

‘गोगटे’चा गुरुवारी
दीक्षांत समारंभ
रत्नागिरी : गोगटे जोगळेकर महाविद्यालयातून मार्च/एप्रिल २०२४ मध्ये पदवी आणि पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा संस्थगित करण्यात आलेला पदवीदान समारंभ ३ एप्रिलला दुपारी १ वाजता महाविद्यालयाच्या केळकर सभागृहात होणार आहे. पदवी आणि पदव्युत्तर पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात विद्यापीठाची पदवी मान्यवरांच्या हस्ते समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक विषयामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्याला संस्थेच्या वतीने सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी या समारंभासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले आहे.
---
लांज्यात पोलिसांचा
रुट मार्च
लांजा ः धार्मिक सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर लांजा पोलिसांकडून सायंकाळी लांजा शहरातून रुट मार्च काढण्यात आला. आगामी काळात छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी तसेच हिंदू धार्मियांचा गुढीपाडवा हा नवीन वर्षांचा सण आहे. तसेच मुस्लिम समाजाची रमजान ईद आहे. या अनुषंगाने सायंकाळी लांजा पोलिस ठाणे येथून साटवली रोड-कुरुपवाडी-नाईकवाडी-जामा मशिद-चव्हाटा मंदिर-पोस्ट गल्ली- बाजारपेठ ते पोलिस ठाणे असा रुट मार्च काढण्यात आला. यामध्ये दोन पोलिस अधिकारी, १७ अंमलदार, ३५ होमगार्ड सहभागी झाले होते.
---
बदल्यात हवामानाचा
हापूसला धोका
चिपळूण ः सध्या वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. कडाक्याचे ऊन व त्यानंतर आलेला अवकाळी पाऊस या लहरी हवामानामुळे कोकणातील आंबा पिकाला फटका बसला आहे. कृषी विभागाने याबाबत तातडीने पंचनामे करून आंबा बागायतदार शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष, व माजी सभापती शौकत मुकादम यांनी केली आहे. यावर्षी हवामानात मोठा बदल जाणवला. मध्यंतरी थंडीचा कडका वाढला होता. त्यांनतर अचानक हवेत उष्मा वाढला होता. त्यामुळे आंब्याला योग्य मोहर आला नाही. आता पुन्हा उष्णतेची लाट आली. आंब्याचा मोहोर काळा पडला व सुकून गेला. परिणामी आंबा पिकावर संक्रात आली असताना आता पुन्हा अवकाळी पाऊस सुरू झाल्यामुळे आंब्याला फटका बसला आहे.
कृषी अधिकाऱ्यांनी आंबा पिकाचे पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई द्यावी अन्यथा रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा मुकादम यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.