

सकाळ विशेष............. लोगो
(३ मार्च टुडे १)
गेल्या काही वर्षात विविध प्रकारचे संशोधन, शोध आणि त्यातून शोधलेली औषधे यामुळे अनेक आजारांवर माणूस मात करत आहे; मात्र तंत्रज्ञानाच्या आहारी गेल्यामुळे आणि अपुऱ्या संवादामुळे मानसिक रुग्णांची संख्या वाढेल असा एक अहवाल प्रसिद्ध झाला होता. मनोरुग्ण म्हणजे मानसिक अस्वस्थता असलेल्या व्यक्ती, ज्यांना नियमित मानसिक समस्या किंवा मानसिक विकार असतात. हे विकार जीवनशैली, वर्तणूक, जाणीव आणि भावनांमध्ये बदल घडवतात. मानसिक विकारांवर मात करण्यासाठी संवाद हवा, योग्य औषधे वेळेवर घेतली पाहिजेत आणि सर्वांत महत्वाचे मोबाईलचा अतिरेकी वापर टाळला पाहिजे. मनोरुग्णांना सामाजिक संरक्षणाचीही गरज आहे. मनोरुग्णांबाबत समाजाने सन्मानाने सहकार्याची भावना ठेवली पाहिजे.
---
बदलत्या जीवनशैलीने मानसिक असंतुलन
मनोरुग्णालयाचे उत्तम कार्य ; मोबाईलच्या अतिरिक्त वापराने समस्येत भर
*मानसिक विकाराची सामान्य लक्षणे ः
चिंता आणि तणाव ः जीवनातल्या साध्या गोष्टींवर फार चिंताग्रस्त होणे.
दीर्घकाळ नकारात्मक भावना, निराशा, हताश आणि दु:ख
मानसिक अस्थिरता ः धृतीत असमानता, दृष्टिकोनातील बदल
अत्यधिक राग ः थोड्या गोष्टींवर राग येणे.
मानसिक गोंधळ ः विचारांच्या गोंधळामुळे निर्णय घेण्यात अडचणी येणे.
*मनोरुग्णांसाठी कायदेशीर मदत : मानसिक रोगी किंवा मनोरुग्णांचे हक्क आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी मानसिक आरोग्य कायदा (२०१७) अस्तित्वात आहे. हा कायदा मानसिक रोगींच्या अधिकारांचे संरक्षण करतो आणि त्यांना योग्य उपचारांची, सुरक्षिततेची आणि कल्याणाची ग्वाही देतो.
---
rat३०p१.jpg-
P२५N५४३४९
रत्नागिरी प्रादेशिक मनोरुग्णालय
*रुग्णांना प्रादेशिक मनोरुग्णालयाचा आधार
रत्नागिरीतील प्रादेशिक मनोरुग्णालय हे १८८६ मधील ब्रिटिशकालीन आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांसाठीचे हे प्रादेशिक मनोरुग्णालय आहे. दळणवळणाची साधणे वाढल्याने आणि कोकण रेल्वे आल्यापासून रत्नागिरीत मोठ्या प्रमाणात मनोरुग्ण दाखल होऊ लागले तसेच काही स्थानिक संस्था मनोरुग्णांना ताब्यात घेऊन त्यांना मनोरुग्णालयात दाखल करतात. हे प्रमाण आता कमी झाले असले तरी असे अनेक मनोरुग्ण कुटुंबाच्या मायेपासून तुटतात. अशा मनोरुग्णांना मानसिक आधार देत बरे करून पुन्हा कुटुंबाच्या मायेच्या पंखाखाली आणण्याचे काम या रुग्णालयाने केले आहे. रुग्णालयाच्या विस्तारीकरणासाठी शासनाने आणखी १४ कोटी रुपये मंजूर केले असल्याने रुग्णालय अधिक कार्यक्षम होणार आहे.
