दारू, देवस्की, देही भिनला मोबाइल : बळीराजाची व्यसनं

mobile
mobilesakal
Published on

-जयंत फडके, जांभूळआड पूर्णगड रत्नागिरी

कोकणातल्या शेतकऱ्याची व्यसनं आणि त्यातही पंचविशीत तिशीतल्या होतकरू पिढीची व्यसनं हा सर्वकालीन चिंतेचा विषय राहिला आहे. या व्यसनांनी प्रत्येक पिढीचं नुकसानंच केलंय. कोकणातल्या शेतकऱ्याला मागच्या काही पिढ्यात देवदेवस्की आणि भगतगिरीचं व्यसन होतं. या व्यसनाची अजूनही यथेच्छ चेष्टा प्रसारमाध्यमांतून होताना आपण पाहतो. अनेक घराण्यांची वाताहत, सुडाची मानसिकता या व्यसनाने बळीराजाने अनुभवल्येय. हळुहळू शिक्षणाचं सार्वत्रीकरण आणि स्तर जसा वाढत गेला तसं भूतखेतांच गारूडही उतरत गेलं. अजून भगतगिरी टिकाव धरून आहे. कष्टानं मिळवलेला पैसा भगतांच्या नादात वाया जाताना दिसला की, शिक्षण आणि सुशिक्षितपणाचा ताळेबंद समोर येतो. आताशा बुवा, बाबा, गुरू आणि त्यांचं अवडंबर, तथाकथित सत्संग, उत्सवी महाप्रसाद बघितले की, खरंच या सगळ्याला माझ्या बळीराजाकडे वेळ आहे का, असा प्रश्न पडतो. कोकणी माणूस मुळात धार्मिक, उत्सवप्रिय..पण ‘ऋण काढून सण’ आणि ‘कोणीतरी महाराज माझं प्राक्तन बदलेल’ हा विचार शिक्षणाबरोबर येऊन डोळस व्हायला हवं.

गावठी हातभट्टीच्या दारूनं सगळीकडच्याच बळीराजाचे संसार उद्ध्वस्त झाले. जागाजमिनी या दारूच्या नादानं गमावल्या गेल्या. लग्नं मोडली, आयुष्यांची राखरांगोळी झाली. फसव्या सुशिक्षितपणाच्या अंगरख्याखाली आता ‘बंद बाटली’ चा महापूर आलाय. तरुण शेतकरी या पुरात गटांगळ्या खातोय. बॅंक सीसीचे आकडे फुगतायत. प्याल्याशिवाय हात स्थिर न होणारी पिढी दुचाकी-चारचाकीच्या अपघातात हकनाक मरत्येय. रक्ताचा घाम करून, पोटाला चिमटा घेऊन या पिढीला मागच्या पिढीनं शिकवलं तरी काय? या प्रश्नानं श्रीमंतीच्या, शिक्षणाच्या खोट्या कल्पना अगदी उघड्यानागड्या होतायत. भौतिक साधनं हातात आहेत; पण ती वापरायची कशासाठी हेच स्पष्ट नाहीये.

खेळ हे शरीर स्वास्थ्याबरोबरच मानसिक जडणघडणीत महत्वाची भूमिका बजावतात. खिलाडूवृत्ती माणसाला सर्वच क्षेत्रात कामी येते; पण गावोगावी भरणाऱ्या क्रिकेटच्या टुर्नामेंट कोणत्या मानसिकतेवर शिक्कामोर्तब करतात? विरंगुळा म्हणून खेळणं आणि आपले उद्योगधंदे सोडून महिनोनमहिने त्या रणरणत्या उन्हात करपत राहणं यातला फरक या पिढीनं जाणायला हवा. यातला एखादा उत्तम दर्जाचा खेळाडू हे क्षेत्र आपल्या पोटापाण्याचं ठरवण्याइतका असामान्य असेलही; पण त्यासाठी सारी पिढीच भाजून काढायची, पोटापाण्याला विसरून तळतळत ठेवायची गरज नाही. जे खरंच आपली शेतीवाडी, उद्योग सांभाळून खेळतायत त्यांच खरंच कौतुक आहे; पण अख्ख्या कोकणातले भात कापून झाल्यावर उन्हात वाळलेले मळे, कुऱ्याढात हेच टुर्नामेंटवेडे फुललेले निखारे शेतीबागायतीकडे लक्ष देऊ लागले तर एकही परप्रांतीय कोकणात पाय ठेवू शकणार नाही.

