

सिंधुदुर्गात शनिवारी
राष्ट्रीय लोकअदालत
ओरोस ः राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांच्यामार्फत शनिवारी (ता. २२) राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन केले आहे. २०२५ या वर्षातील ही पहिली लोकअदालत असून जिल्ह्यातील सर्व न्यायालयांतील तडजोडपात्र दिवाणी व फौजदारी प्रलंबित प्रकरणे, तसेच दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. जिल्हा न्यायालय, सिंधुदुर्ग तसेच सर्व तालुका न्यायालयांतील तडजोडपात्र प्रलंबित प्रकरणे, दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये नेमून घ्यावीत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून पक्षकारांना केले आहे.
................
‘सटमटवाडी-डिंगणे
रस्ताकाम पूर्ण करा’
बांदा ः बांदा-सटमटवाडी-डिंगणे रस्ता डांबरीकरणासाठी खोदाई करून २० दिवस झाले, तरी काम बंद आहे. ग्रामस्थ व शालेय विद्यार्थ्यांना खूप त्रास होत आहे. लोकप्रतिनिधी, अधिकारी, कंत्राटदार याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. पावसाळ्यापूर्वी काम होईल, असे वाटत नाही. तातडीने काम सुरू न केल्यास सटमटवाडी ग्रामस्थांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला. यासंदर्भात आयोजित बैठकीला आनंद वसकर, प्रदीप कळंगुटकर, संजय केळकर, सूरज मांजरेकर, विठ्ठल केळकर, संतोष वीर, विवेक केळकर, विष्णू वसकर, आदित्य आपटे, शेखर गोरे, महेंद्र मांजरेकर, बाबली कळंगुटकर, सचिन वीर, प्रमोद कळंगुटकर आदी उपस्थित होते. मागणी करूनही याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. पालकमंत्री नीतेश राणे यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे लक्ष वेधण्याचे ग्रामस्थांनी ठरविले.
.......................
मालवणात शुक्रवारी
आरोग्य चिकित्सा
मालवण ः श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानतर्फे शुक्रवारी (ता. २१) दुपारी ३ ते सायंकाळी ६ पर्यंत मालवण फोवकांडा पिंपळ येथील सुमतीछाया मेडिकल स्टोअरशेजारी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले आहे. यामध्ये पोटदुखी व पोटाचे विकार, अपचन व पित्ताचा त्रास, मूळव्याध उपचार, जखमांवर ‘व्हॅक्युम ड्रेसिंग’ यांसारख्या नव्या उपचार पद्धती, मूत्राशय व अंडकोशाचे आजार, बद्धकोष्ठतेचा आजार, सर्व प्रकारचे हर्निया या आजारांची मोफत तपासणी होणार आहे. यावेळी कुडाळ येथील डॉ. अनिकेत वजराठकर हे सर्जन उपस्थित राहणार आहेत. अधिक माहितीसाठी सुमतीछाया मेडिकल यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
.......................
कवठणीत येथे उद्या
‘अमृतवेल’ नाटक
सावंतवाडी ः शिमगोत्सवानिमित्त कवठणी-खालचीवाडी येथील स्फूर्ती नाट्य-कला मंडळातर्फे श्री काळोबा रंगमंच येथे गुरुवारी (ता. २०) रात्री १० वाजता डॉ. श्रीकृष्ण जोशी लिखित व रुपेश कवठणकर दिग्दर्शित ‘अमृतवेल’ हा संतकालीन दोन अंकी नाट्यप्रयोग होणार आहे. लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.