---
*रुग्णालयात १७५ रुग्ण
रत्नागिरी प्रादेशिक मनोरुग्णालयाची क्षमता ३६५ रुग्णांची आहे. त्यामध्ये सध्या १७५ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी ५३ महिला रुग्ण असून, ८ धोकादायक रुग्ण आहेत. मनोरुग्णालयात पुरेसा कर्मचारीवर्ग आहे. काही पदे रिक्त असली तरी कार्यरत असलेले कर्मचारी अतिरिक्त काम करतात. दरदिवशी येथे मनोरुग्ण दाखल होत असतात. त्यांच्यावर उपचार करण्यापूर्वी त्यांची मानसिकता जाणून घेतली जाते. त्यानंतर किती परिणाम झाला आहे याचा विचार करून त्यांच्यावर उपचार केले जाते. काहींना गोळ्या देऊन सोडले जाते तर काहींना दाखल करून घेतले जाते. दाखल असलेल्या रुग्णांची काळजी घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना सलामच करावा, अशी ते देखभाल करतात. त्यांच्या स्वच्छतेची, खाण्या-पिण्याची सर्व काळजी हे कर्मचारी घेतात. रुग्णांच्या कलेने वागून त्यांना धीर देण्याचा आणि आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न या रुग्णालयात केला जातो.
---
*१९१ मनोरुग्णांचे पुनर्वसन
मानसिक आरोग्य कायदा २०१७ या कायद्यानुसार बरे झालेल्या रुग्णांचे समुपदेशन आणि पुनर्वसन करणे आवश्यक आहे. त्यानुसार प्रादेशिक मनोरुग्णालयातील १९१ जणांचे चार वर्षांमध्ये पुनर्वसन करण्यात आले आहे. मनोरुग्णांना पुन्हा आत्मविश्वासाने उभे करण्याचे काम रत्नागिरी प्रादेशिक मनोरुग्णालय करत आहे. अनेकदा रुग्ण बरा झाला तरी त्या रुग्णांचे नातेवाईक त्यांना घरी नेण्यासाठी येत नसल्याने त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न येतो. नातेवाइकांचा शोध सुरू असला तरी या रुग्णांना पोरकेपणाची भावना खाते. कोणीतरी आपल्याला न्यायला येईल, हक्काचं घर मिळेल, नातेवाइकांच्या प्रेमाची उब मिळेल या भाबड्या आशेपोटी ते वाटेला डोळे लावून आहेत. रत्नागिरीतील बॅनियन संस्था, मुंबई, ठाणे येथे अशा अनेक संस्था आहेत त्यांचा शासनाशी करार झाला आहे. रुग्ण चांगला असेल आणि नातेवाईक नसेल तर या संस्था त्यांना घेऊन जाते.
---
फोटो ओळी
rat३०p७.jpg-
२५N५४३५६
प्रवासी मार्गनिवारा येथून मनोरुग्णाला ताब्यात घेताना राजरत्न प्रतिष्ठानचे अध्यक्ष रूपेश सावंत, छोटू खामकर.
rat३०p८.jpg-
२५N५४३५७
मनोरुग्णांची सेवा करताना राजरत्न प्रतिष्ठानचे कार्यकर्ते
---
*मनोरुग्णांना राजरत्न प्रतिष्ठानचा आधार
एसटी प्रवासी मार्गनिवारा, दुभाजक किंवा फूटपाथवर पडलेल्या मानसिक रुग्णांचा आधार म्हणजे राजरत्न प्रतिष्ठान असा नावलौकिक गेल्या १० वर्षात या संस्थेने कमावला. २०१५ मध्ये रत्नागिरीतील धडपड्या तरुणांनी राजरत्न प्रतिष्ठानची स्थापना केली. या संबंधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष रूपेश सावंत यांनी सांगितले की, मानसिक रुग्ण बसस्टॅंड, फूटपाथ, सार्वजनिक ठिकाणी आपलं वास्तव्य करतात. ते स्वतः अस्वच्छ असतात त्याचबरोबर आजूबाजूचा परिसरदेखील अस्वच्छ करतात, असे दिसून आले आहे. या मानसिक रुग्णांची मायेने विचारपूस करून त्यांची व्यवस्थित स्वच्छता करून सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून राजरत्न प्रतिष्ठानची टीम त्यांना मनोरुग्णालयात दाखल करते व त्यांचे पालकत्व स्वीकारते.