तीसएक वर्षापूर्वी राष्ट्रीय पक्षांची पिछेहाट आणि प्रादेशिक पक्षांचा सुकाळ आला. या काळात गावातलं राजकारण वाडीत नव्हे तर घरात आलं. नेत्याना कार्यकर्त्यांची गरज होतीच. यातून कोणी सरपंच, तालुका-जिल्हापातळीवरच काय आमदार होऊन समाजसेवेचं व्रत जोपासत असतील तर त्यांना कोपराढोपरापासून दंडवतच ..पण माझ्या बळीराजाची एक पिढी यात सतरंज्या उचलून वडापाव समाधानी आणि पैशादारूची लाभार्थी बनून भरकटली त्याचं काय? हे व्यसन कोणत्याच मुक्तीकेंद्रात न सुटणारं..!! अख्ख्या भारतवर्षासह माझ्या बळीराजाची पिढी नतमस्तक करायला लावून शारीरिक-मानसिक दुर्बल करणारं आधुनिक व्यसन म्हणजे मोबाईल..! हा नव्या युगातील शरीराचा एक अत्यावश्यक अवयव झालाय. यावर खूप लिहिलं, बोललं, जातंय; पण माझ्या बळीराजाची एक पिढी मात्र त्यांनी बरबाद केली.

या साऱ्या व्यसनांनी मानसिक दुर्बलता, नकारात्मकता, निराशा आणि ‘मी’त गुंतून आत्महत्येकडे झुकलेली बळीराजाची पुढची पिढी आता प्रश्न बनल्येय. विशीच्या दरम्यानच्या आत्महत्या अधिकच आघात करतात. आपण आभासी जगात इतके गुंतलोय की, जी गरज नाही ती आपल्याला अत्यावश्यक, जीवनमरणाची गोष्ट वाटायला लागल्येय.‘थोबाड पुस्तकावरचे’ लाईक, कॉमेंटवाले, व्हॉटस्अॅपी, इन्स्टाग्रामी मित्र प्रत्यक्ष जीवनात काहीच उपयोगाचे नाहीत हे जेव्हा समजतं तेव्हा मोकळं व्हायला जागाच दिसत नाही. खरंतर, जो आपलं दुःख आणि दारिद्र्य वेशीवर टांगतो त्याला निश्चितच सद्गुरू भेटतो; पण आपण नको ते लपवत बसतो आणि खरंच उघड करायला हवं ते झाकत बसतो. खरंतर, या वयात जीवनाचा अर्थच कळलेला नसतो. प्रेम आणि आकर्षण यातलं अंतर उमजत नसतं. नकार पचवता येत नसतो आणि होकार कशाला आहे, हे कुठं कळत असतं? मग त्या निर्मात्यांना, पोषण करणाऱ्यांना म्हणजेच ब्रह्माविष्णूंना आपण विसरतो आणि साक्षात महादेवांचे ‘लया’चे कार्य आपल्या हाती घेतो.

एकत्र कुटुंब, शिक्षणव्यवस्था या खरंतर खुलायचा, फुलायच्या, मोकळ्या व्हायच्या जागा... पण आपण त्यांना संपवलं..मशिनं केली त्यांची..भावनेचा तिथे काय संबंध? शिक्षणानं ‘कोणतंही काम कमी दर्जाचं नसतं’ हे अंगात मुरायला हवं; पण...आपण अमूक शिकलोय मग तमूक काम कसं करणार? उपाशी फटांगे मारीन; पण काम माझ्या दर्जाचंच हवं, या भ्रामक कल्पनेत भरकटतो. हा कोंडमारा या वयात असेल तर मग प्रत्यक्ष आयुष्याच्या समरांगणात म्हणा, रंगमंचावर म्हणा नाहीतर मैदानात म्हणा हे कच्चं मडकं कसं टिकायचं?

नात्यातलं अपयश, आर्थिक अपयश, शारीरिक अपयश ही तत्कालिक कारणं..खरं कारण ‘मी’ न समजणं..आपण सेलिब्रेशन शिकलो; पण दुःख पचवायला, आनंद वाटायला, आपला रंग या विशाल सागरात मिसळून द्यायला नाही शिकलो..‘मी’ला गोंजारत बसलो. मेसेज टाईप करता येतो; पण संवाद नाही साधता येत आपल्याला.. जिथं खरंच निगरगट्ट असायला हवं तिथे कमालीचे हळवे आणि सहृदयता जपायची तिथे कोरडे, कोडगे झालो आपण.‘आपली’ शिक्षणव्यवस्था आल्यावर इतक्या वर्षानंतर आता मूल्यशिक्षण अभ्यासक्रमात समाविष्ट झाली म्हणजे आपण मुल्यांबाबतच अपयश मान्य केलंच आहे...माणूसतरी राह्यलोय का आपण? मनसोक्त रडू, निखळ हसू, बिनधास्त रागावू शकतो का आपण..? मग प्राणी होण्यापासून किती लांब आहोत?

(लेखक प्रगतीशील आणि प्रयोगशील शेतकरी आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com