गुहागर-सांडपाण्यामुळे नदीसह पिण्याच्या पाण्याचे जलस्रोत दूषित

गुहागर-सांडपाण्यामुळे नदीसह पिण्याच्या पाण्याचे जलस्रोत दूषित
Published on

५५४७०

सांडपाण्यामुळे जलस्रोत दूषित
ग्रामस्थ संतप्त ः पाटपन्हाळे ग्रामपंचायतीने काढल्या ३८ संस्थांना नोटिसा
गुहागर, ता. ४ : तालुक्यातील शृंगारतळी, वेळंब फाट्याजवळील नाल्यात सांडपाणी सोडल्याने नाल्यातील पाण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याच्या विहिरी, कूपनिलका दूषित झाल्या आहेत. गेली दोन वर्षे हे सहन करणाऱ्या ग्रामस्थांनी अखेर आंदोलनाचा इशारा दिला. प्रशासन सक्रिय होत ३८ संस्थांना नोटिसा पाठवल्या आहेत. यामध्ये शृंगारतळीतील व्यावसायिक, हॉटेल चालक, निवासी संकुले यांचा समावेश आहे. नदीपात्रात सोडलेले सांडपाणी तातडीने पूर्णतः थांबवावे अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे नोटिसीमध्ये नमूद करण्यात आले आहे.
शृंगारतळी गावात हॉटेल व्यावसायिक, निवासी संकुले यांची संख्या वाढत आहे; मात्र या वाढत्या बांधकामांनंतर आवश्यक असलेल्या व्यवस्था सुनियोजितपणे उभ्या राहिल्या नाहीत. शृंगारतळी बाजारपेठेच्या दोन्ही बाजूने दोन नाले आहेत. या नाल्यांमध्येच सर्व सांडपाणी सोडले जात असल्याने दोन्ही नाले दूषित झाले आहेत. त्यापैकी वेळंब फाट्याजवळील नाल्यातील दूषित, दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नाल्याच्या परिसरात राहणाऱ्या लोकांच्या विहिरी, बोअरवेल दूषित झाले. हे पाणी पिण्यासच नव्हे तर अंघोळीसाठी किंवा अन्य वापरासाठीदेखील वापरणे धोकादायक असल्याचा अहवाल आरोग्य विभागाने दिला. याबाबत ग्रामस्थांनी दोन वर्षात अनेक तक्रारी केल्या; परंतु त्यांना दाद मिळत नव्हती. अखेर वैतागलेल्या ग्रामस्थांनी सांडपाण्याची गटारे बुजवून टाकण्याची व नाल्यातच आंदोलन करण्याचा इशारा दिला. त्यानंतर गटविकास अधिकारी, तहसीलदार यांनी तातडीने पाहणी केली. ग्रामपंचायतीने नाल्यात सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे फोटो, व्हिडिओ आदी गोष्टींचे चित्रीकरण केले. त्यानंतर गटविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार ग्रामपंचायतीने ३८ जणांना दंडात्मक कारवाईच्या नोटिसा पाठवल्या आहेत. दरम्यान, गटविकास अधिकाऱ्यांनी याबाबतची एक सभाही पंचायत समितीमध्ये आयोजित केली आहे.

कोट
सुरुवातीला केवळ ३८ नोटिसा पाठवल्या होत्या. आता या नोटिसांची संख्याही ४५वर पोचली आहे. सांडपाणी सोडणाऱ्या प्रत्येक व्यक्ती अगर संस्थेला नोटीस पाठवण्यात येणार आहे.
- आसिम साल्हे, उपसरपंच, पाटपन्हाळे ग्रामपंचायत

कोट
आम्हाला नोटीस मिळाली आहे; मात्र आम्ही हॉटेल व लॉज सुरू करतानाच एक छोटा जलशुद्धीकरण प्रकल्प बांधला तो आजही क्रियान्वित आहे शिवाय शौचालयाचे खड्डे आम्ही उपसून त्यातील पाणी दुसरीकडे नेऊन टाकतो. त्यामुळे आमच्या व्यवसायातून नदीत जाणारे पाणी बऱ्यापैकी शुद्ध असते; मात्र यावर कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी आमचे सहकार्य नक्की असेल.
- ओंकार संसारे, हॉटेल व्यावसायिक, शृंगारतळी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com