मनोरुग्णालयात बरे झालेले रुग्ण असतील तर त्यांची ओळख पटल्यानंतर त्यांच्या कुटुंबाकडे सोपवण्याचे कामसुद्धा राजरत्न प्रतिष्ठान करत आहे. आतापर्यंत राजरत्न प्रतिष्ठानने १९८ मानसिक रुग्ण रुग्णालयात दाखल केले त्यातील ९६ बरे झालेले रुग्ण त्यांच्या नातेवाइकांकडे सुपूर्द केले. या कामाबरोबरच आरोग्य शिबिर, स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिर अशा स्वरूपाची समाजोपयोगी कामे प्रतिष्ठान करते. २०२० ते २२ या कोविड काळात प्रतिष्ठानच्या सभासदांनी कोविड योद्धा म्हणून शासनाच्या उपक्रमामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांसोबत हिरीरिने सहभाग घेतला. यासाठी विविध संस्थांमार्फत राजरत्न प्रतिष्ठानचा सत्कार करून पुरस्कारदेखील प्रदान करण्यात आले आहेत. ज्या रुग्णांच्या नातेवाइकांचा शोध लागत नाही किंवा काही नातेवाईक जाणूनबुजून त्यांना रुग्णालयातून घरी घेऊन जात नाहीत अशा रुग्णांसाठी एक पुनर्वसन केंद्र रत्नागिरीत उभारण्याचा प्रतिष्ठानचा मानस आहे.
---
(हा मुद्दा चौकट स्वरूपात वापरणे)
- rat३०p३.jpg-
२५N५४३५२
डॉ. शाश्वत शेरे
रत्नागिरीतील मानसिक आरोग्यातील महत्त्वाचे टप्पे या विषयी ४१ वर्षे या क्षेत्रात कार्यरत ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ डॉ. शाश्वत शेरे म्हणाले, आजही मानसिक आजार हे शारीरिक आजाराप्रमाणे सहज स्वीकारले जात नाहीत. रुग्ण मनोविकार तज्ज्ञांकडे यायला घाबरतात, आपल्याला हे उपचार घ्यावे लागतात ही फार लाजिरवाणी गोष्ट आहे, असा एक विचार अनेकांच्या मनात असतो. मांत्रिक, महाराज, मौलवीचा सल्ला घेण्याचे प्रमाण गेल्या चाळीस वर्षांत कमी झाले आहे. रुग्णांमध्ये उपचाराने होणारी सुधारणा पाहून आसपासच्या अशा रुग्णांची समाजात परत उपयुक्त काम करण्याची क्षमता पाहून लोकांचा मनोविकार शास्त्रावरचा विश्वास वाढला. अलिकडे मानसिक आजाराच्या सुरवातीलाच उपचारासाठी येण्याचे प्रमाण वाढले आहे. झोप न लागणे, सतत चिंता वाटणे, मन उदास आणि निराश असणे, भीती वाटणे, भास होणे अशा लक्षणांसाठी रुग्ण येतात आणि लवकर आल्याने लवकर उपचार होऊन लवकर बरेही होतात.
* नव्या समस्या
मुलांच्या वागण्यातील समस्या, परीक्षेचा ताण, करिअर निवडणे, पती-पत्नीमधील विसंवाद, नोकरी-धंद्यामधील ताणतणाव, वृद्धांची देखभाल अशा अनेक समस्या घेऊन लोक मनोविकार तज्ज्ञांकडे येऊ लागले आहेत. या नव्याने वाढणाऱ्या समस्यांमागे बदलती समाजव्यवस्था आणि बदलती मूल्ये कारणीभूत आहेत, असे डॉ. शेरे यांनी स्पष्ट केले.
*बाळाला मोबाईल देताना विचार करा...
