कशेडीच्या दोन्ही बोगद्यात गळती

कशेडीच्या दोन्ही बोगद्यात गळती

Published on

-rat२५p२०.jpg-
P२५N५३३४०
खेड ः बोगद्यात होत असलेल्या पाण्याच्या गळतीमुळे चिखलातून माग काढताना दुचाकीस्वार.
-rat२५p२१.jpg-
२५N५३३४१
खेड ः मुंबई-गोवा मार्गावरील कशेडी घाटाला पर्याय असलेले दोन्ही बोगदे.
----
कशेडीच्या दोन्ही बोगद्यात गळती
गतिमान प्रवासात विघ्न; २० हजाराहून अधिक सिमेंट बॅगांचा वापर, प्रयत्न फोल
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. २५ : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्यायी असलेल्या दोन्ही बोगद्यातून गळती सुरू आहे. दीड वर्षांपूर्वी सुरू झालेल्या एका बोगद्यातील गळती थोपवण्याचा राष्ट्रीय महामार्गचा प्रयत्न फोल ठरला असून, नुकताच सुरू झालेल्या दुसऱ्या बोगद्यातूनदेखील पाण्याची गळती सुरूच आहे. ही गळती काढण्यासाठी अजून दोन महिन्याचा कालावधी लागणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
बोगद्यातील कामांवर कोट्यवधी रुपयांचा चुराडा करूनही गळती थांबता थांबेना झाल्या आहेत. त्या रोखण्यासाठी ‘ग्राऊटींग’चा अवलंबही फोलच ठरल्याने वाहनचालकांचा जीव टांगणी लागला आहे. त्यामुळे बोगद्यातून प्रवास करणाऱ्या दुचाकीचालकांचा प्रवास हा खडतरच राहणार असून, दोन्ही बोगद्यात ठिकठिकाणी लागलेल्या या गळतीने वाहनचालकांच्या गतिमान प्रवासात ‘विघ्न’ निर्माण झाले आहे. बोगद्यातील गळती रोखण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने ग्राऊंटींगचा अवलंब केला. यासाठी २० हजांराहून अधिक सिमेंट बॅगांचा वापर केल्यानंतर गळती थोपवण्यात यश आल्याचा दावाही राष्ट्रीय महामार्ग खात्याकडून केला जात होता; मात्र बोगद्यात गळती सुरूच आहे. त्यामुळे महामार्ग खात्याची डोकेदुखी वाढली आहे.
बोगद्यात गळती सुरूच असल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरूनच मार्गक्रमण करावे लागत आहे. बोगद्यातील कामावर कोट्यवधी रुपयांचा चुराडा करूनही सुरू असलेल्या गळतींमुळे वाहनचालकांची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे. मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या या बोगद्यात गळती लागल्याचे दिसून येत असून या गळतीवर ठोस उपाययोजना व्हावी, अशी मागणी वाहनचालकांमधून जोर धरू लागली आहे. कशेडी बोगद्यातून प्रवास वेगवान अन् आरामदायी होण्याच्या शक्यतेने चाकरमानी बिनधास्त होते; मात्र बोगद्यात सुरू असलेल्या गळतीमुळे या बोगद्यातून प्रवास करताना दुचाकीचालकांना त्रास होत आहे. बोगद्यातील गळती रोखण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग खाते आता कोणत्या नव्या उपाययोजनांचा अवलंब करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
---
कोट
कशेडीच्या दोन्ही बोगद्यांमधील गळती थांबवण्याचे काम ७० टक्के पूर्ण झालेले आहे. उर्वरित काम सुरू असून, त्यासाठी किमान दोन महिन्याचा कालावधी लागणार आहे. सुरवातीला मोठ्या प्रमाणात गळती होत होती. त्यावर अंकुश लागला आहे.
- पंकज गोसावी, अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग
---
टनेलमधील विजेचा प्रश्नही सुटणार
दोन्ही बोगद्यात चोवीस तास वीजपुरवठा सुरू राहावा यासाठी महावितरणकडून वीज घेण्यात येणार आहे. त्यासाठी ८० लाख रुपयांचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला होता; मात्र शासनाकडून संबंधित ठेकेदाराला सूचना दिल्या आहेत. त्यामुळे महावितरणला लवकरच अनामत रक्कम भरली जाणार आहे. त्यानंतर महिन्याभरात वीजपुरवठा सुरू होईल. त्यासाठी ११ केव्हीची लाईन टाकण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून सांगण्यात आले.
---
तज्ज्ञांच्या सल्ल्यानंतरही उपयोग नाही
प्रथम सुरू करण्यात आलेल्या या बोगद्यातून गळती लागल्यानंतर मुंबईतील आयआयटीचे प्रा. एस. के. यांनीही प्रत्यक्ष बोगद्याची पाहणी करत राष्ट्रीय महामार्ग खात्याला सूचनाही केल्या होत्या. तज्ज्ञांच्या सल्ल्याचा काहीही उपयोग झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com