

अतिक्रमण थांबवा, अन्यथा आंदोलन
शेतकरी संघटना ः कोंडुऱ्यातील जमीनप्रश्नी इशारा
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. २६ ः कोंडुरा येथील मच्छीमारांच्या माड बागायतीमध्ये रस्त्यासाठी होणारे अतिक्रमण तत्काळ थांबवून त्यांना न्याय द्यावा; अन्यथा १ मे रोजी तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा विविध शेतकरी संघटना आणि राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत दिला. याबाबत वेंगुर्ले तहसीलदार ओंकार ओतारी यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, वेंगुर्ले तालुक्यातील किनारपट्टीवर वसलेल्या वायंगणी गावातील कोंडुरा येथील मच्छीमार शेतकऱ्यांच्या माड बागायतीमध्ये अतिक्रमण करून नियमबाह्य व बेकायदेशीर रस्ता करण्याचा प्रयत्न गेल्या पाच-सहा वर्षांपासून प्रशासन करत आहे. अन्यायग्रस्त मच्छीमारांनी प्रशासनाचे वेळोवेळी लक्ष वेधले असतानाही प्रशासनाकडून या नियमबाह्य कामाला पाठीशी घातले जात आहे. मच्छीमारांची कागदपत्रे पाहता शासनाने कुठल्याही कायदेशीर कागदपत्राच्या आधारे या मच्छीमार शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्याचे दिसून येत नाही. प्रत्यक्षात जागेवर मूळ रस्त्याची दिशा बदलून माड बागायतीचे अतोनात नुकसान करुन येथील लोकांची दिशाभूल केली जात आहे. जमीन संपादनाबाबत कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पार पडलेली नसताना देखील प्रशासन संबंधित शेतकऱ्यांवर वारंवार अन्याय करत आहे. शासनाने आपल्या जमिनी ज्या कागदपत्रांच्या आधारे कायदेशीर बाबींची पूर्तता करून संपादित केलेल्या आहेत, त्या कागदपत्रांची संबंधित अधिकाऱ्यांकडे मागणी करूनही अद्याप अशी कोणतीही कागदपत्रे दिलेली नाहीत. खानोली कोंडुरा ते येरम लिंगाचे देवालय या रस्त्यामध्ये झालेले अतिक्रमण हटवावे, असे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आदेश असल्याचे मच्छीमारांनी दाखवूनही माड बागायतीचे कुंपण तोडून वेळोवेळी बांधकाम विभागाने नुकसान केले आहे.
---
प्रकार मच्छीमारांसाठी हानिकारक
सर्व प्रकार वेंगुर्ले तालुक्यासह जिल्ह्यातील मच्छीमारांना हानिकारक ठरणार आहे. त्यामुळे हे अतिक्रमण तत्काळ थांबवावे; अन्यथा १ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे. यावेळी स्थानिक शेतकऱ्यांसह शेतकरी नेते व फुले, शाहू, आंबेडकर विचार मंचाचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी संघटनेचे अध्यक्ष श्यामसुंदर राय, शेतकरी नेते संजय गावडे, सामाजिक कार्यकर्ते समीर कुडाळकर, योगेश तांडेल, प्रदीप सावंत, प्रवीण राजापूरकर आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.