''सिंधुदुर्ग अॅडव्होकेट प्रीमियर लीग''चे आयोजन

''सिंधुदुर्ग अॅडव्होकेट प्रीमियर लीग''चे आयोजन
Published on

swt184.jpg
51925
कुडाळः ‘सिंधुदुर्ग अॅडव्होकेट प्रीमियर लीग २०२५’ बाबत माहिती देताना अॅड. संग्राम देसाई. बाजूला अॅड. अमोल सामंत, अॅड. विवेक मांडकुलकर, अॅड. यतीश खानोलकर, अॅड. अविनाश परब, अॅड. मिहिर भणगे आदी. (छायाचित्र ः अजय सावंत)

‘सिंधुदुर्ग अॅडव्होकेट प्रीमियर लीग’चे आयोजन
अॅड. संग्राम देसाईः कुडाळ एमआयडीसी येथे आज उद्घाटन सोहळा
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १८ः सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटना व बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवाचे सदस्य अॅड. संग्राम देसाई यांच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ‘सिंधुदुर्ग अॅडव्होकेट प्रीमियर लीग २०२५’ चे आयोजन २० ते २३ मार्च कालावधीत सावंतवाडी व मालवण येथे केले आहे. स्पर्धेचा प्रारंभ सोहळा उद्या (ता. १९) आमदार नीलेश राणे यांच्या हस्ते सायंकाळी ७ वाजता कुडाळ एमआयडीसी येथील बॅ. नाथ पै कॉलेजच्या भव्य मैदानावर होणार आहे. चार दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत महाराष्ट्रातील सहा जिल्हे सहभागी झाले आहेत. आठ संघांमधून १०९ खेळाडू खेळणार असल्याची माहिती अॅड. संग्राम देसाई यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 
येथील लाईम लाईट हॉटेलच्या सभागृहात आज पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी अॅड. अमोल सामंत, अॅड. विवेक मांडकुलकर, अॅड. यतीश खानोलकर, अॅड. अविनाश परब, अॅड. मिहिर भणगे, अॅड. महेश शिंपूकडे, अॅड. आनंद गवंडे, अॅड. प्रथमेश नाईक आदी उपस्थित होते.
या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, उत्तर गोवा व दक्षिण गोवा येथील १३७ वकिलांनी स्पर्धेच्या लिलाव प्रक्रियेत सहभाग घेतला होता. स्पर्धेची लिलाव प्रक्रिया ५ मार्चला झाली. स्पर्धेत एकूण आठ संघमालकांनी संघ घेतलेले आहेत. त्यापैकी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अॅड. अनिल निरवडेकर व अॅड. नीलिमा गावडे, कोल्हापूरमधून रवींद्र जानकर व अमित सिंग, सांगली जिल्ह्यातून अॅड. प्रशांत जाधव, सातारामधून अॅड. श्रीकांत पन्हाळे व गोव्यातून अॅड. अनुप कुडतरकर, सोलापूरमधून अॅड. श्रीकांत फटाते असे आठ संघ आहेत. स्पर्धेचे प्रथम पारितोषिक ५५,५५५ व चषक, द्वितीय ३३,३३३ व चषक, तृतीय व चतुर्थ पारितोषक ११,१११ रुपये व चषक देण्यात येणार आहे.
स्पर्धेचा उद्घाटन सोहळा उद्या (ता. १९) कुडाळ एमआयडीसी येथील बॅ. नाथ पै कॉलेजच्या मैदानावर सायंकाळी ७ वाजता आमदार नीलेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. स्पर्धेत २० व २१ मार्चला आठ संघांमध्ये साखळी सामने सावंतवाडी येथील जिमखाना मैदान व मालवण बोर्डिंग ग्राउंड येथे, २२ ला सेमी फायनल व २३ ला अंतिम सामन्याचे आयोजन मालवण येथील बोर्डिंग ग्राउंडवर करण्यात आले आहे. सर्वांनी या आगळ्या वकिलांच्या क्रिकेट स्पर्धेचा आस्वाद घ्यावा. आठ संघांचे मालक व त्यांच्या संघातील खेळाडूंची माहिती व कोणता संघ कोणत्या तारखेला कोणत्या मैदानावर खेळेल, याची देखील माहिती उपलब्ध असेल. लीग पद्धतीचे सामने १५ षटकांचे राहतील. उपांत्य फेरी व अंतिम फेरीचे सामने २० षटकांचे असतील, अशी माहिती अॅड. देसाई यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com