पदोन्नतीची कुंठितावस्था तातडीने दूर करा
62329
पदोन्नतीची कुंठितावस्था तातडीने दूर करा
कृषी सहाय्यकांची मागणी ः कणकवलीत विविध मागण्यांसाठी ‘धरणे’
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. ७ ः कृषी विभागाच्या होऊ घातलेल्या आकृतिबंधामध्ये कृषी सहायकांच्या पदोन्नतीची कुंठितावस्था दूर करावी, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कृषी सहायक संघटनेने आज तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर कृषी सहाय्यकांनी धरणे आंदोलन केले. विविध टप्प्यांत हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे कृषी सहाय्यक संघटना पदाधिकारी जे. जे. चव्हाण यांनी सांगितले.
सध्या कृषी सहायकांची एकूण ११ हजार ५२७ पदे अस्तित्वात असून कृषी पर्यवेक्षकांची ७०० पदे मंजूर आहेत. त्यामुळे कृषी सहायकांना सेवेची २० ते २५ वर्षे झाल्यानंतरही पदोन्नती मिळत नाही. सद्यःस्थितीमध्ये कृषी सहायक व कृषी पर्यवेक्षक यांचे प्रमाण ६ ः १ याप्रमाणे आहे. ते ४ ः १ याप्रमाणे करण्यात येणे आवश्यक आहे. यामुळे कृषी सहायकांची पदोन्नतीची कुंठितावस्था दूर होऊन त्यांना पदोन्नतीच्या संधी उपलब्ध होतील. या मागणीसाठी व कृषी सहायक यांना प्रत्यक्ष प्रक्षेत्रावर कामकाज करीत असताना उद्भवणाऱ्या विविध अडचणींची सोडवणूक करण्यात यावी, यासाठी कृषी सहायक संघटना ऐन खरिपाच्या तोंडावर आक्रमक आंदोलनाची भूमिका घेत आहे. कृषी सहायक संवर्गाच्या विविध अडचणींसंदर्भात संघटनेने वेळोवेळी शासन दरबारी निवेदने देऊन व बैठकांमध्ये अडचणी सोडवण्याची मागणी केली आहे. पुणे येथील ९ एप्रिलच्या कृषी विभागाच्या कार्यशाळेमध्ये कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी, कृषी सहायकांना लॅपटॉप देणा ,तृषी सहायक संवर्गाचे पदनाम बदल करणार असल्याचे सांगितले होते. परंतु, प्रत्यक्षात या घोषणा अद्याप पूर्णत्वास आलेल्या नाहीत. क्षेत्रीय पातळीवर काम करताना कृषी सहायकांना विविध अडचणीना तोंड देत काम करावे लागत आहे. कृषी सहायकांवरील अन्यायाविरोधात वरिष्ठ स्तरावरून कुठलीही दखल घेतली जात नाही, असे कृषी सहायक संघटनेचे म्हणणे आहे. त्यामुळे नाइलाजाने आंदोलनाची भूमिका घ्यावी लागत असल्याचे राज्य संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. विविध मागण्या व अडचणींसाठी कृषी सहायक संघटना तीव्र आंदोलन करणार असल्याची माहिती आंदोलनादरम्यान देण्यात आली. या आंदोलनादरम्यान तालुका कृषी सहाय्यक संघटनेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
-------------
कृषी सहायकांच्या महत्त्वाच्या मागण्या
* कृषी सहायक ते कृषी पर्यवेक्षकांचे प्रमाण ४ ः १ करावे
* पदनाम बदलून सहायक कृषी अधिकारी करावे
* कृषी सेवक कालावधी रद्द करून कृषी सहायकांना नियमित कृषी सहायक पदाचे आदेश द्यावेत
* लॅपटॉप उपलब्ध करून द्यावा, कायमस्वरूपी मदतनीस द्यावा
* ‘पोकरा’सारख्या महत्त्वाकांक्षी योजनेमध्ये कृषी सहायकांना मदतनीस म्हणून समूह सहायक द्यावा
* कृषी निविष्ठा वाटपामध्ये सुसूत्रता आणावी
-------------
आंदोलनाचे टप्पे
५ मे-काळ्या फिती लावून कामकाज
६ मे-सर्व शासकीय व्हाटसअॅप ग्रुपमधून बाहेर पडणे
७ मे-सर्व तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर कृषी सहायकांचे धरणे
८ मे-कृषी सहायक एक दिवस सामूहिक रजेवर
९ मे-सर्व ऑनलाइन कामकाजावर बहिष्कार
१५ मे-सर्व योजनेचे कामबंद आंदोलन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.