सलग ३० कलाकृती रेखाटून केला विक्रम

सलग ३० कलाकृती रेखाटून केला विक्रम
Published on

-rat१८p५.jpg-
२५N५१९३७
विष्णू परीट
-rat१८p६.jpg-
२५N५१९३८
विष्णू परीट यांनी काढलेल्या कलाकृती
---
सलग ३० कलाकृती रेखाटून विक्रम
विष्णू परीट यांची किमया : ऑनलाइन चित्रकला स्पर्धा
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १८ ः जलरंग माध्यमातून कोकणचा निसर्ग सर्वदूर पोहोचवणारे प्रख्यात चित्रकार विष्णू परीट यांनी सलग तीस दिवस विविध विषयांवरील तीस कलाकृती रेखाटून एक विक्रम केला आहे. देशस्तरावरील एका ऑनलाइन चित्रकला स्पर्धेत सहभाग घेत त्यांनी हा विक्रम नोंदवला. चित्रकार म्हणून या स्पर्धेत सहभागी होताना विविध विषयांवर कलाकृती रेखाटल्याचा आनंद आपल्याला मिळाल्याचे परीट यांनी सांगितले.
चित्रकार हिना भट या दरवर्षी सलग एक महिना ऑनलाइन चित्र स्पर्धा आयोजित करत असतात. यामध्ये विद्यार्थी, कलाकार अशा विविध गटांचा समावेश असतो. देशाच्या विविध राज्यातून अनेक कलाकार या स्पर्धेत सहभागी होत असतात. कलाकाराने कलाकृती रेखाटनापासून अंतिम कलाकृती साकार होईपर्यंत त्याचे विविध टप्पे कलारसिकांपुढे सादर करणे या स्पर्धेत अपेक्षित असते. दररोज रात्री आठ वाजण्यापूर्वी अंतिम रेखाटन भट यांच्या साइटवर ऑनलाइन अपलोड करणे बंधनकारक ठेवण्यात आले होते.
परीट यांनी १५ फेब्रुवारीला या स्पर्धेत सहभाग घेतला. ही स्पर्धा १६ मार्चला समाप्त झाली. या दरम्यान त्यांनी जलरंगासह ऑइल पेस्टल या माध्यमात काम केले. विशेष म्हणजे केवळ निसर्गावर रेखाटन आणि रंगकाम न करता वेरूळची मंदिरे, बाजार, व्यक्तिचित्रे, गल्ल्या, रस्ते अशा विविध विषयांवर सलग तीस दिवस कलाकृती रेखाटल्या. या स्पर्धेदरम्यान विविध विषय हाताळण्याचा परीट यांनी निश्चय केला होता. एकही दिवस खंड न करता त्यांनी ही ऑनलाईन स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल त्यांचे प्रख्यात चित्रकार शिल्पकार प्रकाश राजेशिर्के, प्राचार्य चित्रकार माणिक यादव, पुणे येथील चित्रकार सतीश सोनवडेकर, चित्रकार दत्ता हजारे आदींनी अभिनंदन केले आहे.
---
युवा कलाकारांना लाभ
हिना भट आयोजित ऑनलाईन चित्रकला स्पर्धेत सलग ३० दिवस ऑनलाईन प्रात्यक्षिकांचेदेखील आयोजन करण्यात आले होते. या प्रात्यक्षिकांचा युवा कलाकारांना चांगलाच लाभ झाला. या प्रात्यक्षिकात महाराष्ट्रातील प्रख्यात चित्रकार मनोज सकळे, अमित ढाणे, सुरभी गुळवेलकर आदींचा समावेश होता. अशा प्रकारची स्पर्धा आयोजित करून कलाकारांना प्रोत्साहन दिल्याबद्दल स्पर्धा आयोजक भट यांना परीट यांनी धन्यवाद दिले आहेत.
-
कोट
या ऑनलाईन चित्रकला स्पर्धेत सहभाग घेताना आपल्या हातून अधिकाधिक काम व्हावे, असा आपला मुख्य उद्देश होता. आपण रेखाटलेल्या कलाकृती पाहून विविध ठिकाणच्या मान्यवर कलाकारांकडून कौतुक आणि काही सूचनाही येत होत्या. कऱ्हाड येथील विख्यात चित्रकार दादासाहेब सुतार यांनी आपण वेरूळ येथील रेखाटलेल्या कलाकृतीबाबत प्रत्यक्ष संपर्क साधून या कलाकृतीचे कौतुक केले, हा आपल्यासाठी सर्वाधिक आनंदाचा क्षण होता.
विष्णू परीट, चित्रकार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com