मनोविकार जाणण्यासाठी लहान बाळापासून सुरवात करावी लागेल. रडणाऱ्या लहान बाळाला गप्प करण्यासाठी, त्याला जेवण भरवण्यासाठी आणि कधी त्याच्या हट्टासाठी त्याच्या हातात मोबाईल फोन दिला जातो. त्यामुळे त्याचा हट्ट वाढतो. त्यांच्या मेंदूच्या वाढीवर, डोळ्यांवर वाईट परिणाम होतो. त्यांना अनेक प्रत्यक्ष अनुभव घेणे, दुसऱ्याशी संवाद साधणे या गोष्टी शिकणे कठीण होऊन जाते. बालकाच्या हातांच्या स्नायूंचा विकास होण्यापूर्वीच तिसऱ्या वर्षीपासून त्याला लिखाणाची जबरदस्ती केली जाते. परीक्षेत मार्क मिळवणे याला अवास्तव महत्व दिले जाते. यामध्ये विषयाचे आकलन बाजूलाच राहाते. अशा अभ्यासाबद्दल नावडच निर्माण होते. नकार, पराभव या गोष्टींना सामोरे जाण्याची क्षमता नसलेली ही मुले परीक्षेचा ताण सहन न झाल्याने, नापास झाल्याने आत्महत्येच्या टोकापर्यंत जातात, असे डॉ. शेरे यांनी सांगितले.
*वयात येताना....
वयात येतांना होणाऱ्या बदलांना सामोरे कसे जायचे, याबद्दल मार्गदर्शनपर बोलणारे कुणीच नाही आणि हातात मोबाईलवर सहज मिळणारे अगाध (अ)ज्ञान यामुळे या वयातील मुलांच्या अनेक समस्या निर्माण होतात. पालक आणि किशोरवयीन मुले यांच्यातील हरवलेला संवाद हा आयुष्यभरातील अनेक मानसिक समस्यांचे मूळ असते. मुलांचे ऐकून घेणे आणि त्यांचे मन समजून घेणे हे या काळात अत्यंत आवश्यक आहे. योग्य जोडीदार निवडण्याकरिता योग्य मार्गदर्शन मिळत नाही, पालकांना वेळ नसतो व सिनेमा, समाजमाध्यमांच्या प्रभावामळे तडजोड करणे म्हणजे स्वातंत्र्यावर घाला, अशा गैरसमजुती समाजात पसरलेल्या आहेत याशिवाय अलिकडच्या काळात वेगाने वाढणारी आणखी एक समस्या म्हणजे वृद्धांची काळजी. उतारवयामध्ये मेंदूची क्षमता कमी कमी होत जाते, हे आता जास्त जाणवू लागले आहे. स्मृतिभ्रंश वाढत गेला की, त्या माणसाची भोवतालची जाणीव कमी कमी होत जाते. अशा माणसाची काळजी लहान मुलासारखी घ्यावी लागते. वाढत जाणाऱ्या या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी मनोविकार तज्ज्ञांसोबत सर्व समाजानेही पुढे येणे आवश्यक आहे, असे डॉ. शेरे यांनी सांगितले.
---
*मानसिक रुग्णांचा आधार माहेर संस्था
माहेर संस्थेचे प्रकल्प प्रमुख सुनील कांबळे म्हणाले, माहेर संस्था हातखंबा व कारवांचीवाडी या ठिकाणी निराधार मुले, मुली, महिला व पुरुषांचे आश्रम चालवले जाते. काळजी व संरक्षणाची गरज असणारे, निराधार, विधवा, महिला तसेच रस्त्यावर फिरणारे, नातेवाईक नसणारे, महिला व पुरुष माहेर संस्थेत दाखल होतात. या महिला किंवा पुरुषांना रेल्वेस्टेशन, पोलिस, जिल्हा रुग्णालय येथून दाखल केले जाते. हे रुग्ण मानसिक आजाराने ग्रस्त असतात. त्यामुळे ते रस्त्यावर फिरत असतात. संस्थेमध्ये त्यांना प्रेम, आपुलकी, माया, ममता त्याचबरोबर पौष्टिक आहार मिळतो. या रुग्णांना प्रादेशिक शासकीय मनोरुग्णालयात ओपीडी बेसवर उपचारासाठी दाखल केले जाते. तेथून त्यांच्यावर वेगवेगळ्या मानसिक आजाराचे उपचार चालू होतात. जिल्हा रुग्णालयाच्या मानसिक विभागातून काही प्रवेशितांना औषधे चालू असतात. औषधोपचाराने बरे झालेले रुग्ण माहेर संस्थेमध्ये आपले खरे नाव, गाव, नातेवाईक ज्या वेळी सांगतात त्या वेळी त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी सोपे जाते. त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचे काम माहेर संस्था करते. औषधोपचाराने बरे झालेले रुग्ण घरापर्यंत पोहोचवण्याचे काम गेल्या पंधरा वर्षात माहेर संस्थेने केले आहे. सुमारे २५०च्या वर महिला व पुरुषांना संस्थेने नातेवाईकांच्या ताब्यात देऊन घर मिळवून दिले आहे. मनोरुग्णाकडे माणूस म्हणून पाहायला हवे, त्यांना सामाजिक प्रवाहात आणायला हवे.
