सहा महिन्यात 1661 माकडं, वानर पिंजऱ्यात
जिल्ह्यात १६६१ माकडं, वानर पिंजऱ्यात
वनविभागाची कारवाई ; शेतकऱ्यांना दिलासा, मोहीम सुरूच राहणार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २५ : माकडांचा उपद्रव हा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न होता; परंतु वनविभागाच्या धडक मोहिमेमुळे याला चाप बसला आहे. ऑक्टोबर २०२४ ते ७ मार्च २०२५ या सहा महिन्याच्या कालावधीत वनविभागाने जिल्ह्यातील १ हजार ६६१ माकडांना पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. माकडाला पकडण्यासाठी ८०० रुपये या प्रमाणे साडेतेरा लाख रुपये वनविभागाने खर्च केले आहेत.
जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून माकडं आणि वानरांच्या प्रचंड उपद्रवामुळे हातावर पोट असलेल्या शेतकरी अडचणीत आला आहे. वानरांच्या त्रासामुळे कोकणामध्ये कडधान्य, तृणधान्ये, पालेभाज्या, फळबागा, परसबागेत होणारा भाजीपाला करणे नागरिकांनी सोडून दिले आहे. वानरांच्या त्रासामुळे कोकणातील शेकडो एकर जमिनी ओसाड पडल्या आहेत. त्यामुळे वानरांचा बंदोबस्त करण्यात यावा यासाठी मागील अनेक वर्षांपासून कोकणवासीय स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी यांच्याकडे सातत्याने मागणी करत होते. याची नोंद घेऊन काही दिवसांपूर्वी शासनाच्या वनविभागाकडून कोकणामध्ये वानर पकडण्यासाठी समाधान गिरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. १६ ऑक्टोबर २०२४ ला कोतवडे येथून त्यांनी वानर पकडण्याच्या कामाला प्रारंभ केला. वानर पकडण्यासाठी पिंजरा ठेवून त्यामध्ये खाद्यपदार्थ ठेवून विशिष्ट आवाज काढून ते वानरांना बोलावतात. वानर पिंजऱ्यात आल्यानंतर दोरीने पिंजऱ्याचा दरवाजा बंद करून वानरं आणि माकडं पकडली जातात.
जिल्हा नियोजनमधून या मोहिमेसाठी १५ लाखांची तरतूद करण्यात आली होती. त्यानुसार ऑक्टोबर २०२४ ते ७ मार्च २०२५ या कालावधीत वनविभागाने जिल्ह्यातील १ हजार ६६१ माकडांना पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. रत्नागिरी तालुक्यात ५२५ वानरांना पकडण्यात आले. चिपळूण तालुक्यात ३२७ आणि उर्वरित दापोली अशी एकूण १६६१ माकडं आणि वानरांना पकडण्यात वनविभागाला यश आले आहे.
शेतकऱ्यांतून समाधान
जिल्ह्यात सुरू असलेल्या या मोहिमेमुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. यापुढे ही मोहीम अशीच सुरू राहणार असून, त्यासाठी जिल्हा नियोजनमधून तरतूद करण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

