गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांनी नोंदणी करा

गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांनी नोंदणी करा
Published on

गिग आणि प्लॅटफॉर्म
कामगारांनी नोंदणी करा
रत्नागिरी : कामगार आणि रोजगार मंत्रालयाने गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचा लाभ घेण्यासाठी पात्र गिग कामगारांना ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. http://register.eshram.gov.in या अधिकृत लिंकवर नोंदणी करावी, असे आवाहन साहाय्यक कामगार आयुक्त संदेश आयरे यांनी केले आहे. गेल्या काही वर्षात प्लॅटफॉर्म इकॉनॉमी भारतात आणि जागतिक स्तरावर रोजगार निर्मितीचे एक मोठे साधन बनले आहे. लाखो गिग कामगार या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांना सुरक्षित भविष्यासाठी सरकारी योजनांचा लाभ मिळावा म्हणून केंद्र शासनामार्फत गिग कामगारांच्या नोंदणीचा उपक्रम हाती घेतलेला आहे. ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केलेल्या गिग कामगारांना विविध सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी योजनांचा लाभ देण्याचे प्रस्तावित आहे. यामुळे झोमॅटो, स्विगी, ओला, कुबेर यासारख्या डिजिटल प्लॅटफॉर्ममार्फत काम करणारे डिलिव्हरी बॉय, रायडर, ड्रायव्हर आणि इतर लाखो गिग कामगारांना मोठा दिलासा मिळणार आहे.
---------
मानसिक आरोग्य जपणे
प्रत्येकाची जबाबदारी
रत्नागिरीः ग्रामीण रुग्णालय पालीतर्फे हातखंबा येथील श्रीकांत उर्फ भाईशेठ मापुसकर ज्युनिअर कॉलेजमध्ये महाविद्यालयातील मुलांसाठी ताणतणाव नियंत्रणासाठी आयोजित कार्यक्रमामध्ये रत्नागिरीमधील प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ. अतुल ढगे यांनी मार्गदर्शन केले. आजचं जग धावपळीचं आहे. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना ताणतणावाचे जीवन जगावं लागत आहे; पण हे जीवन जगत असताना आपण आपले मानसिक आरोग्य जपणे गरजेचे आहे. कारण ताणतणावामुळेच माणसाच्या आयुष्यात नैराश्य येते. माणूस टोकाचा नकारात्मक विचार करतो आणि त्यामुळेच माणसाचं आयुष्य बरबाद होते तेव्हा प्रत्येकाने आपले मानसिक आरोग्य चांगले ठेवावे, असा सल्ला रत्नागिरी माईंडकेअर हॉस्पिटलचे डॉ. अतुल ढगे यांनी दिला. स्वागत प्रास्ताविक ज्युनिअर कॉलेज विभागप्रमुख प्रा. सुभाष रानमाळे यांनी केले.
-----------
आराध्य मांडवकरची
नवोदयसाठी निवड
राजापूरः शहरातील जिल्हा परिषद गोखले कन्या शाळेतील विद्यार्थी आराध्य मांडवकर याची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे. ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेतही त्याने ८६ टक्के मिळवून रौप्य तर स्वरा भोसलेने ८० टक्के गुण मिळवून कास्यपदक पटकावले. त्यांना प्रशाळेतील शिक्षक सुहास काडगे, मिताली आंगणे, सुचिता तवटे, मुख्याध्यापिका सायली भडाळे यांनी मार्गदर्शन केले. गटशिक्षणाधिकारी उत्तम भोसले, विस्तार अधिकारी सुनील पाटील, राजाभाऊ रसाळ, नीलेश कुडाळी, केंद्रप्रमुख अमित जायदे आदींनी त्यांचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com