-विधान परिषदेवर रत्नागिरीला संधी नाहीच
विधान परिषदेवर रत्नागिरीला संधी नाही
भाजपने पाळला नाही शब्द ; कार्यकर्त्यांमध्ये नाराजी
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २५ ः रत्नागिरी जिल्ह्यातील भाजप नेत्यांना शब्द देऊनही विधान परिषदेवर स्थान मिळाले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील भाजपचे आणि भाजप नेत्यांचे भवितव्य काय, असा प्रश्न आता विचारला जात आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन पक्ष झाले. निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने तीन तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने एक जागा मिळवली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला एक जागा मिळाली. शिंदे यांच्या शिवसेनेला रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वाधिक जागा सोडताना भाजपने जिल्ह्यातील हक्काची गुहागरची जागाही गमावली. गुहागरची जागा आपल्याकडे राहावी यासाठी भाजपच्या जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले होते. नेत्यांच्या भेटीगाठीपण घेतल्या. माजी आमदार विनय नातू यांनी निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली होती. पक्षाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल, असा त्यांना विश्वास होता; मात्र ही जागा शिंदे यांच्या शिवसेनेला सोडण्यात आली. त्यानंतर जिल्ह्यातील भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी नाराज होतील, असे सर्वांना वाटले होते; परंतु शिंदे सेनेचे उमेदवार राजेश बेंडल यांचा काठावर झालेला पराभव पाहता भाजपने गुहागरमध्ये शिंदे सेनेचे प्रामाणिकपणे काम केल्याचे स्पष्ट झाले. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे भाजपची सत्ता आल्यास डॉ. नातू यांना विधान परिषदेवर घेतले जाईल, असा शब्द पक्षाच्या नेतृत्वाकडून देण्यात आला होता; मात्र पाचपैकी तीन जागा मिळालेल्या भाजपने संदीप जोशी, संजय केनेकर, दादाराव केचे यांना संधी दिली. डॉ. नातू हे त्यांचे वडील डॉ. तात्यासाहेब नातू यांच्यापासून भाजप आणि संघ परिवारात निष्ठेने काम करत आहेत. २०१४ मध्ये सत्ता आल्यापासून त्यांना एकदाही महत्त्वाचे पद मिळाले नाही. राज्यात विधान परिषद आणि राज्यसभा निवडणूक आल्यानंतर प्रत्येकवेळी त्यांना संधी मिळणार, अशी चर्चा होते; मात्र, प्रत्यक्षात डॉ. नातू हे उमेदवारीपासून वंचित राहतात. आताही तेच झाले.
---
कार्यकर्त्यांचा ओघ शिवसेनेकडे
रत्नागिरी जिल्ह्यातील पाचपैकी चार आमदार सत्ताधारी आहेत. त्यातील तीन आमदार शिंदे सेनेचे तर एक आमदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आहेत. निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा शिंदे सेनेत प्रवेशाचा ओघ वाढत आहे. त्याचा फायदा शिंदे सेनेला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत होईल; मात्र पक्षाची वाढ आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा विचार करता भाजपमध्ये मात्र तशा हालचाली दिसत नाहीत. त्यामुळे जिल्ह्यात भाजपचे भवितव्य काय असेल, असा सर्वांनाच प्रश्न आहे.
---
कोट
पक्षाने संधी द्यायला हवी होती. कार्यकर्त्यांचीही तशी मागणी होती; पण मी नेतृत्वाला प्रश्न विचारण्याच्या किंवा न्याय मागण्याच्या कोणत्याही स्थितीत नाही. मला ते करायचेही नाही. कारण, माझ्या वडिलांप्रमाणे माझाही नेतृत्वावर विश्वास आहे.
- डॉ. विनय नातू, माजी आमदार, गुहागर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