---
सजग पालकत्वाचे लक्षण
नवीन शैक्षणिक धोरणातही निकोप मानसिक स्वास्थ्यावर अधिक भर दिला आहे. जेणेकरून येणारी पुढील पिढी मानसिक व भावानिक दृष्टिकोनातून सक्षमपणे बनेल. यासाठी बुद्धिमत्तेबरोबरच भावनिक स्वास्थ्य व व्यक्तिमत्त्वाच्याही पैलूंवर भर दिला जाईल, याकडे पालकांनी लक्ष देणे आवश्यक आहे. सद्यःस्थितीत मुलांमधील सहनशीलता, अवधान क्षमता कमी दिसून येत आहे किंवा मुलं उथळपणे प्रतिक्रिया देत आहेत. मुले आभासी जीवनात अधिक रममाण होत आहेत. मुलांना वेगवेगळ्या संवेदनांचा अनुभव देणे, विविधांगी संधी मिळणे, प्रेरणा देणे, पोषक वातावरण देणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य व जबाबदारी आहे. सजग पालकत्वाचे हेच लक्षण आहे.
---
कोट १
rat३०p५.jpg-
२५N५४३५४
डॉ. संघमित्रा फुले
प्रादेशिक मनोरुग्णालयात येणाऱ्या रुग्णांचे पुनर्वसन करण्याच्यादृष्टीने प्रयत्न केले जातात; पण काहीवेळा नातेवाईक त्यांना परत घरी नेण्यास इच्छुक दिसत नाहीत. संपर्क साधला तरीही ते येत नाहीत. नातेवाइकांनी या रुग्णांना प्रेम, माया देण्याची गरज आहे. यातूनच हे रुग्ण बरे होऊ शकतात.
- डॉ. संघमित्रा फुले, अधीक्षिका, प्रादेशिक मनोरुग्णालय
---
कोट २
rat३०p६.jpg-
२५N५४३५५
अमित सामंत
आर्थिक सुबत्ता, इंटरनेटमुळे जवळ आलेलं जग आणि टेक्नॉलॉजीच्या वापराने अशक्यही शक्य करण्याच्या या युगात खरंतर तरुणाई समाधानी, आनंदी असणं अपेक्षित होतं; पण दुर्दैवाने चित्र वेगळं दिसत आहे. सध्या तिशीच्या आत असणाऱ्या तरुणाईत मानसिक समस्या असल्याचं दिसून येत आहे. रत्नागिरीसारख्या शहरातही तरुणाईला रिलेशनशिप इश्युज, एडिक्शन, मानसिक ताण, एन्झायटी या समस्या सर्वाधिक भेडसावतात. सुदैवाने, तरुणाई समुपदेशन व मानसोपचार घेण्यात कमीपणा मानत नाही.
- अमित सामंत, समुपदेशक, मानसोपचारक.
---
कोट ३
rat३०p२.jpg -
२५N५४३५१
सचिन सारोळकर
बालकाचे मानसिक स्वास्थ्य याबाबत कोरोनानंतर जागतिक आरोग्य संघटनेबरोबरच अनेक राष्ट्रीय आणि राज्यपातळीवरच्या संस्थांनी या विषयाची दखल घेतली आहे. बालविकासात होणाऱ्या मानसिक व भावनिक जडणघडणीवर अधिकाधिक सकारात्मक परिणाम होईल या दृष्टिकोनातून कौटुंबिक, शैक्षणिक व सामाजिक वातावरण कसे राहील याकडेही अधिक लक्ष दिले जात आहे.
- सचिन सारोळकर
-----
संकलन : मकरंद पटवर्धन, रत्नागिरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.