पान एक-डीपीडीसीचा ९८ टक्के निधी खर्च

पान एक-डीपीडीसीचा ९८ टक्के निधी खर्च
Published on

54181 - नीतेश राणे

डीपीडीसीचा ९८ टक्के निधी खर्च
नीतेश राणे; नियोजन विभागात सिंधुदुर्ग अव्वल

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. २८ ः जिल्ह्याच्या विकासासाठी योग्य पद्धतीने निधी खर्चून सर्वांगीण विकास साधण्याचा माझा प्रयत्न आहे. त्यानुसार आर्थिक वर्ष ३१ मार्चला संपत असताना जिल्हा प्रशासनाच्या सहकार्यातून जिल्हा वार्षिक आराखड्यातील २५० कोटींपैकी ९८ टक्के निधी खर्च करून राज्याच्या नियोजन विभागात सिंधुदुर्गने पहिला क्रमांक पटकावला आहे, अशी माहिती पालकमंत्री नीतेश राणे यांनी आज येथे दिली.
यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आदी उपस्थित होते. महायुती सरकारला १५ एप्रिलला शंभर दिवस पूर्ण होत आहेत. त्याचबरोबर राज्याच्या अर्थसंकल्पात विविध राजकीय आरोप-प्रत्यारोपांनंतर निधी खर्च करण्याबाबत पालकमंत्री सक्रिय झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत राणे म्हणाले, ‘‘१५ जानेवारीला पालकमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर जिल्ह्यातील जनतेला जे आश्वासन दिले होते, त्याची पूर्तता केली आहे. जानेवारीपूर्वी निधी खर्चामध्ये जिल्हा राज्यात ३२ व्या क्रमांकावर होता. मात्र, आज एकूण निधीपैकी ९८ टक्के निधी प्रशासनाने खर्च करून दाखवला. हे आमचे पहिल्या टप्प्यातील यश आहे. या यादीत राज्यात दुसऱ्या क्रमांकावर पुणे, तर तिसऱ्या क्रमांकावर सोलापूर जिल्हा आहे. हक्काचा निधी खर्च करून जिल्हा विकासचा दिलेला शब्द पाळला आहे.’’
ते म्हणाले, ‘‘जिल्हा कुपोषणमुक्त झाला पाहिजे, असा आमचा प्रयत्न आहे. जिल्हा बँकेने तसा आराखडाही केला आहे. यापूर्वी जिल्ह्याला मागास जिल्हा असे हिणवले जात होते; परंतु आता जिल्हा समृद्धीच्या दिशेने वाटचाल करत आहे. जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची गुंतवणूकही होत आहे. आता जिल्ह्याच्या विकासासाठी ३०० कोटींची मागणी सरकारकडे केली आहे.’’

चौकट
गाळ उपसा लवकरच पूर्ण
नरडवे धरण प्रकल्पाबाबतची बैठक समाधानकारक झाली असून, प्रकल्पग्रस्तांनी मागणी केलेले आर्थिक पॅकेज दिल्यानंतर या प्रकल्पाचे काम सुरू होईल, असे राणे यांनी एका प्रश्नावर नमूद केले. जिल्ह्यामध्ये मोहीम हाती घेतलेल्या नद्यांमधील गाळ उपसा टप्प्याटप्प्याने सुरू आहे. त्यात कणकवली परिसरात जानवली आणि गडनदी पात्राचा समावेश आहे. गाळ उपसासाठी मोठी मागणी आहे. ती लवकरच पूर्ण केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

चौकट
पुढील वर्षी डिसेंबरपर्यंतच निधी खर्च करू
निधी खर्च करणे, हे उद्दिष्ट नसून त्याचे नियोजन असणे फार गरजेचे आहे. त्यामुळे येत्या आर्थिक वर्षात मी डिसेंबरअखेरच प्राप्त निधी खर्च करून उर्वरित निधीची मागणी करण्याचीही तयारी केली आहे. तसे नियोजन सुरू आहे. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास झाला, तर नागरिकांचे दरडोई उत्पन्नही वाढण्यास मदत होणार आहे. त्यामुळे प्रत्येक अधिकाऱ्याने नियोजनबद्ध काम करणे अपेक्षित आहे. जिल्हा परिषदेच्या नियोजन विभागामध्ये काही प्रमाणात असमाधानकारक काम होते. त्यातही मी बदल करून घेतला आहे, असे राणे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com