

rat28p1५.jpg
N54066
दापोली ः वेगवान वाऱ्यामुळे नौका हर्णै बंदरातच नांगर टाकून उभ्या आहेत.
--------------
हर्णै बंदरातील कोट्यवधींची उलाढाल ठप्प
मच्छीमार, व्यावसायिक हवालदिल; उत्तरेकडील वाऱ्यामुळे मासळी गायब, उद्योगांना फटका
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. २८ ः मागील दोन दिवसांत उत्तरेकडील वाऱ्याचे प्रमाण वाढत आहे. त्याचा परिणाम मासेमारी व्यवसायावर झालेला आहे. आधीच मासळी मिळत नसल्याने मच्छीमार हवालदिल झालेले असतानाच वेगवान वाऱ्यामुळे हर्णै बंदरात मासळीच येत नाही. त्यामुळे बंदरातील कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली आहे.
यावर्षी मासळी हंगाम चांगलाच धोक्यात आल्याने येथील मच्छीमार चांगलाच संकटात सापडला आहे. सुरुवातीला थोड्या प्रमाणात मासळी उपलब्ध झाली होती; परंतु एलईडी आणि फास्टर नौकांनी हर्णै बंदरात अवैध मासेमारी करून थैमान घातले होते. त्यामुळे पारंपरिक मच्छीमारांना मासळीच मिळत नव्हती. रिकाम्या हाती परत यायला लागत होते. मासेमारीकरिता जाण्यासाठी केलेला खर्च अंगावरच पडत होता; परंतु गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून मत्स्य व्यवसाय व बंदर विकासमंत्री नीतेश राणे यांच्या सूचनेनुसार, एलईडी मासेमारीवर कारवाईच्या आदेशामुळे एलईडी मासेमारीवर बऱ्यापैकी अंकुश बसू लागला होता. त्यामुळे आतातरी मासळी पदरात पडेल, अशी आशा येथील मच्छीमारांना होती.
शिमगोत्सवासाठी म्हणून १३ ते १६ मार्चपर्यंत मासेमारी बंद ठेवली होती. आता शिमग्यानंतर मासळी मिळेल अशीदेखील मच्छीमारांना आशा होती; परंतु गेले पंधरा दिवस उत्तरेकडील वाऱ्याने चांगलाच जोर धरला आहे. याचमुळे सर्वच नौका दाभोळ, आंजर्ले खाडीत, तर हर्णै बंदरात नांगर टाकून उभ्या आहेत.
दरम्यान, नौका उभ्या जरी असल्या तरी नोकरांचा पगार आणि इतर खर्च थांबत नसतो. तो खर्च नौकामालकांच्या अंगावरच पडत असतो. जेव्हा वातावरण सुरळीत होईल तेव्हा नौका मासेमारीला जातील. त्यामुळे नोकरांना नौकांवरून उतरवणे शक्य नसते. मासेमारी थांबल्याने मासेमारी उद्योगावर अवलंबून असणारे सर्वच उद्योग ठप्प झाले आहेत.
कोट
गेले पंधरा दिवस बंदरामध्ये खूपच वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. मासळीची आवक खूपच घटली आहे. सुक्या मासळीसाठी लागणारी मासळीदेखील पुरेशी मिळत नाही. त्यात वारा वेगाने वाहत आहे. अशा या वाऱ्याच्या वेगात मासेमारी करणे खूपच कठीण असते. त्यामुळे आम्हा मच्छीमारांचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे. हे असेच चालू राहिले तर हा उद्योग पुढे कसा चालवायचा, हाच मोठा प्रश्न आमच्यापुढे उभा आहे.
- अनंत चोगले, मच्छीमार.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.