मोठे वर्चस्व होते. त्यानंतर काँग्रेसला जिल्ह्यात नेतृत्व न मिळाल्याने पडझड सुरू झाली ते आतापर्यंत सुरूच आहे. गेल्या ३५ वर्षांपासून उभारीसाठी काँग्रेसची येथे धडपड सुरू असून यात यश आलेलं नाही. काँग्रेसचे नूतन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ जिल्ह्यातील काँग्रेसला कशा पद्धतीने उभारी देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यातील काँग्रेस आपले अस्तित्व टिकवण्यासाठी मागील ३५ वर्षापासून संघर्ष करीत आहे. नव्या प्रदेशाध्यक्षांकडून या संघर्षाला बळ मिळेल असे सांगितले जात आहे. जिल्ह्याचे नेतृत्व जुन्या नेत्याकडे देणार की नव्या दमाच्या नेत्याची निवड करणार याची सर्वांना उत्सुकता आहे.
कोट
काँग्रेसमध्ये काम करण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. नव्या दमाचे लोक तयार आहेत. नवीन लोकांना पक्षाने संधी दिली पाहिजे. लोकांमध्ये मिसळणारा आणि प्रसंगी लोकांसाठी संघर्ष करणारा पदाधिकारी पक्षाने दिला पाहिजे तरच काँग्रेसला जिल्ह्यात उभारी शक्य आहे.
- लियाकत शाह, तालुका अध्यक्ष चिपळूण काँग्रेस
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

