

51777
शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार दूर करा
कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक ः संघटनेचे सिंधुदुर्गनगरीत आंदोलन
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १७ ः आयटी शिक्षकांच्या समायोजनाचा शासन आदेश, अंशतः अनुदानप्राप्त शिक्षकांना वाढीव टप्पा, शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार दूर करा यांसह विविध मागण्यांसाठी आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सिंधुदुर्ग जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करून लक्ष वेधण्यात आले.
या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष प्रा. डी. जे. शितोळे, एस. डी. गावकर, पी. बी. वनवे, ए. पी. चव्हाण, एन. एम. मासी, पी. बी. किल्लेदार, के. आर. बागेवाडी, एन. के. साळवी, ए. एस. मांगले, एन. के. प्रभू, ए. जी. गुरसाळे, ए. ए. कांबळे, पी. ए. मालवणकर, एस. एस. गुरव आदी प्राध्यापक सहभागी झाले.
राज्यातील कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांच्या समस्या प्रलंबित असल्याने व त्याबाबत वारंवार आश्वासने देऊनही निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याने राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक नाराज आहेत. शिक्षणमंत्र्यांनी पदभार घेतल्यापासून कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी एकदाही स्वतंत्र बैठक घेतली नाही व समस्यांचे निराकरण केले नाही, असा आरोप यावेळी करण्यात आला.
आयटी शिक्षकांच्या समायोजनाचा शासन आदेश, अंशतः अनुदानप्राप्त शिक्षकांना वाढीव टप्पा, सेवाअंतर्गत आश्वासित प्रगती योजना, शाळा संहितानुसार वर्गातील विद्यार्थी संख्येचे निकष पाहणे आदी मागण्यांचे आदेश निघाले नाहीत. त्याबाबत अनेकदा निवेदने देऊनही अद्याप चर्चाही केली नाही. त्यामुळे शिक्षकांच्या मनात असंतोष निर्माण झाला असल्याने पुन्हा महासंघाने आंदोलनाचे हत्यार उगारल्याचे यावेळी सांगण्यात आले.
--
इतर काही मागण्या
शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे आश्वासित प्रगती योजना लागू करावी, प्रलंबित वाढीव पदांचे समायोजन त्वरित करावे, निवृत्तीचे वय ६० वर्षे करावे, अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया बंद करावी, शिक्षकांची रिक्त पदे त्वरित भरावीत, शिक्षकांना शैक्षणिक कामे देऊ नये व शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार दूर करावा, या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन छेडण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.