सिंधुदुर्ग विकासात माध्यमांची भूमिका महत्त्वाची
swt259.jpg
53363
सिंधुदुर्गनगरीः येथील पत्रकार भवन सभागृहात सिंधुदुर्ग ग्रंथोत्सवात आयोजित ‘भविष्यातील सिंधुदुर्ग आणि माध्यमांची भूमिका’ या परिसंवाद कार्यक्रमामध्ये उपस्थित जिल्ह्यातील वर्तमानपत्रांचे संपादक व आवृत्ती प्रमुख.
सिंधुदुर्ग विकासात माध्यमांची भूमिका महत्त्वाची
पत्रकार भवनमध्ये आयोजित परिसंवादात सूर; वृत्तपत्रांचे महत्त्व राहणार कायम
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २४ः सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला नेमकी कशाची गरज आहे, हे ओळखून लोकांना आणि निर्णय घेणाऱ्या यंत्रणेला ते पटवून देण्याची जबाबदारी येथील माध्यमांची आहे. जिल्ह्याच्या विकासात माध्यमे आतापर्यत सकारात्मक भूमिका घेत आली आहेत; मात्र यापुढे या प्रक्रियेत प्रसार माध्यमांना आणखी सजग आणि सक्रिय होणे गरजेचे असल्याचे मत जिल्ह्यातील जेष्ठ पत्रकारांनी व्यक्त केले. येथे आयोजित राज्य शासन व जिल्हा ग्रंथालय विभाग यांच्यावतीने सिंधुदुर्गनगरी येथील पत्रकार भवन सभागृहात रविवारी (ता.२३) सिंधुदुर्ग ग्रंथोत्सव - २०२४ चे आयोजन केले होते. काल (ता.२४) दुसऱ्या दिवशी ‘भविष्यातील सिंधुदुर्ग आणि माध्यमांची भूमिका’ या परिसंवादाचे आयोजन केले होते. यासाठी भूमिका मांडण्याकरिता जिल्ह्यातील वर्तमानपत्रांचे संपादक आणि आवृत्ती प्रमुख यांना निमंत्रित केले होते. यावेळी दैनिक सकाळचे प्रिन्सिपल करस्पॉडंट शिवप्रसाद देसाई, जेष्ठ पत्रकार संतोष वायंगणकर, गणेश जेठे, शेखर सामंत, लक्ष्मीकांत भावे, उमेश तोरसकर, महेश सरनाईक, संदीप देसाई, निलेश जोशी यांनी सहभाग घेत जिल्हा विकासाची आणि माध्यमांची भूमिका मांडली. जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांनी विविध प्रश्न करीत निवेदन केले.
श्री. देसाई यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेच्या वाटचालीचा आढावा घेत म्हणाले, ‘‘विकासाची संकल्पना कधीच पूर्ण होऊ शकत नाही. विकासाच्या नवनवीन मागण्या होतच राहणार आहेत. या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न होतात; परंतु त्याला विरोधही होतो. त्यात नागरिकांची चुक नाही. त्यांना चुकीची माहिती दिली जाते; मात्र यावेळी प्रशासन चांगली माहिती घेण्यास कमी पडते. नेमका तोच प्रकार सी वर्ल्ड प्रकल्पाबाबत झाला. तो प्रकल्प चांगला आहे; परंतु त्याची सकारात्मक बाजू मांडण्यात प्रशासन कमी पडले. अशा वेळी योग्य बाजू लोकांना पटवून देण्याची जबाबदारी येथील माध्यमांची आहे. प्रश्न मांडण्याबरोबरच त्यावरचे उपाय आणि उत्तरे देण्याचा प्रयत्नही माध्यमांनी करायला हवा.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘एआय जरी आले तरी वृत्तपत्रांचे महत्त्व कमी होणार नाही. वृत्तपत्रांनी मांडलेल्या चांगल्या भूमिकांचे समर्थन वाचकांनी करून तशी रिएक्शन दिली पाहिजे. मुंबई पुणेसारख्या शहरांमध्ये झालेल्या विकासाची तुलना करून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास व्हावा, अशी अपेक्षा चुकीची आहे. जिल्ह्याची बलस्थाने ओळखून तसा विकास आणि उद्योग येथे यायला हवेत. यात चांगले-वाईट ठरवण्यात प्रसार माध्यमांची भूमिका महत्त्वाची आहे.’’
श्री. वायंगणकर यांनी, जोपर्यंत जनतेचा सकारात्मक प्रतिसाद मिळत तोपर्यंत विकास होणार नाही. विकासाच्या मुद्द्यावर राजकारण आणले जाऊ नये. सी वर्ल्ड प्रकल्पामुळे कोणते नुकसान होणार होते? हे विरोध करणारे स्पष्ट करू शकलेले नाहीत. यामध्ये नागरिकांचा दोष नाही. राजकीय लोकांनी स्वतःच्या फायद्यासाठी विरोधी वातावरण तयार केल्याने सी-वर्ल्ड प्रकल्पासारख्या चांगल्या प्रकल्पाला आपल्या जिल्ह्यात विरोध झाला. त्यामुळे जनतेच्या पाठबळाशिवाय कोणीही विकास करू शकत नाही. एखाद्या प्रकल्पाची फायद्याची मांडणी झाल्याशिवाय तो प्रकल्प राबवला जाणार नाही, असे सांगितले.
श्री. तोरसकर यांनी, सुरुवातीला समाजवादी विचारसरणी होती. त्यानंतर समन्वय साधून राजकारण केले जात होते; मात्र आता संघर्षाचे राजकारण सुरू झाले आहे. बातमीदारीमध्ये राजकीय हस्तक्षेप वाढला आहे. घाटावरील लोक विकासासाठी एकत्र येतात. कोकणात मात्र तशी परिस्थिती नाही, अशी खंत व्यक्त केली.
चौकट
जिल्ह्याच्या विकासासाठी समन्वय समितीची गरज
श्री. सामंत यांनी जिल्ह्यात कोणताही प्रकल्प येऊ घातला की पहिल्यांदा संघर्ष समिती स्थापन होते; मात्र जिल्ह्याच्या विकासासाठी संघर्ष समिती नको तर समन्वयाच्या माध्यमातून विकास साधला जाणारी समन्वय समिती स्थापन झाली पाहिजे. जनता विरोधक नाही तर विरोधक वातावरण निर्मिती केली जाते. सत्यता स्वीकारली जात नाही. अशावेळी विरोधकांची मानसिकता बदलण्याचे काम जिल्ह्यातील पत्रकारितेने करणे गरजेचे आहे. प्रकल्प चांगला असेल तर चांगली बाजू ठामपणे मांडल्या पाहिजेत, असे आवाहन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

